कृषि प्रधान भारतात शेती व शेतकरी यांना प्रथम प्राधान्य द्यावे असे भाऊसाहेबांनी 3 सप्टेंबर 1949 ला घटना समितीत भाषण करताना सांगितलं. भारतीय कृषि व कृषक याबद्दल मला नितांत आदर वाटतो. मी शेतकर्याला सर्वश्रेष्ठ धननिर्माता समजतो, तो सर्वांचा पोशिंदा आहे म्हणून हा शेतकरी समाज मागे राहू नये व त्याचे कोणी शोषण करू नये यादृष्टीने प्रत्येक शेतकरी पुत्राने शेतकर्यांचा आथिर्क, शैक्षिक, बौद्घिक विकास करण्यासाठी संपर्क असले पाहिजे. असे विधान फक्त भाऊसाहेबांचेच होते.
पंजाब श्यामराव कदम (देशमुख) यांचा जन्म दि. 27 डिसेंबर 1898 ला शुक्रवारी गीताजयंतीच्या शुभ मुहूर्तावर झाला. या महामानवान शेतकर्यांच्या कर्तव्यासाठी पापळ ता. नांदगांव खंडेश्वर जि. अमरावती या खेड्यात अवतार रुपाने जन्म घेतला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतातील शिक्षण पूर्ण करून 21 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईवरून बोटीने लंडन येथे केंब्रिज विद्यापीठातून बॅरिस्टर व एडिंबर्ग विद्यापीठात एम. ए. ऑनर्स, डी. फिल. या पदव्यांनी अलंकारित होऊन 15 जुलै, 1926 रोजी भारतात मायदेशी परत आले. वयाच्या सुरुवातीचा 28 वर्ष काळ बालपण व शिक्षणात व्यतीत झाल्यावर त्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दि. 9-4-1965 या दिवसापर्यंत सतत 38 वर्षे संपूर्ण भारत व जगभरात फिरले. गरीब देशापासून ते श्रीमंत देशापर्यंत स्वत:साठी सोने, हिरे, मोती, दागदागिने, उच्च प्रतीच्या शोभेच्या वस्तू यापैकी काहीही आणले नाही. त्यांनी त्या ऐवजी आपल्या शेतकर्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, यंत्रसामुग्री, पशुपक्ष्यांच्या सुधारित जाती या मौल्यवान वस्तू राष्ट्राला अर्पण केल्या.
विलायतेतून (लंड नवरून) अमरावतीला परत आल्यावर स्वत:वरचे कर्ज फेडण्यासाठी वकिली व्यवसाय सुरु केला व तो नायगावकरांचा खटला जिंकून, प्रतिष्ठा व पैसा मिळाला; परंतु भाऊसाहेबांच्या अंतर्मनाला शांती नव्हती, समाधान नव्हते म्हणून त्यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर 1927 मध्ये वर्हाड शेतकरी संघाची स्थापना केली व या पक्षात सर्व जाती धर्माच्या शिक्षित व अशिक्षित तरुणांचा संघ उभा केला. त्यानंतरच्या काळात आतापर्यंत अशाप्रकारची संघटना कोणी काढू शकले नाही याचे कारण त्यांचे विचार संकुचित नव्हते. शेतकर्यांच्या कल्याणासाठी 1927 पासुन सुरू केलेले कार्य आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत सुरू राहिले. दि. 26-11-1927 ला भाऊसाहेबांचा विमलताईंशी शुभ विवाह झाल्यावर विमलताईंच्या सहवासाने शेतकरी संघाचे कार्य अधिक बहरले व त्यात महिलांचा समावेश झाला. भाऊसाहेबांच्या शरीरात बळीराजाचे रक्त बसल्याने त्यांनी राजकारणाचा उपयोग शेतकर्यांच्या भल्यासाठी केला. भाऊसाहेबांचे कृषिकार्य या विषयावर अनेक प्रबंध लिहिल्या जाऊ शकतात. एवढा मोठा दस्तऐवज उपलब्ध आहे.
