27.12.2011 ला पूज्य भाऊसाहेबांची 114 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने काही आठवणी प्रकाशित करण्याचा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा मनोदय आहे, असे श्री अशोकराव कोंडे यांचेकडून मला कळवण्यात आले. ते सध्या संस्थेत जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भाऊसाहेबांशी माझ्या आलेल्या संपर्कासंबंधी त्यांना कल्पना असल्यामुळे मी सुध्दा काही आठवणी मांडाव्यात अशी त्यांनी मला विनंतीवजा सूचना केली. त्याला अनुसरुन चार शब्द लिहित आहे. भाऊसाहेबांचे वैयक्तिक सचिवही एक कोंडेच होते हा योगायोग.
भाषावर प्रांतरचना 1956 ला होण्यापूर्वी आपला विदर्भ C.P & Berar (Central ProVinces Berar) या हिंदी व मराठी या व्दिभाषिक राज्यात समाविष्ट होता. मंत्री मंडळामध्ये व प्रत्येक कार्यालयातील अधिकारी तथा कर्मचा-यांमध्ये हिंदी भाषिक लोकांचे प्राबल्य असे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास 1946 ते 1950 या काळात मी नागपूरच्या कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी असताना तेथे प्राचार्य व प्राध्यापक श्रीवास्तव, त्रिवेदी, दुबे, उपाध्याय असे हिंदी भाषिक किंवा वैद्य, जोगळेकर, जोशी असे मराठी भाषिक, पण बहुधा सर्वच ब्राम्हण वर्गातले होते. अपवाद म्हणून केवळ एक डेअरीचे प्राध्यापक एस.टी पाटील तेवढे अब्राम्हण-लेवा पाटील होते. त्यांना काम करताना होत असलेल्या त्रासाबद्दल तथा एक त-हेच्या छळाबद्दल त्यांना आम्ही वर्गात रडताना पाहिले आहे.
डॉ.भाऊसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेव्दारा वेगवेगळ्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये उघडून सामान्य मराठी भाषिकांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्याची दूरदृष्टी ठेवली होती. हे वरील पार्श्वभूमींवर अवलोकन केल्यानंतरच्कळून येऊ शकेल. प्रांत पूनर्रचनंतर पुष्कळसे हिंदी भाषिक मध्यप्रदेशात गेल्यामुळे व अब्राम्हण वर्गातील लोक शिक्षणात पुढे येऊ लागल्यामुळे आज त्याच कृषिमहाविद्यालयात ते बहुसंख्येने कार्यरत आहेत. ही सगळी पू. भाऊसाहेबांची दूरदर्शीपणाची देण व कृपा.
कॉलेजचे शिक्षण एप्रिल 1950 ला संपल्यानंतर मी माझे खेडे गांवी दिघीला उन्हाळ्याची सुटी घालवत असताना त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन नाशिक येथे भरणार होते. माझे वडील काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते व दोनदा तुरंगवास भोगलेले स्वातंञ्यसंग्राम सैनिक असल्यामुळे माझीही ते अधिवेशन बघण्याची इच्छा झाली. श्री ओंकारराव महल्ले या काकांचे सोबत मी नाशिकला गेलो. तेथे संयोगवश मलकापूर भागातला माझा कॉलेज मित्र नामदेव तुकाराम बढे हा भेटला.अधिवेशनाला. उद्या आपण सोबतच जाऊ असे मी म्हटल्यानंतर त्याने सांगितले की दिल्लीच्या पूसा इन्स्टि्यूटच्या अॅडमिशनसाठी मला भाऊसाहेबांना भेटायचे आहे. त्याने भाऊसाहेबांच्या राहत्या ठिकाणाबद्दल पूर्ण चौकशी केलेली होती. आणि हा क्षण माझ्या आयुष्याला वळण देणारा ठरला. पूसा इन्स्टिटयूटचा फॉर्म मी सुद्घा भरलेला असल्यामुळे मी त्याला म्हणालो. अरे मी सुद्घा येतो तुझ्याबरोबर भाऊसाहेबांना भेटायला असे ठरवून दूसरे दिवशी सकाळी सुमारे 7.30ते 8 चे सुमारास आम्ही त्यांचे निवासस्थानी पोचलो. भाऊसाहेब त्यावेळी आतमध्ये सोफ्यावर बसून दाढी करत होते. चेह-यावर साबण लावलेला होता. तशाच परिस्थितीत आम्हाला बाहेर ताटकळत न ठेवता भेटीसाठी आतमधे बोलवले. कशाकरता आलात हे विचारल्यानंतर आम्ही सांगितले की दिल्लीच्या IARI मधे (Indian Agricultural Research Institute) मध्ये अॅडमिशन साठी आलो आहोत. अजूनपर्यंत आम्हाला मुलाखत पत्र आलेले नाही. आम्ही आजवर प्रतीक्षा करत होतो? त्यावर भाऊसाहेब म्हणाले अरे काल मुन्शी इथेच होता. त्याला सांगितले असते. पण काही हरकत नाही. मी गेल्यावर बघतो. श्री. के.एम. मुन्शी त्यावेळी कृषिमंत्री होते. मग त्यांनी आमची नावे विचारलीत. मी नाव सांगितले महल्ले ते ही राहील लक्षात, कारण माझेही तेच आहेत असे म्हणून त्यांनी माझे नाव ऐकल्याबरोबर एका क्षणात भाऊसाहेब म्हणाले, अरे तुला तर Backard Scolarship मिळाली आहे. पण त्याचा उपयोग व्हायला तुला अॅडमिशन मिळावला पाहिजे हे ऐकल्यानंतर भाऊसाहेबांना स्कॉलरशिप मिळवणा-या लोकांमधून माझे नाव कसे बरे लक्षात राहिले असेल?या विचाराने मला खूपच आश् चर्य वाटले. नंतर त्यांनी पदस्पर्श, नमस्कार करुन परत आलो. नंतर 8-10 दिवसातच आम्हाला मुलाखत पत्र आलेत व दोघांच्याही अॅडमिशन्सही झाल्यात. विद्यार्थी असला की एका ति-हाईताचेही काम भाऊसाहेब किती आपुलकीचे व तळमळीने करायचे हे सांगायला भाऊसाहेबांशी आमचा नाशिकला झालेल्या संवादाचा दाखला मी आजवर अनेकांना देत आलो आहे. कारण ही त-हा आणि शैली मला तरी इतरत्र कुठेही आढळलेली नाही.
पूसा या मूळ जागेहून स्थलांतरीत झालेली ही संस्था Associate IARI हा डिप्लोमा देत असे. इतरत्र डिप्लोमा म्हणजे M.Sc. डिग्रीच्या खालचा असा समज असतो. पण ह्या डिप्लोम्याकरता मध्यप्रदेश तथा उत्तरप्रदेशातून M.Sc. झालेल्या शासकीय कर्मचा-यांना Govt. Deputation वर शिक्षणासाठी पाठवण्यात येत असे. आमच्या बॅचला असे किमान 5-6 विद्यार्थी होतेच. त्या प्रवेशाच्या भरवशावर आम्ही तेथून बाहेर पडल्यानंतर आपल्या राज्यात लगेच Reserch Assistant Awdm Lecturer / Assistant Professor अशा पदांवर कृषि खात्यात नोकरीला लागलो व सध्या सेवानिवृत्त होवून समाधानाचे जीवन जगत आहोत.
दिल्लीला IARI मध्ये आम्ही होस्टेलमध्ये रहायचो. हा कोर्स 2 वर्षाचा होता. विदर्भाचे म्हणजे नागपूर कॉलेजचे 2 वर्षाचे मिळून 10-15 विद्यार्थी असायचो. माझे आधीचे बॅचचे तेथे असलेले बुलढाणा जिल्ह्यातील मंत्री खेडेकर येथील पांडुरंग कोंडूजी खेडेकर हे माझे विशेष जवळचे होते व दुसरे के.एस.चिमा हे नागपूरचे 4 वर्षाचे काळात माझेशी एक शब्दही न बोललेले पुढे माझे जिवलग मित्र झाले.
खेडेकरांच्या परिचयाचे श्री भटकर नावाचे एक मेंबर ऑफ पार्लमेंट त्यावेळी दिल्लीला होते. त्यांचे राहण्याचे ठिकाणाला Parliament House म्हणत. तेथेच एम.पी असल्यामुळे पू. भाऊसाहेबांचेही वास्तव्य असायचे. आमचे होस्टेल पासून हे ठिकाण सुमारे 7-8 कि.मी असावे. माझे मित्र खेडेकर हे श्री भटकर साहेबांना अधून-मधून भेटायला जात असत. त्यांची सोबत असल्यामुळे पू. भाऊसाहेबांच्या भेटीच्या ओढीने मी सुद्घा खेडेकरांसोबत जायला लागलो. आम्ही दोघेही सायंकाळी सायकलने त्यांचेकडे जायचो, व भेट घेऊन त्यांचा जास्त वेळ न घेता परत यायचो. आमचा कोर्स सुरु झाल्यानंतर लवकरच भाऊसाहेब केंद्र शासनाचे कृषिमंत्री झालेत.
अशाच एका भेटीप्रसंगी भाऊसाहेबानंतर सोसायटीचे अध्यक्ष झालेले श्री बाबासाहेब घारफळकर यांना मी तेथे पाहिले होते. दुस-या एकाभेटीचे प्रसंगी भाऊसाहेबांनी मला विचारले-एवढ्या स्कॉलरशिपचे काय करशील?मला त्यावेळी एक रकमी वार्षिक रु.800 -स्कॉलरशिपचे मिळायची. मी म्हणालो सांगाना काय करु? भाऊसाहेब म्हणाले - दे रु.250 - सोसायटीला त्यांचे शब्द शिरसावंद्य मानून दुसरे भेटीचे वेळी मी रु. 300- घेऊन गेलो व त्यांना दिले त्यानंतरचे भेटीत भाऊसाहेबांनी मला 6.8.1951 ची क्र. 59 असलेली श्रद्धानंद सोसायटीला देणगी म्णून स्वीकारलेली रु 125- ची पावती आणून दिली व दुस-या भेटीत दुसरी एक पावती 28.2.1952 ची क्र. 343 रु. 150- ची मेंबर फी म्हणून स्वीकारलेली. ह्या दुस-या पावतीनुसार त्यांनी मला सोसायटीचे आजीव सभासदत्व दिले होते.त्याचा प्रत्यय मला पुढे अकोल्यास नोकरीत असताना येत होता. मला वार्षिक सभेचे निमंत्रण, अहवाल वगैरे 1962 पर्यंत येत असत. त्यानंतर पुढे माझ्या बदल्या होत गेल्या व मी सोसायटीला नवीन पत्ता न कळवल्यामुळे किंवा इतर कोणताही पत्र व्यवहार न केल्यामुळे ते अहवाल वगैरे येणे माझ्याच दुर्लक्षामुळे व निष्काळजीपणामुळे बंद झाला. आता तो विषयही माझ्यासाठी संपला आहे.
कधी कधी मला भाऊसाहेबांवर जातीयतेचा आळ आणलेला आढळतो. पण नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचे निवडणुकीकरता पू. भाऊसाहेबां विरुद्घ नागपूर हायकोर्टाचे तत्कालीन न्यायमूर्ती श्री. पी.पी. देव यांच्यात लढत झाली होती, व त्यात श्री देव हे निवडून आले होते. आमचे कॉलेज शिक्षणाचे काळात सगळीकडे कोणत्या समाजाचा पगडा होता हे मी सविस्तर सांगितलेच आहे. त्याचाच परिणाम भऊसाहेबांच्या पराभवात झाला होता. पण भाऊसाहेबांचे मनात अशा जातीभेदाचा लवलेशही नव्हता. सौ.कुसुमावती देशपांडे यांना भाऊसाहेबांनी सोसायटीत मानाचे पद दिले होते, हे सर्वश्रुत आहे. एका व्याख्यानात व इतर वेळीही भाऊसाहेब जातीयवादी असलेच तर ते शेतकरी आणि विद्यार्थी या दोन जातीचे कैवारी होते, इतर कोणत्याही पोटजातीचे नव्हते हे मी ठासून सांगत आलेली आहे. ऑक्टोबर 1950 ते ऑक्टोबर 1952 या काळात दिल्लीचे शिक्षण आटोपून मी मुळगावी दिघीस परत आलो. तेथून निघण्यापूर्वी राजपाटावर जावून पू. महात्मा गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेऊनच, निघालो होतो.
पू. भाऊसाहेब इंग्लंडमध्ये बॅरिस्टर व्हायला गेलेत त्यावेळी त्यांचे सोबत बॅरिस्टर व्हायला गेलेली इतरही मंडळी होती त्यात सर्वश्री बागवे, एन.एम.देशमुख, एम.बी. तिडके, ई.टी.पाटील हे लोकही बॅरीस्टर होवूनच परतले होते.
