शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

संस्था स्थापनेची पार्श्वभूमी व भाऊसाहेबांचे योगदान__एस. बी. उमाळे

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठा परिषदेचे 1917 साली खामगाव येथे अधिवेशन संपन्न झाले. त्या काळात बेरार एज्युकेशन सोसायटीचे एक हायस्कूल व एक होस्टेल एवढाच विस्तार होता. अकुशल व दुरदृष्टिहीन नेतृत्वामुळे ते हायस्कूल बंद पडायच्या स्थितीत आले. तेव्हा डॉ. पंजाबराव देशमुख वर्‍हाड प्रांताचे कृषी व शिक्षण मंत्री होते. त्यांनी हायस्कूलला दत्तक घेऊन जीवदान दिले ते शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी शाहू महाराज संस्थेचे पहिले आश्रयदाते म्हणून संस्थेला त्यांच्या प्रति आजही आदर आहे. वरील अधिवेशनात त्यांच्या प्रेरणेने शिक्षणाविषयी जनतेत आस्था निर्माण झाली. त्यांनी या कामासाठी स्वत: दहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली. इतरांनी ही या परिषदेत 25 हजार रुपयाच्या देणग्या जाहीर केल्या. बराच निधी उभा झाला. विदर्भातील बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी एक हायस्कूल काढावे अशी कल्पना या परिषदेत पुढे मांडण्यात आली. दर्यापुरचे श्री माधवराव देशमुख आणि आसेगाव चे श्री यशवंत रायभान पाटील (वाटाणे) या दोघांनी पुढाकार घेतला. यापैकी पहिले असिस्टंट कलेक्टर व दुसरे तहसिलदार पदावर कार्यरत होते. त्या दोघांनी विदर्भ मराठा शिक्षण मंडळ ही संस्था काढली व कायद्याप्रमाणे रजिस्टर करून घेतली. या मंडळामार्फत निवडक गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठा वसतीगृहे काढणे इत्यादी उपक्रम सुरू केले. वर्धा येथील 1921 मध्ये व चिखली येथे 1922 मध्ये मराठा वसतीगृहे सुरु केलीत.
या काळात विदर्भ प्रदेशात सत्यशोधक समाज आणि ब्राम्हणेतर पक्षाने बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या प्रसाराची प्रचंड मोहीम हाती घेतली. ब्राम्हणेत्तर पक्षाचा प्रभाव अधिक असल्यामुळे 1924 च्या डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन श्रीमती सरोजीनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होताच अखिल भारतीय ब्राह्मणेतर काँग्रेसचे अधिवेशन श्री रामस्वामी मुदलीयार यांचे अध्यक्षतेखाली फक्त एक दिवसाचे अंतराने एकाच वेळी संपन्न झाले. विदर्भातील श्री नानासाहेब अमृतकर, पंढरीनाथ पाटील, श्री आनंदस्वामी या ब्राम्हणेतर प्रतिनिधींनी ब्राम्हणेतर काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे घेऊन या अधिवेशनात आपले एक मराठा हायस्कूल उघडावे व त्यासाठी खामगाव येथील मराठा शिक्षण परिषदेत गोळा झालेला निधी हायस्कूलसाठी मिळावा अशी मागणी श्री माधवराव देशमुख व श्री यशवंतराव रायभान पाटील या दोघांनी सन 1925 च्या जुलै महिन्यात अमरावती येथे विदर्भातील बहुजन समाजाचे मराठा हायस्कूल सुरू केले.