सन 1928-29 मध्ये पंजाबातील शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तेथील संघटन करून शेतीची आणेवारी कमी केली. दि. 25-8-1932 ला कर्ज लवाद कायद्याचे सरकारी विधेयक सादर करून 26 जानेवारी 1933 ला आपल्या विद्बत्तेने मंजूर करून 78 हजार एकर शेती सावकारांच्या कर्जातून मुक्त केली व पिढ्यानपिढ्या सुरु असलेले शोषण बंद झाले व याच काळात डॉ. भाऊसाहेब ही असामान्य व्यक्ती आहे हे पंडित नेहरूजींच्या लक्षात आले.
कापसाच्या व्यवहारात शेतकर्यांची फसगत होऊ नये यासाठी त्यांनी शेतकरी, दलाल व व्यापारी यांच्या सहीने करारपत्रक तयार करून व्यवहारात पारदर्शकता आणली. दि. 30-1-1932 ला कॉटन मार्केट बिल सादर करून कापसाचे अचूक मोजमाप कसे करावे याबाबत स्पष्ट निर्देश दिले. त्यामध्ये शेतकर्याला प्रतिनिधित्व, कापसाला हमी भाव, शेतकर्यांसाठी निवास या सर्व बाबींचा समावेश केला.
सन 1934 मध्ये कॉटन मार्केट अमरावती येथे विदर्भ शेतकरी परिषद आयोजित केली व शेतकर्यांच्या समस्यांवर चर्चा व रूपरेषा ठरविली. याच काळात सेंट्रल प्रॉव्ही ऍन्ड बेरार या बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर या बँकेकडून सुमारे 4 लक्ष रुपयांचे कर्ज घेऊन लाखो रुपयांच्या शेतकर्यांच्या ठेवी परत केल्या व शेतकर्यांची अमरावती जिल्हा बँक वाचविली. शेतमालकांना कमी व्याजाची हप्ते ठरवून शेती परत केली.
सन 1952 मध्ये मा. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रथम केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शपथविधी झाल्यावर त्यांचे कार्य जागतिक स्तरावर सुरु झाले. त्या काळात भारतात तांदळाचे उत्पादन कमी असल्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा होता, परंतु भाऊसाहेबांनी जपानी भात शेतीचे तंत्रज्ञान लागवडी बाबत पत्र 18-11-1952 ला राष्ट्रपतींना पाठविले व दि. 10 जानेवारी 1953 ला धान शेतीची जपानी पद्घत या विषयावर आकाशवाणीवर भाषण प्रसारित केले. धानाच्या रोपाची पूर्व लागवडी पासून मळणी पर्यंतच्या सर्व सूक्ष्म घटकांचा स्वत: अभ्यास करून कृषि शास्त्रज्ञांना लक्ष्य निर्धारित करून दिले व चमत्कार असा की 1954 मध्ये अतिरिक्त धानाचे काय करावे एवढे विक्रमी उत्पादन झाले. वास्तविक भारतात ग्रामोद्योग केंद्रात हे तंत्र पूर्वीपासून होते, परंतु त्यांचा प्रसार झाला नव्हता. भाऊसाहेबांनी स्वत: 100 धानाचे प्लॉट प्रत्यक्ष बघितले.
भाऊसाहेबांचा डॉक्टरेटचा प्रबंध ‘दि ओरिजिन अॅन्ड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर’ या इंग्रजी शीर्षकाअंतर्गत होता व त्यामध्ये संस्कृतमधील वेदांचे समीक्षण होते. कृषि शास्त्राची कोणतीही पदवी न घेता त्यांनी कृषि अर्थशास्त्र यात शेतमालाचे हमी भाव ठरविणे, कृषि हवामानशास्त्र यात पर्जन्यमान याबाबतचे अंदाज घेण्यास सांगितले. कृषि विस्तारशास्त्र, कृषि प्रदर्शनी, मेळावे व कृषि वार्तापत्र कसे लिहावे, मेळावे व प्रदर्शनी कशारितीने आयोजित कराव्यात याचे ज्ञान आम्हाला दिले.
पीकशास्त्रात कापूस, तूर, भुईमुग, तेलबिया, धान, उस याबाबतचे खत मात्रा, जमिनीचा प्रकार बियाण्यांची निवड हे शिकविले. उद्यानशास्त्रात, नारळ, काजू व आपल्या भागातील फळे तसेच वनंसवर्धनासाठी पाईन, देवदार या वृक्षांची लागवड व आधुनिक नर्सरीचे तंत्रज्ञान सांगितले. भाऊसाहेबांनंतर एकही कृषि विषयातील तज्ज्ञास किंवा मंत्र्यास हे कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्य झाले नाही. मध्य प्रदेशातील देवास संस्थानात सारंगपूर साखर शेतकरी संस्था काढून क्रांती घडविली.