एरंडगांवच्या बॅ. मोतीराम बाजीराव तिडके यांचे पत्नीची तब्येत त्यावेळी खूप वाईट होती त्यात त्यांच्या मुलींच्या लग्नाचा प्रसंग समोर होता. त्यांची पत्नी म्हणजे यवतमाळचे श्रीमंत अंबादास ऊर्फ बाबुराव भुमरेची बहीण त्यावेळी मी दिघीलाच नोकरीचे शोधात होतो. त्यावेळी तिडके ह्या त्यांच्या मित्राच्या मुलीकरता भाऊसाहेबांनी माझे नाव सुचवले होते. त्यानुसार तिडकेकडील कर्ती मंडळी माझेकडे दिघीला आलीत. माझे वडील, काका वगैरे सोबत त्यांची बैठक व जेवणखाण संपल्यानंतर मला त्यांचे सोबतच यवतमाळला भुमरेकडे घेऊन गेलेत. अहिल्याबाई सारख्या पेहेरावातल्या व रुबाबातल्या बाबुरावांच्या मातोश्री श्रीमती ताईसाहेब भुमरेंनी माझी विचारपूस केली. एरंडगांवच्या तिडके घराण्यातमाझी आत्या दिलेली असल्यामुळे लग्न जुळायला आडकाठी आली नाही. त्यानंतर शक्य तितक्या लवकर फेब्रुवारी 53 मधे माझा विवाह आटोपला. बहिणीची तब्येत गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे भुमरे साहेबांनीच लग्नाचा सारा खटाटोप स्वत:सांभाळून त्यांचे बंगल्यातील मोकळ्या जागतेच लग्न सोहळा संपन्न केला व लग्नानंतर एक महिन्याचे आतच सौ. कमलाबाई मोतीरामजी तिडकेंनी नागपूरला मेडीकल कॉलेज हॉस्पीटलमधे जगाचा निरोप घेतला. माझे लग्न मंडपात पू. भाऊसाहेब स्वत: हजर होते. भुमरे साहेबांनी स्वत:च्या 12000 एकरापैकी एक हजार एकर जमीन विनोबाजींच्या भूदान यज्ञात व तुकडोजी महाराजांचे उपस्थितीत दान केली होती.
लग्नानंतर चार महिन्यातच मी अकोल्यास नोकरीवर रुजू झालो, Research Assistant या पदावर. सेंट्रल गव्हर्मेंटच्या T.C.M (Technical Co-peration mission) असे त्या स्कीमचे नाव होते. माझे अधिकारी साहेब म्हणजे नागपूर कॉलेजचे केमेस्ट्रीच प्राध्यापक श्री. आर.सी. श्रीवास्तव, Agrl-Chemist to Govt.of M.P या पदाचेही काम पहायचे.
त्यावेळी बहुतेकांना कल्पना होतीच, की भाऊसाहेबांना अमरावतीच्या रुरल इन्स्टीट्यूटच्या परिसरात शासकीय कृषि महाविद्यालय स्थापण्याची खूप मनापासून इच्छा होती. पण राजकीय क्षेत्रात आपल्या अधिकाराचा वापर करुन कशी खेळी करण्यात येवू शकते याचा प्रत्यय मला आला. भाऊसाहेब कुठेतरी परदेश दौ-यावर असल्याची संधी साधून अकोल्याच्या राजकारणाचे काँग्रेसचे धूर्त कार्यकर्ते व म.प्र. शासनाचे अर्थमंत्री श्री ब्रिजलालजी बियाणी यांनी डाव साधला. पैसे पुरविण्याची किल्ली त्यांचेच हातात असल्यामुळे कसलीही अडचण त्यांना आली नाही. माझे साहेब श्रीवास्तव यांना Officer on Special Duty नेमून अकोल्यास कृषि महाविद्यालय उघडण्यासाठी योग्य जागा शोधण्यासाठी नेमले. ते आल्यानंतर बियाणीजींच्या प्रभावाने आणि सहकार्याने मुंगीलाल बाजोरीया हायस्कूलच्या भव्य इमारतीच्या एका विंगमधे कॉलेज थाटण्याचे ठरले. दोन तीन दिवसातच मुख्यमंत्री श्री रवीशंकर शुक्ला यांचे हस्ते मुं.बा. हायस्कुलच्या प्रांगणात छोटेसे स्टेज उभारुन उद्घाटनाचा सोहळा बियाणीजींचे उपस्थितीत पार पडला.