डिसेंबर 1925 मध्ये अमरावती येथे अखिल भारतीय ब्राम्हणेतर काँग्रेसचे दुसरे अधिवेशन भरविल्या गेले. मद्रासचे मुख्यमंत्री पानगलचे राजेसाहेब यांचे अध्यक्षतेखाली झाले. अखिल भारतीय ब्राम्हणेतर सामाजिक परिषदेचे अधिवेशन कोल्हापुरचे छत्रपती राजाराम यांचे अध्यक्षतेखाली झाले. या दोन परिषदा मोठ्या धुमधडाक्याने जंगी स्वरूपात पार पडल्या. सर्व विभाग व खात्याकडून याच्या यशस्वीतेकरिता सहकार्य केले गेले परंतु मराठा हायस्कूलने मात्र नाताळच्या सुट्या न घेता शाळा सुरू ठेवून दोन्ही परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. उलट पक्षी श्री छत्रपती राजाराम महाराजांनी देणगीची लालसा बाळगून हायस्कूलला भेट द्यावी अशी हायस्कूलच्या चालकानी विनंती केली. छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार्‍या या विचित्र व असभ्य वर्तणुकीच्या चालकांना स्पष्ट नकार दिला. परिणामी या चालकांबद्दल जनतेत सुद्घा चिड आली. त्यामुळे या हायस्कूलला लोकाश्रय मिळू शकला नाही. थोड्याच वर्षात हे हायस्कूल डबघाईस आले, नाईलाजाने विदर्भ शिक्षण मंडळाने आमच्या जवळचा खामाव परिषदेत मिळालेला निधी संपलेला आहे सबब हे मराठा हायस्कूल आम्ही बंद करीत आहोत असे जाहिर केले.
त्यावेळी पर्याय म्हणून या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांनी 1931 साली मराठा हायस्कूलचे संचालन आपल्या हाती घेतले. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे नामाभिधान करून तिला कायद्याने रजिस्टर केले. अमरावतीतील हीच आजची ब. उ. उ. मा. शाळा होय. या संस्थेचे 16-10-32 ते 9-4-33 पर्यंत अे. डब्ल्यू पाटील अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 10-4-33 ते 13-3-37 पर्यंत रावबहादूर तुकाराम कोल्हे संस्थेच्या अध्यक्ष पदावर होते. त्या काळात हरी आबाजी येवले मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळत होते.
1935 च्या उन्हाळ्यात या हायस्कूलचा दशवार्षिक महोत्सव अमरावती येथील इर्विन रूग्णालयाच्या पूर्वेस असलेल्या तत्कालिन मराठा हायस्कूलच्या पटांगणात मोठ्या इतमानाने व थाटाने पार पडला. डॉ. पंजाबराव देशमुखांसह विदर्भातील मान्यवर मंडळी व पूर्वीचे संचालक सुद्घा या प्रस् ांगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालिन कमिश्नर हेन्री ग्रीनफिल्ड (आय. सी. एस.) हे अध्यक्षस्थान होते. या हायस्कूलची भरभराट व्हावी या पोटतिडकीने डॉ. पंजाबराव देशमुख, पंढरीनाथ पाटील, रावबहादूर, कोरडे व रामव देशमुख यांनी आपल्या भाषणातून इच्छा व्यक्त केली. जनतेत एक नवा उत्साह उत्पन्न झाला.
परंतु देशात आर्थिक मंदीमुळे या हायस्कूलसाठी नवा फंड गोळा होऊ शकला नाही. शिक्षकांना हे हायस्कूल चालविणे फार कठीण होऊ लागले. परिणामी बंद पडण्याच्या स्थितीत आले. अशा स्थितीत वयोवृद्घ नेते व श्री काशीराम बापू देशमुख, मोर्शीचे श्री शामराव यादवराव गुंड व पंढरीनाथ पाटील यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेची सुत्रे आपल्या हाती घ्यावीत असा आग्रह धरला. डॉ. भाऊसाहेबांनी लगेच त्या शिक्षण संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. या संस्थेच्या आर्थिक चणचणीच्या काळात शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये भाऊसाहेब निर्वेतन तत्त्वावरील शिक्षक म्हणून गणित व इंग्रजी हे विषयक शिकवत असत. डॉ. पंजाबरावाच्या नेतृत्वाखाली संस्थेचा कायापालट होण्यास प्रारंभ झाला. श्री शिवाजी मराठा हायस्कूलची जबाबदारी श्री एस. व्ही. देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली. सिरसोचे राव बहादूर देशमुख हे त्यावेळी डेप्युटी सुपरिन्टेन्डेन्ट ऑफ पोलिस होते. इर्विन रुग्णालयाच्या पाठीमागे त्यांचा एक मोठा प्लॉट होता त्या प्लॉटवरच तटट्याच्या खोल्या बांधून मराठा हायस्कूल सुरू होते. त्याला तट्टा हायस्कूल म्हणत.