शेतकर्यांच्या हितार्थ श्री शिवाजी लोकविद्यापीठाची 1951 मध्ये स्थापना करून 16 सप्टेंबर 1951 ला जनता कॉलेज प्रौढांना व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था काढली व तेथेच 1953 ला शेतीवर काम करू इच्छिणार्या मुलांसाठी शाळा सुरु करण्यात आली.
दि. 12-8-1952 ला केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर ऑक्टोबर 1953 ला सर्व राज्यांच्या कृषिमंत्र्यांची परिषद गुजरातमध्ये पोरबंदर येथे महात्मा गांधीजींच्या जन्मगावी घेतली व या परिषदेत सर्क्यूलर लेटर तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त बियाण्याचा वापर करणे या चुकीच्या पद्घतीमध्ये सुधारणा करण्यास सांगितले.
राज्य स्तरावरील शेती व पशुसंवर्धनाबाबत घेतलेले महत्त्वाचे निर्णय, परिषदा, मेळावे याची माहिती प्रत्येक राज्याने दर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत पाठविण्यासंबंधी निर्देश दिले. या सर्क्यूलर लेटर्सची सुरुवात 2 ऑक्टोबर 1953 ला शुभ मुहूर्तावर केली. 1953 साली मधमाशीपालनाचे बंद झालेले कार्य नवीन उत्साहाचे संघटित करून मध गोळा करण्यासाठी आधुनिक यंत्राचा उपयोग करण्यास सांगितले. या यंत्रात मधाची गुणवत्ता उच्चप्रतीची होती. मधमाशीपालनाचा प्रचार करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळांकडून प्रदर्शनी भरविली. ताडापासून गुळ तयार करणे, निंबोळी तेलापासून साबू करण्याचा उद्योग, शिवाजी संस्थेच्या ग्रामोद्योग मंदिरात सुरु केला.
भारत कृषक समाजाची घटना तयार करून 7-2-1955 ला रजिस्टर्ड केली व 1-4-1955 ते 5-4-1955 कृषक समाजाचे अधिवेशन दिल्लीत तारकटोरा भागात झाले. 1955 साली लाखोसाठी अन्न या जागतिक संघटनेचे अध्यक्षपदाची सुत्रे मिस प्लॉरेन्स यांनी भाऊसाहेबांडे सोपविली व बंगाली चना व शेंगदाण्यापासून सकस आहार तयार करण्याची योजना आखली. 1956 मध्ये कलकत्त्याला आंतरराष्ट्रीय अन्न व कृषि संघटनेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून विवाह करण्यात आली. दि. 12-11-1956 ला अध्यक्षीय भाषणात जगातील अन्नधान्याची स्वयंपूर्णता करण्याबाबत मार्गदर्शन केले.
शेतीस जोडधंदा पशुपालन :
भाऊसाहेबांच्या शेतीस जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी व मेंढीपालन, वराहपालन हे व्यवसाय शेतकर्यांनी सुरु करण्यासाठी विदेशातून उत्तम प्रतीचे जनावरे व लेंगहार्न जातीची कोंबडी, जर्सी, होलेस्टीन गायी, मेरीनो मेंढी आयात केली. पापळ येथे शामराव बापुच्या घरी राधाबाई एका म्हशीच्या पालन पोषणातून दुधाची विक्री करून आर्थिक मदत संसारात करत असे हे भाऊसाहेबांना ज्ञात होते.
बारावी अखिल भारतीय पशुप्रदर्शनी बहादुरगड रोहतक हरियाणा येथे दि. 23 ते 28 मार्च 1954 च्या काळात आयोजित केली. अखिल भारतीय कुक्कुट प्रदर्शनी दि. 25 ते 27 मार्च 1954 आयोजित केली व 41000/- रु. बक्षिसे ठेवली. प्रथम राष्ट्रीय कृषि प्रदर्शनी कलकत्ता येथे 8 जानेवारी 1961 ते मार्च 1961 आयोजित केली. या प्रदर्शनात रशिया, जापान, जर्मनी या देशांचा सहभाग होता. जगाती ल उत्कृष्ट कोबीचे बियाणे शेतकर्यांना बाजार भावापेक्षा कमी भावात उपलब्ध करून दिले. 14 जानेवारी ते 11 मार्च 1962 पर्यंत राष्ट्रीय कृषि प्रदर्शनीचे दुसरे अधिवेशन मद्रासला घेतले. कृषि प्रदर्शनीत शेतकर्यांना कमी भावात उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करणे याला त्यांचे प्रथम प्राधान्य राहायचे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जागतिक स्तरावरून भारताची कृषि संस्कृती व विदेशातील बलशाली राष्ट्रांचा सहभाग याबाबतचे सर्वात मोठे प्रदर्शन व गणमान्य व्यक्तींची हजेरी नंतर कोणासही शक्य झाली नाही. या कृषि प्रदर्शनाची घोषणा 27 जून 1958 रोजी केली. दिल्लीत 118 एकरावर विभागात असलेले प्रदर्शन भारत कृषक समाजाच्या संघटनेमार्फत 11 डिसेंबर 1959 ते 14-2-1960 पर्यंत एकूण 66 दिवसांचे प्रदर्शन झाले. जागतिक कृषि प्रदर्शनाच्या निमित्ताने जगातील सर्व राष्ट्रप्रमुखांना निमंत्रणे गेली. देशविदेशतील असंख्य शेतकरी यांचे चर्चासत्र, तांत्रिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन थोडक्यात ही घटना अविस्मरणीय होती.
अमरावतीला भाऊसाहेबांच्या हीरक महोत्सवानिमित्त 15 दिवसांचे कृषि व पशुप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले व 26-12-1960 ला दोन लक्ष शेतकर्यांनी उपस्थिती दर्शविली होती.
भाऊसाहेबांनी विदेशात होणारी गव्हाची शेती उदा. मेक्सिको, कॅनडा व तांदळासाठी फिलीपाईन्स, जपान, इंडोनेशिया, युगोस्लॉव्हिया या देशात भारतातील शास्त्रज्ञ व शेतकर्यांना पाठविले. भविष्यात भारतीय शेतीला मजुरांचे मनुष्यबळ सहजासहजी उपलब्ध होणार नाही, यासाठी त्यांनी त्या काळात शेतीचे यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टर, फवारणी यंत्र, मळणी यंत्र, ओलितासाठी डिझेल पंप, ज्युट कापणीसाठी आधुनिक यंत्र, आधुनिक बैलगाड्या व सर्व प्रकारचे दुरुस्तीचे आधुनिक केंद्र स्थापन केले. देशात विविध प्रकारच्या जमिनी आहेत त्यात बराच मोठा भाग खार जमिनीचा असल्यामुळे अशा जमिनीचा विकास करण्यावर भर दिला.
भारतातील लोकांनी उपाशी मरु नये उपाशी लोकांना अन्न पुरविणे त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य ठरते यासाठी भारत सरकार, अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलियातूनअब्जावधी रुपयांची धान्याची आयात करण्यात येत असे म्हणून डॉ. भाऊसाहेबांनी रोम येथील अन्न परिषदेत आवाहन केले की, हे अब्जावधी रुपये मला द्या मी अवघ्या पाच वर्षात देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करुन दाखवितो एवढा आत्मविश्वास त्यांच्यात होता.
दि. 9 एप्रिल 1965 ला शुक्रवारी लोकसभेत शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा केली व 10 एप्रिलची रात्र सुरु होताच आयुष्याचा प्रवास संपविला, पंरतु विदर्भातील शेतक-यांसाठी त्यांच्या हक्काचे श्री. शिवाजी कृषि महाविद्यालय 1959 मध्ये सुरु करुन व ही सर्वस्वी जबाबदारी त्यांनी महाविद्यालयाच्या अध्यापक मंडळीवर सोपविली व त्यांनी दिलेल्या आदेशानुसार हे महाविद्याल शेतक-यांना सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहे. हीच या निमित्ताने भाऊसाहेबांना आदरांजली अर्पण करतो.
_________________________________________________
प्राचार्य, डॉ. नंदकिशोर चिखले, प्रा.डॉ. एन.डी राऊत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)
No comments:
Post a Comment