श्रीवास्तव साहेब हे माझेही साहेब असल्यामुळे मी सुद्घा कार्यक्रमाला उपस्थित होतो. ही 1955 सालची गोष्ट आहे. त्यापुढे तत्काळ शिक्षक वर्गाच्या नेमणूका करण्यात आल्या व श्रीवास्तव साहेब म्हणून नियुक्त झालेत. अशा त-हेने भाऊसाहेबांच्या इराद्यावर पाणी फेरण्यात आले व त्यांना शक्य झाले तेव्हा अमरावतीला सोसायटीतर्फे चालवण्यात येणारे स्वतंत्र खाजगी कॉलेज कृषि महाविद्यालय उघडावे लागले. त्याचे पहिले प्राचार्य श्री एन.सी.देशमुख यांना नेमण्यात आले. ते पूर्वीच आर्टस् अँड कॉमर्स्कॉलेजचे प्राचार्य होते म्हणून हा अधिकच चार्ज होता.
मी अकोल्यास नोकरीत असतानाच, भाऊसाहेबांनी आपल्या मित्राच्या मुलीकरीता लग्नाची भेट म्हणून Farmers couples exchange या कार्यक्रमाअंतर्गत आम्हा पती पत्नींना अमेरिकेच्या दौ-याचा प्रोग्राम पाठवला होता. भाऊसाहेबांना मुलगी नसल्यामुळे ते माझे पत्नीलाच मुलगी मानत असत. अनंतरावांना भाऊबिजेचे प्रसंगी सौ.इंदिराने ओवाळल्याचे मी दोनदा पाहिले आहे. हा अमेरिकेचा दौरा कार्यक्रम हातात पडला त्यावेळी माझी पत्नी गरोदर असल्यामुळे मला तिकडे जाण्यास नकार द्यावा लागला. त्यानंतर लगेच भाऊसाहेबांनी रेवस्याचे श्री नारायणराव महल्ले व पत्नी सौ. स्नेहलता यांना माझे ऐवजी पाठवले व त्या प्रपोजलचा उपयोग करुन घेतला. तेथून परतल्यानंतर नारायणराव सांगत असत की माझे नावाचेच, निमंत्रण त्यांना अमेरिकेत मिळायची अशा भाऊसाहेबांना इतक्या जवळून पाहता येण हे माझे भाग्यचं.
शेवटी एक आठवण नमूद कराविशी वाटते. पू. भाऊसाहेबांचे दि. 10.4.65 रोजी दिल्लीला अचानक देहावसान झाले. प्रथेनुसार साधारण माणसाचा देखील मृतदेह त्याचे गांवी नेण्यात येतो. त्यानुसार म्हणा किंवा श्री शिवाजी शिक्षण संस्थतील त्यांच्या सर्व सहका-यांचे, विचारवंतांचे इच्छेनुसार पू. भाऊसाहेबांचा देह अमरावतीस त्यांच्या कार्य नगरीत आणून त्यांच्या अंत्यदर्शनांचा लाभ सर्वांना व्हावा व सर्व आप्तेष्टांच्या उपस्थितीत त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा ही सर्वसामान्यांची आंतरिक भावना असणे स्वाभाविक होते. परंतु हा निर्णय घेण्याचे मुख्य अधिकार पत्नी श्रीमती विमलाबाई देशमुख ह्यानांच असल्यामुळे सगळ्यांचे इच्छेचा निरस करुन अंत्यसंस्कार दिल्लीलाच करण्यात आले, व अस्थी मात्र लोकदर्शनासाठी नागपूरला व अमरावतीला पाठवण्यात आल्यात. श्रीमती विमलाबाई स्वत: उच्चशिक्षित विदुषी होत्या व स्वत:चे व्यक्तिमत्त्वाचे बळावर मेंबर ऑफ पार्लंमेंट राहिलेल्या होत्या, पण ह्या निर्णयामुळे त्या थोड्या हेकेखोरही होत्या हे सर्वांच्या लक्षात आले.
त्यानंतर श्रीमती विमलाकाकी नागपूरला मुलगा अनंतरावांसोबत स्थायिक झाल्यात. युनिव्हर्सिटी लायब्ररीचे मागचे बाजूस रोडवरच त्यांचा फ्लॅट होता. तेथे मी व माझी पत्नी दोघेही अधून मधून भेटत होतो. त्यांना कधी कधी मक्याचे भुट्टे आणून दिल्याचे आठवते. भाऊसाहेबांच्या सहवासातल्या आठवणींना उजाळा देत विनम्र अभिवादन करतो.
_____________________________________________
श्री. प्रभाकर शेषराव महल्ले, रुख्मिणी नगर, अमरावती.
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)
No comments:
Post a Comment