भाऊसाहेबांनी जमेल तेथून, भटकंती करून निधी गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले. हैदराबादचे निजामाला इंग्रजांकडून दरसाल 35 लाख रुपयाचा विदर्भ विकासासाठी फंड मिळतो हे भाऊसाहेबांना ठाऊक होते. त्याकरिता प्रतिष्ठितांचे एक मंडळ 1938 ला हैदराबादला जाऊन आले. निजामाकडून देणगी मिळविण्याच्या मुद्यावर डॉ. भाऊसाहेबांवर संस्था परिवारात बरीच कुजबुज सुरु झाली. टिकाटिप्पणी पण खुप झाली. भाऊसाहेबांनी बोलणारांची चांगली कान उघाडणी केली व याचवेळी काशीराव देशमुख आणि शामराव गुंड यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी जबाबदारीच्या तत्वार आधारलेली नवी घटना तयार करण्याचा व डॉ. पंजाबराव भाऊसाहेबांना आजीव अध्यक्ष बनविण्याचा प्रस्ताव दोघांनी मिळून आमसभेत मंजुर करून घेतला. या शिवाजी शिक्षण संस्थेच्या नवीन घटनेप्रमाणे डॉ. पंजाबराव 14-3-1937 ला आजीव अध्यक्ष बनले. श्री बापुसाहेब देशमुख उपाध्यक्ष आणि श्री एस. व्ही देशमुख यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. निजामाला एक मानपत्र देऊन विदर्भातील मागासवर्गीय लोकाच्या शिक्षण संस्थांना मदत देण्याची मागणी पुढे केली. परिणामी 20 हजार रूपयाची देणगी निजामसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला दिली. पुढील हप्ता निजाम पुत्राच्या अमरावती भेटीत मिळू शकतो असे संकेत सुद्घा मिळाले. 1944 मध्ये निजाम पुत्राची (प्रिन्स ऑफ बेरार) अमरावती येथे संस्थेला भेट देण्याची तारीख प्रसिद्घ झाली. भाऊसाहेबांनी वर्‍हाड मध्यप्रांत मराठा शिक्षण परिषदेचे अधिवेशन भेटीच्या तारखेच्या पहिल्या दिवशी मुद्दाम आयोजित केले. या प्रसंगी निजाम पुत्राकडून 38 हजार रुपयाची देणगी मिळाली. देणगीचा तिसरा हप्ता 2 लाख रूपयाचा देण्यात येईल अशी घोषणा सुद्घा केली. 1946 मध्ये निजामसाहेबांचे मुख्यमंत्री सर इस्माईल यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला भेट देऊन दोन लाख रूपयांची देणगी सुद्घा प्रदान केली. निजाम साहेबांच्या आर्थिक मदती इतकीच त्यावेळचे मध्यप्रदेश सरकारचे एक प्रशासक सर हेन्री ग्रीनफिल्ड यांनी संस्थेला लाखो रूपये किंमतीची 21 एकर सरकारी जमीन प्रथम अनुदान म्हणून दिली. त्यावरच श्री शिवाजी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या इमारती उभ्या आहेत. अशाप्रकारे दात्यांच्या दातृत्वामुळे संस्था भरभराटीस येत आहे.
जुलै 1931 च्या श्री शिवाजी मराठा हायस्कूलच्या स्थापने पाठोपाठ अमरावती येथे 1947 मध्ये शिवाजी मराठा हायस्कूल, स्टेशन ब्रँच ही शिक्षणापासून वंचित असलेल्या जनतेसाठी धनराज गल्ली (हमालपुरा) मध्ये व कस्तुरबा कन्या शाळा 1-4-52 मध्ये चिचफैल परिसरात सुरु करण्यात आल्या. अतिशय बिकट परिस्थितीत संस्थेची व शाळा महाविद्यालयाची सुरुवात झाली आहे. भाऊसाहेबांच्या पुण्याईने संस्था पुढे वाढत गेली.
आज संस्थेच्या एकूण विविध भागात 73 माध्यमिक शाळा अस्तित्वात आहेत.
_________________________________________
एस. बी. उमाळे, झेप, गाडगेनगर, अमरावती

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) 

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा