शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

आमचे शक्तीस्थळ__प्राचार्य श्री. एम. एम. लांजेवार

भाऊसाहेबांचे प्रथम दर्शन : 
साधारण 1948 च्या जुलैचा दुसरा सप्ताह. प्राचार्याच्या चेंबरमध्ये भाऊसाहेबांनी मला पाचारण केल्याची वार्ता चपरशाने दिली. भितभित आत प्रवेश केला आणि डॉ पंजाबराव शामराव या लोकोत्तर महामानवाचे प्रथम दर्शन घडले. पित्याच्या मायेने, आपुलकीने त्यांनी आस्थेने माझी विचारणा केली. खासदार या नात्याने पू. भाऊसाहेब दिल्लीत कामात व्यग्र व व्यस्त असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत दि. 15-6-48 ला शिवाजी कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. ज्वालाप्रसाद आणि उपप्राचार्य एन. सी. देशमुख यांनी माझी त्या महाविद्यालयात वाणिज्य विषयाच्या प्राध्यापक पदासाठी मुलाखत घेतली. माझी निवड झाल्याचे आणि ताबडतोब रुजू होण्याचे आदेश दिले. त्यानुसार 20-6-1948 रोजी मी प्राध्यापक पदावर रुजू झालो. पू. भाऊसाहेबांचे अमरावतील आगमन झाल्यावर नवनियुक्त प्राध्यापकांची विचारणा करण्याकरिता ते महाविद्यालयात आले होते. त्यांनी काही औपचारिक प्रश्न मला विचारले, मी शिकवित असलेले विषय, त्यात येणार्‍या अडचणी यांची चौकशी करून मला कसलाही त्रास होत तर नाही ना, राहण्याची व खाण्याची सोय कशी केली अशी चौकशी केली. मी दिलेल्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाले. माझ्या नियुक्तीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले. आशीर्वादपर शुभेच्छाही दिल्या. त्यांचे कर्तृत्व, भारदस्त व्यक्तिमत्व आणि राहणीतील साधेपणा यांच्यामुळे मा. भाऊसाहेबांपुढे आदराने माझी मान आपोआप झुकली आणि प्रसन्न मनाने मी त्यांचा निरोप घेतला.

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीची स्थापना :

ही शिक्षण संस्था व तिच्या अंतर्गत शिवाजी कॉलेज यांच्या स्थापनेमागे बराच इतिहास आहे. त्या काळी भारतीय शेतकरी ऋणाच्या ओझ्याखाली आकंठ बुडाला होता. शेतकरी ऋणातून जन्मास येणे, ऋणातच सारे जीवन जगतो व मरतोही ऋणातच अशी वास्तुस्थिती होती. भाऊसाहेब स्वत: कास्तकाराचा पुत्र असल्यामुळे शेतकर्‍यांचे अज्ञान, फलस्वरूप दैन्यावस्था, सावकारांकडून होणारी पिळवणूक (आजही या परिस्थतीत फारसा फरक पडलेला नाही. आर्थिक विवंचना, निसर्गावर अवलंबून असणार्‍या शेतातील अनिश्चित पिकामुळे उपासमार यांच्या दडपणाखाली हताश होऊन दरवर्षी शेकडो शेतकर्‍यांच्या आत्महत्या अत्यंत बोलक्या आहेत.) त्यांना प्रकर्षाने जाणवली. शेतकर्‍यांना दु:खाच्या खाईतून बाहेर काढावयाचे असल्यास त्यांचे अज्ञान दूर करणे व त्यांच्या पाल्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मा. भाऊसाहेबांनी ओळखले. त्यातूनच त्यांच्या प्रयत्नाने 1932 साली श्री शिवाजी शिक्षण संस्था जन्माला आली. येथेच भाऊसाहेबांच्या द्रष्टेपणाचे, दूरदृष्टीचे दर्शन घडते.
त्याकाळी शिक्षणाचा एकाधिकार हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या उच्चभ्रू लोकांकडेच होता. त्याला तडा दिला आणि त्यांचे स्वामित्व संपुष्टात आणले ते भाऊ साहेबांनीच. या संस्थेच्या अंतर्गत शेकडो शैक्षणिक संस्था काढून बहुजनसमाज व मागासवर्गीय यांच्यासाठी शिक्षणाची दारे उघडून ज्ञानगंगा खेडोपाडी घरोघरी पोहचविणारे ते आधुनिक भगिरथ आणि शिक्षण क्षेत्रातील क्रांतीचे प्रवर्तक ठरले. विद्या परम्‌दैवतम्‌या सत्याचा स्वीकार करून आजन्म सरस्वतीची पूजा केली. हजारो नव्हे लाखो बहुजन समाज व कृषिपुत्रांच्या जीवनाला योग्य वळण लावण्याच्या उद्देशाने त्यांच्यातील अज्ञानरुपी अंध:काराचे निर्मूलन करण्यासाठी जीवनाचे रान केले. जीवापाड अथक कष्ट उपसले. खर्‍या अर्थाने ते शेतकर्‍यांचे कैवारी, वाली आणि त्राता बनले.

अमरावतीच्या शिवाजी कॉलेजची स्थापना :

माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणानंतर भाऊसाहेबांनी आपला मोर्चा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळविला. बहुजन समाज, मागासवर्गीय आणि कृषिपुत्रांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी अमरावतीला कला महाविद्यालय काढण्याचा निर्णय घेतला. अमरावती विभागात महाविद्यालय सुरु करण्यासाठी सतत प्रयत्न करून नागपूर विद्यापीठाकडे खेटे घातले. मात्र विद्यापीठातील धुरंधरांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही पण भाऊसाहेब कच्च्या मनाचे किंवा दिलाचे नव्हतेच. एखादे कार्य हाती घेतले की, ते तडीस नेण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. विद्यापीठाच्या भूमिकेला पर्याय व नागपूर विद्यापीठाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापूरचे राजाराम महाराज आणि हैद्राबादचे निजाम यांच्याशी संपर्क साधला आणि हैद्राबाद संस्थानातील कोणत्याही विद्यापीठाशी आपले महाविद्यालय संलग्नीकरण करावयाचा आपला मानस जाहीर केला. निजामांनी यासाठी संस्थेला देणगी जाहीर केली. भाऊसाहेबांच्या निर्धारापुढे नागपूर विद्यापीठ झुकले, त्यांचे डोळे उघडले आणि शेवळी 1946-47 या वर्षी शिवाजी महाविद्यालयाच्या स्थापनेला आणि तेथे कला विभाग सुरू करावयाला परवानगी दिली. 1947-48 सत्रात वाणिज्य शाखा प्रारंभ करावयासही मान्यता मिळाली.

लोकविद्यापीठाची स्थापना :

भाऊसाहेबांच्या महत्वाकांक्षांच्या गरूड झेपेला आकाश हीच मर्यादा होती. त्यांनी लोकविद्यापीठ स्थापनेचे स्वप्न साकारले ते 1952 साली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या शुभहस्ते लोकविद्यापीठाचे उद्घाटन झाले. राष्ट्रपतींची अमरावती भेट ही तेथील जनतेकरीता एक पर्वणीच ! हा ऐतिहासिक भव्य दिव्य सोहळा अमरावतीकरांसाठी पहिलाच असे त्याकाळचे ज्येष्ठ नागरीक म्हणत. या लोकविद्यापीठाचे एकमेव अपत्य म्हणजे जनता कॉलेजची स्थापना. श्री मामासाहेब लोंढे, संस्थेचे सचिव या रुरल इन्स्टिट्युटचे संस्थापक प्राचार्य बनले. केंद्रीय शासनाद्बारे संचालित भारतात अशीच एक संस्था अस्तित्वात असल्याचे भाऊसाहेबांच्या निदर्शनास आले. त्या संस्थेसारखेच अनुदान अमरावतीच्या रुरल इन्स्टिट्यूटला मिळावे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यात ते यशस्वीही झाले.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेची रजत जयंती :

1957-58 या साली श्री शिवाजी शिक्षण संस्थेची रजत जयंती. रौप्य महोत्सव साजरा करण्याकरिता मा. भाऊसाहेब आणि त्यांचे सहकारी यांनी कंबर कसली. कृषिमंत्री भाऊसाहेब यांच्या विनंतीनुसार तत्कालीन उपराश्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते या सोहळ्याचे नेत्रदीपक औचित्य साधून शिवाजी कॉलेज (कॉमर्स) चे माजी विद्यार्थी धैर्यशील वाघ यांनी शिवाजी हे नाटक बसविले. या नाटकाचे विशेष आणि वैशिष्ट्य म्हणजे वाघांनी शिवाजी महाराजांच्या वेषात आपली भूमिका वास्तववादी बनविण्याकरिता घोड्यावर स्वार होऊनच टाळ्यांच्या गडगडात रंगमंचावर प्रवेश केला. या ऐतिहासिक प्रसंगामुळे उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. उपर्निदिष्ट दोन्ही सोहळे भव्य दिव्य, नेत्रदिपक स्वरूपात यशस्वी रितीने पार पाडल्यामुळे भाऊसाहेबांच्या अतुलनीय संघटन चातुर्याची प्रशंसा करावी तेवढी थोडीच होईल.

भाऊसाहेबांचे राजकारण :

देशाच्या राजकारणात ते सक्रीय भाग घेत असले तरी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था व तिच्या अंतर्गत असलेल्या सार्‍या संस्थांना आपल्या राजकारणापासून अलिप्तच ठेवले. तसा शिक्षकवर्ग व कर्मचारी यांच्या त्यांचा संपर्क क्वचितच यायचा. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक निवडणूका यशस्वीपणे लढविल्या. मात्र कोणत्याही कर्मचार्‍यांकडून कसल्याही कामाची अपेक्षा ठेवली नाही. स्वत:च्या कामासाठी त्यांचा वापर करणे तर दूरच !

शेतकर्‍यांच्या आप्तांना शिक्षण शुल्कात सवलत :

1937-38 साली भंडार्‍याच्या शासकीय मन्रो हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना मला कास्तकाराचा पाल्य म्हणून शैक्षणिक शुल्कात एक तृतीयांश सवलत मिळाली व माझे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा लाभ मिळतच गेला. शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना या सवलतीचे रहस्य कळले आणि तिचे सर्वश्रेष् अष्टपैलू (नव्हे अनेक पैलू) असलेल्या भाऊसाहेबांकडेच जाते हे उमगले. 1930 साली ते बटलर मंत्रिमंडळात शिक्षण, कृषी व सहकार या विभागांचे मंत्री असताना शेतकर्‍यांच्या सर्वांगीण विकासाचे, जीवनाचे ब्रीद असलेल्या भाऊसाहेबांनी कास्तकर्‍यांच्या पाल्यांना ही सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. मंत्री म्हणून या तिन्ही विभागांचा त्रिवेणीसंगम त्यांच्या जीवनात अप्रत्यक्षरित्या घडून आला. त्यांची जीवनशैली, त्यांचे ध्येय, साध्य, त्यांचे कार्यक्षेत्र बनले आणि जीवनाचे सार्थ करण्याकरिता त्रिवेणी संगमात स्वत:ला आकंठ बुडवून ते यशस्वी करण्यासाठी त्यांनी उहापोह जीवापाड कष्ट केले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेशी नाते :

भाऊसाहेब म्हणजे संस्था व संस्था म्हणजे भाऊसाहेब हे अद्बितीय, अतूट नाते निगडित झाले होते. ही संस्था म्हणजे भाऊसाहेबांचे जीवन की प्राण होते असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. संस्थेचा सर्वांगीण विकास हे त्यांच्या जीवनाचे जणू एकमेव ध्येय त्यासाठी त्यांनी आपले जीवनच पणाला लावले होते. असे असतानाही खासदार, भारतीय घटना समितीचे सदस्य, केंद्रीय कृषिमंत्री, कृषी व सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचे अध्यक्षपद, आंतरराष्ट्रीय समित्यांचे सदस्यत्व, अध्यक्षपद इत्यादी नात्याने आपल्या कार्यात दुर्लक्ष होऊ दिले नाही. मात्र सोसायटीचे हित जोपासण्याची एकही संधी वाया जाऊ दिली नाही, कसूर केले नाही. यासंबंधीच्या काही ज्वलंत उदाहरणांचा उल्लेख करणे अस्थानी ठरणारा नाही.
एकाएकी द्बितीय महायुद्घाची सांगता झाली, भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात सैनिकांसाठी विदेशांत निर्यात करावयाच्या कित्येक लोकोपयोगी वस्तूंचा साठा पडून होता. त्याची विल्हेवाट लावण्याकरीता वेळोवेळी केंद्रीय सरकार दिल्लीत त्या वस्तूंचा लिलाव करी. या संधीचा फायदा घेऊन भाऊसाहेबांनी सतरंज्या, कार्पेट, तंबू, बूट अशा अनेक वस्तू अल्पमोलात आपल्या पदरी पाडून घेतल्या आणि कमी किंमतीत त्या सर्व कर्मचार्‍यांना आणि आजीव सभासदांना उपलब्ध करून दिल्या. संस्थेत, खिशात काही रकमेची भरही पडली. स्वार्थाबरोबर परमार्थ ! मी स्वत: बूट खरेदी केले असल्यामुळे ही घटना माझ्या स्मरणात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीने वापरलेल्या दोन बुई गाड्या कवडीमोलाने भाऊसाहेबांना लाभल्या. त्यापैकी एक संस्थेच्या वापरासाठी तर दुसरी शिवाजी कॉलेजच्या प्राचार्यासाठी प्रदान करण्यात आल्या. शिवाजी कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य श्री वनमाळी आणि संस्थेचे खजिनदार श्री. एस. व्ही. देशमुख यांच्यात बेबनाव झाल्यामुळे ती गाडी कॉलेजकडून काढून घेतली. त्या वर्षी स्नेहसंमेलनाची संपूर्ण जबाबदारी माझ्या कडे असल्यामुळे रात्री नाटकासारख्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थीनींना रात्री त्यांच्या घरून आणणे व कार्यक्रमानंतर पोहचवून देणे याकरिता गाडीची गरज भासल्याने माझ्या विनंतीवरून श्री. एस. व्ही. देशमुखांनी ती काही दिवसांकरिता माझ्या स्वाधीन केली होती.
एखाद्या संस्थेच्या कर्मचार्‍यांना पगार थकला, पैसा उभारण्यासाठी भाऊसाहेबांकडे फार सोपा 1. मार्ग म्हणजे स्वत:चा बंगला गहाण टाकणे हा होता. वर उल्लेखिलेले विषय अती लहान पण त्यांचा आशय फार महान ! हे सत्य लक्षात घेणे गरजेचे आहे. सोसायटीत व त्यांच्यात कायम स्वरूपाचे सामंजस्य होते, कार्यकारिणीची त्यांच्यावर अतूट श्रद्घा होती. काही महत्त्वाचे निर्णय तत्क्षणी घेण्यात त्यांना हातखंडा होता, काही कार्यकारिणी विश्र्वासात घेऊन तर कधी तिचा विरोध पत्करून ! पण अशा निर्णयाबाबत पश्चात्ताप करण्याची पाळी त्यांच्यावर कधीच आली नाही हे त्रिवार सत्य ! 

संत गाडगेबाबा भाऊसाहेबांबद्दल आपुलकी :

स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींचे साधन होते सत्याग्रह. समाजोन्नतीसाठी डॉ. पंजाबरावांचे साधन होते. शिक्षण तर समाजोद्घारासाठी संत गाडगेबाबांचे साधन होते. झाडू, बाबांच्या कार्याबद्दल भाऊंना श्रद्घापूर्वक आदर होता तर शिक्षण कृषी व सहकार क्षेत्रात क्रांती घडवून आणणार्‍या भाऊसाहेबांबद्दल बाबांच्या हृदयात अपार प्रेम, माया ममता होती. 1952 साली पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात भाऊसाहेबांना कृषिमंत्री नियुक्त केले. काही दिवसानंतर भाऊसाहेबांचे अमरावतीत प्रथम आगमन होणार होते. अमरावती जिल्ह्याच्या सीमेत पदार्पण करताच त्यांचे स्वागत करण्यासाठी सोसायटीची जेष्ठ मंडळी, काँग्रेस कार्यकर्ते आणि बरेचसे नागरिक तिकडे रवाना झाले होते तर सोसायटीच्या पटांगणावर त्यांचा स्वागत व सत्कार समारंभ होणार त्या पटांगणाची झाडून साफसफाई करणे, दगड धोंडे उचलणे या कार्यात गाडगेबाबा मग्न होते. भाऊसाहेबांबद्दलची आपुलकी, आनंद व्यक्त करण्यासाठी गाडगेबाबांनी आपल्या जिव्हाळ्याचा उपक्रम हाती घेतला. भाऊसाहेबांच्या आगमनाप्रित्यर्थ सोसायटीचे सदस्य, शिक्षण प्रेमी, त्यांचे चाहते आणि शाळा कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी तुफान गर्दी केली होती. मी देखील हा हृद्य सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होतोच.

घनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यापदी माझी नियुक्ती :

चौदा वर्षाचा वनवास संपुष्टात आल्यानंतर नागपूर विद्यापीठाने पहिल्यांदाच शिवाजी कॉलेज विद्यापीठ परीक्षांचे केंद्र म्हणून नियुक्त केले. केंद्राधिकारी म्हणून जबाबदारी प्राचार्य एन. सी. देशमुखांवर आली आणि प्रमुख पर्यवेक्षक म्हणून ती त्यांनी माझ्यावर टाकली. आम्हा उभयतांच्या परिश्रमाचे फळ म्हणजे परीक्षा यशस्वीरित्या पार पडणे होय. 1960 साली जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा आटोपल्यावर भाऊसाहेबांच्या अमरावतीतील वात्सल्याचे औचित्य साधून प्राचार्य देशमुखांनी प्राध्यापकांच्या सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात भाऊसाहेब आनंदाने सहभागी झाले. अन्य खाद्यपदार्थांसोबतच झुणकाभाकर व मिरचीचा ठेचा हा भाऊसाहेबांचा आवडता मेनू आवर्जून ठेवला होता. केंद्रीय मंत्र्याच्या मोठेपणाचा आव, संस्थेचे आजीव अध्यक्ष, शिक्षण, कृषी व सहकार क्षेत्रातील दैदिप्यमान कर्तृत्व यांचा तोर नाही. नक्षा नाही, घमेंड व अहंकाराचा तर नामोनिशाण नाही, स्वामी-सेवक ही भावना नाही, उलट सारे सहकारीच या भावनेनेच हसत खेळत सर्वांशी मिळून मिसळून भाऊसाहेब प्रत्येक टेबलापाशी जाऊन प्रत्येक प्राध्यापकाच्या विषयाची व सेवाकालाची आस्थेने चौकशी करीत होते. अर्थात माझीही विचारपूस झालीच. यावर्षी सोसायटी दोन नवीन महाविद्यालय ांची स्थापना व घनवटे नॅशनल कॉलेजमध्ये वाणिज्य व विज्ञान शाखा सुरू करणार असल्यामुळे आणि विद्यमान प्राचार्यांचा सेवाकाल समाप्त झाल्यामुळे मुलाखतीचा हा आगळा वेगळा प्रकार असल्याचे मला जाणवले.
घनवटे नॅशनल कॉलेजमधील गैरप्रकार, अराजकता आणि दैन्यावस्था यांच्या तक्रारींची शहानिशा करण्याकरिता माझी व शिवाजी कॉलेज जेष्ठ प्रमुख लिपिक श्री दौलतराव गोळे यांच्या चौकशी समितीचे गठन करून ताबडतोब अहवाल सादर करण्याचा आदेश भाऊसाहेबांनी काढला तद्नुसार आम्ही उभयता दि. 12-6-1960 ला महाविद्यालयात प्रवेश केला. प्रथम तत्कालीन प्राचार्य डॉ. लोंढे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. स्वत:च्या सहकार्याबद्दल आपली असमर्थता दर्शवून त्यांनी हात झटकले व मुख्य लिपिक पोनीकरच सर्व माहिती देतील असे सांगितले. पोनीकरांकडून मिळालेल्या कॅशबुक व खातेवही चाळताना रोकड पुस्तकात मागील काही महिन्यांच्या नोंदीच नव्हत्या आणि खातेवही तर रामभरोसे ! कॉलेजच्या गव्हर्निंग वॉर्डाच्या सभांचा अहवाल लिहिणे ही जबाबदारी सचिव या नात्याने प्राचार्यांची. या महत्वाच्या रजिस्टरचे अवलोकन करताना आढळले की काही अहवालांवर अध्यक्षांच्या सह्याच घेण्यात आल्या नव्हत्या तर अशा काही अहवालांवर सचिवांच्या सह्यांचा पत्ताच नव्हता. शितावरून भाताची परीक्षा या वाक्प्रचारानुसार एकंदर मवाळग्रंथी कारभाराची प्रचिती आली आणि भाऊसाहेबांकडे आलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे सिद्घ झाले. तरी पोनीकरांना एक संधी देण्याकरिता आवश्यक माहिती, कागदपत्रे, रजिस्टर्स यांची एक जंत्री श्री गोळेंनी तयार करून पोनीकराकडे सोपविली. पण यातून काही निष्पन्न होणार नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ असल्यामुळे मी आणि श्री गोळे यांनी भाऊसाहेबांना सादर करावयाच्या अहवालाचा मसूदा तयार करण्याचे काम हाती घेतले. दोन दिवसात पोनीकरकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्या मसुद्याला पूर्णरूप दिले. त्यात आम्हाला आढळलेला कॉलेजचा अनागोंदी भेंगळ कारभार, प्रशासनाच्या उणिवा, त्रुटी यांची सत्यस्थिती यासंबधीचा सावळा गोंधळ एकंदर हलाखीची परिस्थिती, कर्मचार्‍यांच्या खोलीचे छत पडलेले, झुकलेल्या भिंतींना लावलेले बल्ल्याचे तणाव, जिर्ण झालेली इमारत इत्यादींचा अंतर्भाव असलेला साद्यंत अहवाल दि. 14 जून 1960 ला श्रीमंत दादासाहेब घनवटे यांच्या बंगल्यावर भरण्यात येणार्‍या कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीच्या सभेला प्रारंभ होण्यापूर्वी भाऊसाहेबांना सादर केला. तो वाचून ते सून्न झाले. धक्कादायक अहवाल वाचून उपस्थित असलेले श्री. बाबुराव घनवटे आणि कॉलेजचे खजिनदार यांची ही मती गुंग झाली. भाऊसाहेबांचा निरोप येऊन मी माझ्या गावी तुमसरला जाण्याच्या तयारीत असतांनाच श्री गोळे यांनी माझी प्राचार्य म्हणून आणि त्यांनी रजिस्ट्रार म्हणून भाऊसाहेबांनी नियुक्ती केल्याचा आश्चर्याचा व आनंदाचा धक्का देणारी सुखद वार्ता मला सांगितली. नियुक्तीचे पत्र ते दिल्लीतून लवकरच पाठवतील असेही त्यांनी सांगितले. आम्हाला जास्त वाट पहावी लागली नाही. तीन-चार दिवसातच नियुक्तीचे पत्र मिळाले. त्यांच्या आदेशानुसार प्राचार्य एन. सी. देशमुखांनी शिवाजी कॉलेजमधील पदांतून आमची त्वरीत मुक्तता केली आणि 20 जून 1960 रोजी आम्ही उभयता बाडबिस्तरा घेऊन नागपूरला पोहोचलो. प्राचार्य डॉ. लोंढे व पोनीकर यांच्याकडून चार्ज (चार्ज घेण्यासारखे तरी काही नव्हतेच!) घेतला. डॉ. लोंढे यांची वयाची 60 वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे निवृत्तीचा काळ लोटलेला होताच.

नॅशनल कॉलेजला भाऊसाहेबांची नवसंजीवनी दिलेले 
घनवटे नॅशनल कॉलेज :

कोणत्याही महाविद्यालयाला न लाभलेला न भुतो न भविष्यति असा आगळा वेगळा इतिहास या कॉलेजला आहे, या ऐतिहासिक महाविद्यालयाची स्थापना डॉ. डी. जी. लोंढे यांनी वर्धेत 1935 साली करून ते त्या कला महाविद्यालयाचे स्वत: प्राचार्य बनले. वर्धेचे कोणी एक वासुदेवराव नावाच्या सद्गृहस्थाने कॉलेजला देणगी देण्याचे जाहीर केल्यामुळे त्या कॉलेजला वासुदेवराव आर्टस्‌कॉलेज असे नामांकन करण्यात आले. वर्धेत एकमेव कॉलेज असल्यामुळे चालू राहिले. मात्र 1940-41 मध्ये कॉमर्स कॉलेजची स्थापना झाल्यावर या कॉलेजला शह बसला. ते कॉमर्स कॉलेज पुढे तग न धरू शकल्यामुळे डॉ. लोंढे यांनी ते कॉलेज नागपूरला हलविले. स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय चळवळीचे ते वर्ष असल्यामुळे व ते ज्या इमारतीत भरणार होते ती टिळक विद्यालयाची वास्तू असून 1920 च्या काँग्रेसनगर येथील अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या काळात तेथे महात्मा गांधींचे वास्तव्य असल्यामुळे कॉलेजचे नॅशनल कॉलेज असे दुसर्‍यांदा नामकरण केले. स्थलांतराने नॅशनल कॉलेजच्या हलाखीच्या स्थितीत विशेष फरक पडलाच नाही. उलट 1947 साली ते डबघाईला आले. आर्थिक गर्तेत आकंठ बुडाले. विद्यार्थ्यांच्या संख्येने निच्चांक गाठला. ती 20-22 पर्यंत घसरली. तत्कालीन मॅनेजमेंटने कॉलेजला आर्थिक सहाय्य देण्यास नकार दिला. कर्मधर्मसंयोगाने एखाद्या विद्यार्थ्यांने फी भरली की चपराशी आणि बाबूंसाठी तो दिवाळी दसराच ! एकूण परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दृश्य डॉ. लोंढे उघड्या डोळ्यांनी पाहू शकले नाही. शेवटचा उपाय म्हणून ते भाऊसाहेबांना शरण गेले. कॉलेजच्या दयनीय स्थितीचे यथार्थ चित्र त्यांनी भाऊसाहेबांपुढे उभे केले. काका वाचा या धर्तीवर भाऊसाहेब वाचवा. अशी आग्रही विनवणी केली. दयानिधी भाऊसाहेबांच्या मनात दया निर्माण झाली पण सोसायटीच्या सदस्यांनी विरोध करून हे मस्त मढे विनाकारण गळ्यात बांधून घेऊ नये असे सुचविले. तरी भाऊसाहेबांनी डॉ. लोंढेंना अभयदान दिले. कारण भाऊसाहेबांच्या नजरेत त्या कॉलेजच्या उद्घाराचे, उन्नतीचे आणि उत्कर्षाचे चित्र दिसत होते. या निर्णयावरून त्यांच्या विलक्षण दूरदृष्टीची व द्रष्टेपणाची प्रचिती कालांतराने सर्वांच्या नजरेस आली. (1967 मध्ये कॉलेजने उच्चांक गाठला, विद्यार्थी संख्या 2650 च्या आसपास) श्री शिवाजी संस्थेने या कॉलेजची सर्व जबाबदारी स्वीकारल्याचे समजताच प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या मनात स्थैर्यत्वाची भावना निर्माण झाली. 1949 मध्ये भाऊसाहेबांनी श्रीमंत दादासाहेब घनवटेकडून पन्नास हजार रुपयांची देणगी मिळवून दिली. सर्वांच्या पगाराच्या थकीत बाकीचे शोधन करण्यात आले. नॅशनल कॉलेजचे पुन्हा नामकरण करून ते घनवटे नॅशनल कॉलेज असे ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या संख्येत सतत भर पडत गेली. आर्थिक परिस्थिती सुधारली व प्रवेश घेण्याचा सर्वात शेवटचा पर्याय म्हणजे घनवटे नॅशनल कॉलेज या चित्रात आमुलाग्र परिवर्तन घडून आले.

मा. भाऊसाहेबांशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना : 

प्राचार्यपदी रुजू झाल्यानंतरचा एक प्रसंग- कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीची सभा. अध्यक्ष भाऊसाहेब दिल्लीत आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे उपाध्यक्ष डॉ. भावे यांनी अध्यक्षपद भूषविले होते. त्या दरम्यान त्यांनी मला तुमची प्राचार्यपदी नियुक्ती निवड समितीच्या शिफारशीनुसार रीतसर झाली काय? असा प्रश्न केला. माझ्या नकारात्मक उत्तरानंतर जाहिरात देण्याचा निर्णय कार्यकारिणीत घेण्यात आला. श्री गोळे यांनी ही घटना भाऊसाहेबांच्या कानावर घातली. त्यांनी या निर्णयाला विरोध न दर्शविता सारे रितसरच होऊ द्या असा सल्ला दिला. मात्र ही घटनाही कॉलेजचे खजिनदार श्री मारुतराव घनवटे यांच्या कानावर घातली त्यांनी माझ्या समक्षच डॉ. भावे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि गेल्यावर्षी केलेल्या जाहिरातीतून काहीच निष्पन्न झाले नसल्याची आठवण दिली आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लांजेवारांनाच आपली कर्तबगारी सिद्घ करण्यासाठी संधी द्यावी असे सुचविले. अशा रीतीने त्या प्रकरणावर पडदा पडला.

याच वर्षादरम्यानची दुसरी घटना :

प्रसंग होता अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचा व तिच्या वितरणाचा. शासनाकडून शिष्यवृत्तीची रक्कम व शिष्यवृत्तीधारकांची यादी मिळाली. त्यात एक महत्त्वाचे काम कोणाच्याही अभ्यासक्रमात खंड पडलेला नसावा. असे होते त्याचा अर्थ तो विद्यार्थी 1960 च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा असाच नियम होता. तरी खंड पडलेल्यांना शिष्यवृत्ती देण्यास नकार देणार्‍या लिपिकाच्या तक्रारी घेऊन लाभार्थी मला भेटू लागले. अनेक कारण सबबी पुढे करून 1960 च्या परीक्षेला बसलोच नव्हतो असे सांगू लागले. त्यांच्या सबबी ऐकून माझे कान किटले. मी संबंधित लिपिकाला विद्यापीठात जाऊन सत्यता पाहण्याचे सुचविले. त्याने एक दोन दिवसांतच खंड पडलेल्या सुमारे 50 विद्यार्थ्यांची यादीच आणली. मी अनुसूचित जातीविरुद्घ असल्याचे त्यांचे पुढारी बोलू लागले. त्यांचे शिष्टमंडळ माझ्या निवासस्थानी मला भेटले. त्यांना मी निक्षून सांगितले की, काहीही होवो मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. त्यावर याचा परिणाम चांगला होणार नाही. अशी धमकी द्यावयाला ते विसरले नाहीत. पण त्याला मी भीक घातली नाही. थोड्याच दिवसात माझ्या जिवाला धोका असलेले पत्र मिळाले. मी ही घटना भाऊसाहेबांच्या कानावर घातली त्यांनी पोलिस विभागाकडून संरक्षण मागण्याचा सल्ला दिला पण तशी पाळी आलीच नाही. माझ्या निर्भीड व दृढ निर्णयाचे फलस्वरूप तदनंतर कोणीही माझ्या वाटेला गेला नाही.

भाऊसाहेबांची घारीसदृश दृष्टी : 

भाऊसाहेब या महामेरूच्या अष्ट-नव्हे अनंत पैलूंचे एक ज्वलंत उदाहरण ! घार कुठेही असली तरी तिची नजर आपल्या पिल्यावरच असते. कोठेही असली तरी भाऊसाहेबांचे लक्ष घनवटे नॅशनल कॉलेजवरच ! प्रसंग होता. क्रिकेटचा अंतिम सामना. मागील दोन वर्षात घनवटे नॅशनल कॉलेजचे क्रिकेटचे अजिंक्य पद गाठून ढाल आणली होती. ते तिसरे वर्ष. यावर्षी अजिंक्य पद मिळाले तर विद्यापीठाची ढाल कायमची कॉलेजची होणार होती. आणि कॉलेज यांच्या यशचिंतनाचा टेलिग्राम भाऊसाहेबांनी दिल्लीवरून पाठविला होता ! बारीकसारीक गोष्टींकडे त्यांचे लक्ष असायचे.

रात्री बांधकामाची पाहणी :

1960-61 या वर्षात घनवटे नॅशनल कॉलेजमध्ये वाणिज्य आणि विज्ञान या दोन विद्याशाखा नव्यानेच सुरू केल्या होत्या. नवीन परिसरातील इमारतीच्या विद्यमान पाच खोल्यांमध्ये वर्ग आणि प्रायोगिक शाळा यांची सोय केली होती. पुढच्या वर्षापासून वर्गाची व प्रयोग शाळांची गरज वाढतच जाणार असणार म्हणून पहिला माळा बांधण्याचे काम सुरू केले. भाऊसाहेबांचे दिल्लीवरून येणारे विमान व परतणारे सुद्घा रात्रीच असायचे. ते नागपूरवरून अमरावतीला किंवा तेथून दिल्लीला जाताना नागपूरला आल्यानंतर कॉलेजला न विसरता भेट देत. वेळ रात्रीची, खोल्यांचे काम चालू असल्यामुळे बांधकामाचे सर्व साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले. तरी ते डोळ्यांखालून घातल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. त्यामुळे त्यांची सोय व्हावी म्हणून आम्ही त्यांच्या आगमनाप्रसंगी पेट्रोमॅक्सची व्यवस्था करीत असू. ते आमचे कौतुक करीत. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन लाभे. येथे नमुद करावयाचे आहे की, त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्र्वास होता. माझ्या कामात ते कधीही हस्तक्षेप करीत नसत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये हेच माझ्या जीवनाचे ध्येय बनले. उद्दिष्ट ठरले. त्यांचा आशीर्वाद, विश्वास, कौतुक व प्रेरणा यामुळे मी माझ्या जीवनात यशाचे शिखर गाठू शकलो. एकेका उच्च पदावर सक्षम काम करण्याचे बळ मिळाले. सर्वांचा पाया रचला गेला. माझ्या गत जीवनाचे सिंहावलोकन करताना माझ्या भावी आयुष्याच्या जडणघडणीत भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. असे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.

प्राध्यापक मिसर यांचे प्रकरण : 

मला वाटते ते 1961-62 किंवा त्याच्या पुढचे वर्ष असावे. श्री मिसर यांची इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली होती. थोड्या दिवसातच त्यांच्या अकार्यक्षमतेच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. मी प्रत्यक्ष हजर राहून त्यांच्या शिकविण्याच्या शैलीची शहानिशा केली. त्यांना माझ्या चेंबरमध्ये बोलावून त्यांच्याबाबतच्या तक्रारी खर्‍या असल्यामुळे त्यांनी स्वत: राजीनामा द्यावा, अन्यथा हकालपट्टी करावी लागेल असे बजावले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी राजीनामा सादर केला आणि त्यांच्या समाधानकारक कामाचे प्रमाणपत्र द्यावे अशी विनंती केली. त्यांच्या भावी आयुष्याचा खेळखंडोबा होऊ नये म्हणून मी तशा आशयाचे प्रमाणपत्र दिले. भाऊसाहेब नागपूरला आल्याचे समजताच मिसर त्यांना भेटले आणि सक्षमतेचे प्रमाणपत्र असतानाही प्राचार्याने मला काढून टाकले अशी तक्रार केली. पाहतो असे सांगून भाऊसाहेबांनी त्यांची बोळवण केली. मी त्यांना भेटलो असताना हे काय प्रकरण आहे अशी विचारणा केली. मी सत्यस्थितीचे कथन केल्यावर भाऊसाहेबांचे समाधान झाले.

नागपूर विद्यापीठाच्या निवडणूकीत भाऊसाहेबांचा पराजय : 

1961 साली न्यायमूर्ती बडकस यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाल संपल्यावर झालेल्या रिक्त पदाच्या निवडणुकीत डॉ. भाऊसाहेब कोलते यांचा पराभव करून न्यायमूर्ती कोतवाल निवडून आले. 1963 ची एक अत्यंत दु:खद घटना ! बहुजन समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारी दुर्घटना ! यावर्षी न्यायमूर्ती कोतवाल यांची मुंबईला बदली झाल्यामुळे त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा राजीनामा दिला. त्या रिक्त पदासाठी डॉ. पंजाबराव यांनी निवडणूक लढवावी अशी माजी न्यायमूर्ती आणि भूतपूर्व कुलगूरू डॉ. मंगलमूर्ती यांनी मनधरणी करून भाऊसाहेबांचा होकार मिळविला आणि उमेदवारी अर्ज भरला. मात्र निवडणूकीच्या धामधुमीच्या काळात भाऊसाहेब नागपूरला येऊ शकले नाही. उलट 8-10 दिवस उरले असता रोज येथे भरलेल्या इंटरनॅशनल फुड ऑर्गनायजेशनला भारताचे कृषिमंत्री म्हणून उपस्थित राहणे गरजेचे होते. दि. 5-12-1963 त्यसांचे रोमवरून एक पत्र मला मिळाले. निवडणुका असल्यास (Election Fixed) आणि नसल्यास (Election cancelled) असा केबल त्यांनी दिलेल्या लंडनच्या पत्त्यावर पाठविण्यास सांगितले.
यावरून हे स्पष्ट होते की, त्या तारखेपर्यंत निवडणुकीत पूर्ण विसर त्यांना पडला होता. त्या पत्रात निर्देश केल्याप्रमाणे लंडनवरून निघून दि. 10 ला मुंबईला व 19 तारखेला दिल्लीत लोकसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहणे दि. 12 ला रात्री नागपूरला पोहोचणे त्याच दिवशी अमरावतीला जाऊन रात्री नागपूरला परत येणे असा त्यांचा व्यस्त कार्यक्रम होता. निवडणूक जेमतेम 3-4 दिवसांवर येऊन पोहचली होती. नागपूरला पोहोचल्यावर एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता ते प्रथम माजी कुलगुरू न्यायमूर्ती बडकस यांनात्यांच्या निवासस्थानी भेटले. त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा चालली. तेथून बाहेर पडतांना त्यांची चर्चा पाहून प्रतिकूल परिस्थितीची त्यांना पूर्ण जाणीव झाला असल्याचे आम्हाला जाणवले. न्यायमुर्ती मंगलमूर्ती, आम्ही अनेक कार्यकर्ते यांच्याशीही त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. नागपूरकर व बाहेरील सर्व समर्थकांनी यथाशक्ती केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून, सार्‍यांची निराशा होऊन ते खचून जाऊ नये याचे भान राखून पळपुटेपणाचा मार्ग न अवलंबिता भाऊसाहेबांनी आपली उमेदवारी परत न घेण्याचा निर्धार जाहीर केला. पराभवाच्या छायेत असल्याची संपूर्ण कल्पना त्यांना आली असतानाही त्यांनी स्वत:चे मनोधैर्य खचू दिले नाही. 
दरम्यान न्यायमूर्ती मंगलमूर्ती प्रचाराची धूरा सांभाळीत जोरदार प्रयत्न करीत होते. त्यांच्या सोबत आम्ही उपस्थित राहत असू. मी श्री गोळे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव संस्थेशी निगडित संबंध असलेले तसेच भाऊसाहेबांचे चाहते आपापल्या शक्तीनुसार प्रचाराची पराकाष्ठा करीत होते. मतदार (विद्यापीठ कोर्टाचे सदस्य) यांना गाठून भाऊसाहेबांना मतदान करण्याची विनंती करीत होतो. मात्र अनुकूलता दर्शविणारी थोडे आणि प्रतिकूल स्वर असलेले बरेच असल्याने आमच्या प्रत्ययास येत होते. आशेचा किरण दिसत नव्हता. निवडणुकीचा दिवस उजाडला. उच्चभ्रू मतदारांचा भाऊसाहेबांचे प्रतिनिधी डॉ. देव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट चित्र प्रकर्षाने जाणवत होते. मतदानासाठी महाराष्ट्र राज्याचे काही मंत्रीही उपस्थित होते, पण मतदारांवर त्यांचा प्रभाव पडलाच नाही. शेवटी निराशाच पदरी पडली. डॉ. पंजाबराव देशमुखांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि चाहत्यांचे दु:ख त्यांना पाहवेना. पराजयाचे खापर आमच्या माथी मारुन मोकळे होण्यापेक्षा स्वत:चे दु:ख, निराशा पचवून त्यांनी आम्हा सर्वांचे सांत्वनच केले. त्यांच्या थोर मनाची आणि भव्यदिव्य अंत:करणाची प्रचिती आली. साक्ष पटली.

माझ्या डोळ्यावरील रक्तस्त्राव :

भाऊसाहेबांच्या पराभवामुळे झालेली निराशा आणि दु:ख त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर 1963 ला झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे परिश्रम आणि दडपण यांचा परिणाम माझे रक्तदाब वाढण्यात झाला आणि त्याचे पर्यवसन माझ्या एका डोळ्यावरील रक्तस्त्रावात झाले. डॉ. जोशी, नेत्रतज्ज्ञ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाचे प्रमुख सुप्रसिद्घ डॉ. ईश्वरचंद्र यांच्या एका महिन्याच्या अथक परिश्रमाने डोळ्यावर आलेले रक्त हळूहळू ओसरले. श्रीमंत दादासाहेब घनवटे यांच्या गौरवाच्या कार्यक्रमातील माझी अनुपस्थिती भाऊसाहेबांच्या लक्षात आली आणि मी अंथरुणाला खिळलेला असल्याचे समजल्यावर रात्री मला भेटण्याकरिता ते माझ्या निवासस्थानी आले. यापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पायर्‍या चढण्याची मनाई केली असली तरी त्याची तमा न बाळगता ते जिना चढून वर आले, माझी आस्थापूर्वक चौकशी केली आणि लवकर दुरूस्त होण्याचे आशीर्वाद दिले. अनेक इंजेक्शन आणि औषधोपचार यांनी होणार्‍या लाभापेक्षा त्यांची भेटच माझ्या सुधारणेच्या दृष्टीने मौल्यवान व अधिक प्रभावशाली ठरेल असे सांगून त्याबद्दल अंथरुणावर पडूनच हात जोडून मी त्यांचे आभार मानले.

श्रीमंत दादासाहेब घनवटे यांचा गौरव :

सोसायटीचे नॅशनल कॉलेजची जबाबदारी स्वीकारली हे या कॉलेज करिता टर्निंग पॉईंट होते. तर दादासाहेबांनी रु. 50,000 ची देणगी या कॉलेजच्या उद्याचे दार खोलणेच ठरले. ही जाणीव आणि घनवटेंनी चालविलेल्या शिवराज लिथो वर्क्सने महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही मानाचे स्थान मिळविणे, ज्याचा पाया स्वत:चा घाम गाळून, कष्ट उपसून चिकाटीने, जिद्दीने रचला होता. अशा श्रीमंत दादासाहेब घनवटे यांच्या चित्रकलेचा गौरव करण्याचा निर्णय भाऊसाहेबांनी घेतला. 1964 च्या प्रारंभी घनवटे रंगमंदिरात केंद्रीय मंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते चित्ररत्न ही पदवी बहाल करण्यात आली आणि अशारितीने सोसायटीने चित्ररत्न दादासाहेबांच्या ऋणातून मुक्त होण्याचा उपक्रम नेत्रदीपक समारंभाची यशस्वी सांगता करून पार पाडला.

विदर्भ अशासकीय महाविद्यालयांचे संघटन :

1962-63 मधली एक घटना. आतापावेतो विदर्भातील महाविद्यालयांना शिक्षणाबाबत दिल्या जाणार्‍या अनुदानाचे धोरण औदार्याचे आणि कॉलेजेसना पोषक व विकासासाठी अनुकूल असे; पण 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनुदानाचे धोरण लागू झाले. ते प्रतिकुल किंवा बाधक असे नव्हते पण कंजूषपणाचे अवश्य होते. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्रगतीला आळा बसण्याचा धोका निर्माण झाला होता. हे संकट लक्षात घेऊन भाऊसाहेबांनी वरील संघटन स्थापण्याचा निर्णय घेतला, संघटनेची घटना तयार केली. तिचे हे स्वत: अध्यक्ष झाले तर मला त्यांनी सचिव बनविले. संघटनेच्या घटनेनुसार सभासद झालेल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व त्याचे प्राचार्य आणि अध्यक्ष हे करणार होते. ही संघटना 1978 पर्यंत कार्यरत होती. महाविद्यालयांचे प्रश्न त्यांच्या अडचणी आर्थिक संकट शासनाच्या नजरेस पत्र व्यवहार करणे शिक्षण मंत्र्यांशी बोलणे आणि शिष्टमंडळाद्बारे भेट घेऊन अनुदानाच्या धोरणाबद्दल किंवा त्याशी निगडित विषयांबाबत चर्चा करीत. या काळात महाविद्यालयांचे अनेक प्रश्न निकाली काढण्याचे मोलाचे कार्य करण्यात संघटनेला काही प्रमाणात यश मिळत होते. संघटना म्हणजे महाविद्यालयांचे मार्गदर्शकच बनले होते. हे भाऊसाहेबांच्या द्रष्टेपणाचे एक जिवंत उदाहरणच होते.

भंडारा शहरात महाविद्यालय काढण्यात पुढाकार :

1964 च्या प्रारंभी एक दिवस भाऊसाहेब कॉलेजमध्ये आले. मी आणि गोळे उपस्थित होतो. त्या दिवशी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव दिसत नव्हता. कॉलेजच्या आर्थिक व शैक्षणिक स्थितीविषयी चर्चा चालू असताना त्यांनी अचानक तुमच्या भंडारा जिल्ह्यात एखादे कॉलेज आहे काय? अशी मला पृच्छा केली. माझ्या नकारात्मक उत्तरामुळे त्यांनी 1964-65 सत्रापासून भंडार्‍यात कला वाणिज्य महाविद्यालय काढण्याचा मनोदय व्यक्त केला. स्मरणशक्तीचे ते महामेरु. त्यांच्या सूचनेप्रमाणे संस्थेने विद्यापीठाकडे रितसर अर्ज करून भाऊसाहेबांच्या मनोदयाला मूर्त स्वरूप दिले. प्राध्यापक ब्राह्मणकर हे भंडारा जिल्ह्याचे असल्यामुळे त्या कॉलेजचे भावी प्राचार्य म्हणून इमारतीचा शोध घेण्याच्या कामाला लावले. गणपतराव पांडे यांच्या ऐतिहासिक वाड्याचा अर्धा भाग भाड्याने घेतला. तशी भाडे चिठ्ठीही लिहून झाली. कालांतराने विद्यापीठाने चौकशी समिती गठीत केली. वाड्याची जागा दाखवून ती इमारत पुरेशी होईल असे समितीने मान्य केले. आवश्यक शिक्षक व कर्मचारी वर्गांची नियुक्ती, ग्रंथालयाची स्थापना, पुस्तके व फर्निचर यासाठी आवश्यक त्या रकमेची उपलब्धता यांचे आम्ही आश्वासन दिले. मात्र समिती सदस्यांच्या मनात सोसायटीबद्दलचा आकस प्रकर्षाने जाणवत होता. आमची भीती खरी ठरली. आधी मळस मग पायारे असा निर्धार करून चौकशी समिती आली होती. याची प्रचिती लवकरच आली. वाड्याच्या प्रवेशद्बारावर आम्ही निरपेक्ष हेतूने श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय असा फलक लावला होता. विद्यापीठाच्या परवानगी वाचून असा फलक लावलाच कसा असे खुसपट काढले. आक्षेप घेतला आणि या क्षुल्लक फुसक्या सबबीवर सोसयटीचा अर्ज फेटाळून लावला, दरम्यान शिवाजी सोसायटी भंडार्‍याला कॉलेज काढीत आहे ही वार्ता कळल्यामुळे (की कळविल्यामुळे) मनोहरभाई पटेल यांच्या गोंदिया एज्युकेशन सोसायटीने ही अर्ज केला. या आखाड्यात नासिकराव तिरपुडे यांच्या युगांतर सोसायटीने उडी घेतली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या साम्राज्य शाहीला शह देण्याकरिता गोंदिया शिक्षण संस्थेला (अपेक्षेप्रमाणे) मान्यता दिली गेली. त्यानंतर भाऊसाहेब नागपुरला आले असता वरील घडामोडी त्यांच्या कानावर घातल्या. त्यांच ही प्रतिक्रिया ‘आपल्या पुढाकारामुळे भंडार्‍याला कॉलेज तर मिळाले’ अशी व्यक्त करून आपले समाधान प्रकट केले. अपयशात ही यश मानणारा हा मानवतेचा महामानव !

भाऊसाहेबांचे अपुरे स्वप्न : 

1960 मध्ये सुरु केलेल्या विज्ञान शाखेचे रूपांतर स्वतंत्र महाविद्यालयात करणे हे भाऊसाहेबांचे स्वप्न होते. ते साकार करण्याकरिता त्यांनी उचललेले पहिले पाऊल म्हणजे 1964 च्या ऑगस्टमध्ये श्री एल. डी. देशमुखांची प्राचार्य म्हणून नियुक्ती करणे हे होय. पुढचे पाऊल म्हणजे घनवटे नॅशनल कॉलेजचे विभाजन करून विज्ञान शाखेचे स्वतंत्र विज्ञान महाविद्यालय परिवर्तन करावयास परवानगी मिळावी म्हणून विद्यापीठे आणि शासनाकडे अर्ज करणे. हे सर्व संस्थेने केले. एल. डी. देशमुख रुजू झाल्यानंतर पुढचे पाऊल मी, श्री गोळे व एल. डी. देशमुखांनी चर्चेच्या द्बारे उचलले. प्रथम प्राध्यापकांची विभागणी अर्थातच विज्ञान शाखेचे प्राध्यापक वेगळे असल्यामुळे तो प्रश्न आपोआप सुटला. फक्त एक इंग्रजीचा व एक मराठीचा प्राध्यापक घनवटे महाविद्यालयातून विज्ञान महाविद्यालयाकडे स्थानांतरीत करण्याचा तो आमच्या विचाराअंती निश्चित झाला. विज्ञान शाखेत कार्यरत असलेले कर्मचारी तिकडेच वळते करण्यात आले. एल. डी. देशमुखांकडे प्रशासनीय व शैक्षणिक व्यवहार सांभाळावयाचे असून आर्थिक विभाग घनवटे नॅशनल कॉलेजकडे राहिला. तोपर्यंत सायंसचे वर्ग व प्रयोगशाळा यांचे स्थलांतर त्या इमारतीत करण्यात आले होते. प्राचार्य देशमुखांना प्रशासनीय कार्य करण्यासाठी घनवटे नॅशनल कॉलेजमधून आवश्यक कर्मचारी वर्ग वळता करण्यात आला. अशा रितीने स्वतंत्र महाविद्यालयाचे अस्तित्व उदयास आले होते. मात्र प्रतिक्षा होती ती प्रथम विद्यापीठ व नंतर शासनाच्या मान्यतेची. ही मान्यता 1967 मध्ये मिळाली आणि 1967-68 सत्रापासून शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची रीतसर स्थापना झाली. मात्र ते भाऊसाहेबांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही कारण मान्यता मिळण्याकरिता लालफितीचा वेळकाढूपणा मायावी कारभार ! तरी भाऊसाहेबांच्या आत्म्याला समाधान खचितच लाभले असणार !

भाऊसाहेबांचे अंतिम दर्शन : 

1965 वर्षाच्या प्रारंभीची घटना. माझे मित्र श्री. बी. पी. हजारे आणि श्री गोवर्धनदास अग्रवाल यांच्या एका अशिलाची विक्रीकरासंबंधीची केस ग्वाल्हेरच्या कार्यालयात होती. पक्षकाराची कारं होती. हजारे यांनी मला त्यांच्या सोबत येण्याचा आग्रह धरला त्यांच्या अट्टाहासामुळे मी पण त्याच्यासोबत निघालो. ग्वाल्हेर येथील काम आटोपल्यावर दिल्लीला जाण्याचे ठरले. दिल्लीच्या मुक्कामात हजारे, अग्रवाल आणि मी भाऊसाहेबांना भेटण्याकरिता त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. भाऊसाहेबांचे दरवाजे सर्वांसाठी खुले होतेच. त्याक्षणी आम्हाला त्यांचे दर्शन घडले. कॉलेजसंबंधी चर्चा चालू असतानाच त्यांनी मला आदेश दिला की, कॉलेजसाठी एक गाडी घेण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करावी. त्यानंतर आम्ही त्यांचा निरोप घेतला. पण माझ्या मनात क्षणभरही आले नाही की हे त्यांचे अंतिम दर्शन ठरणार ! पण नियतीच्या मनात वेगळेच होते !

ज्ञानसूर्य मावळला : 

आम्ही पहाटे झोपेत असतानाच भाऊसाहेबांच्या स्वर्गवासाची दु:खद वार्ता कळली. मन सुन्न झालेले. मात्र त्या बातमीवर विश्वासच बसेना. माझ्या डोळ्यांपुढे तत्पूर्वी घडलेला एक असाच प्रसंग उभा राहिला. प्रसंग होता वार्षिक स्नेहसंमेलनातील मराठी नाटक. नाटक ऐन रंगात आले होते. एका चपराशाने भाऊसाहेब वारल्याचा फोन आल्याचे मला गुपचुच सांगितले. सोबत असलेल्या श्री गोळे व श्री एल. डी. देशमुख यांनाही मी ती वार्ता कळविली. नाटकाचा खेळखंडोबा होऊ नये म्हणून कोणालाही संशय येऊ नये याची खबरदारी घेत आम्ही माझ्या चेंबरमध्ये जमलो. गोळेंनी स्थानिक वृत्तपत्रांच्या कार्यालयांशी संपर्क साधनू भाऊसाहेबांसंबंधी काही बातमी आहे काय अशी पृच्छा केल्यावर त्यांनी तसे नसल्याचे सांगितले. अमरावतीशी संपर्क साधला. तेथेही असे काही नसल्याचे कळले. ही अफवा, खोडसाळपणा आणि रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न असल्याचे शहानिशा केल्यानंतर आमच्या लक्षात आले. आमचा जीव भांड्यात पडला. मंडपात आल्यावर नाटक निर्विघ्नपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता मिळालेली बातमी देखील खोटी ठरावी अशी परमेश्वराशी प्रार्थना करीत असतानाच श्री गोळे व त्यापाठोपाठ सोसायटीतून भाऊसाहेबांचे निधन झाल्याचे कळले. मानवतेचा महामेरू ढासळला. शेतकर्‍यांचा कैवारी आता लोप पावला. ज्ञानसूर्य शिक्षणमहर्षी, त्यांच्या चाहत्यांना दु:खाच्या खाईत लोटून अंतर्धान पावले, शिक्षण क्षेत्रातील हिरा हरपला, कृषिरत्न झाकाळले, हजारोंचा पोशिंदा व लाखोंचा शिरोमणी निखळला. सहकारक्षेत्र पोरके झाले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेवर आणि संलग्नित संस्थांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
भाऊसाहेबांचे कलेवर अमरावतीला आणण्याचे सर्वप्रथम फोल ठरले. मा. यशवंतराव चव्हाण आणि निकटवर्तींनी सुद्घा तसा प्रयत्न केला. पण विमलबाईंनी त्यांना भीक घातली नाही. शेवटी त्यांचा अंत्यसंस्कार दिल्लीतच करण्यात आला.
तो रामनवमीचा दिवस, 10 एप्रिल 1965. दिवसभर त्यांची प्रकृती उत्तम होती. रात्री त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यांना दिल्लीतील विलिंग्डन हॉस्पीटलमध्ये भरती केले. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी तेथील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण भाऊसाहेबांना आलेल्या हृदयाच्या जबरदस्त झटक्याने त्यांना जीवनदान देण्यात ते अयशस्वी ठरले आणि रात्री साडेअकरा वाजता त्यांचे देहावसान झाले. भाऊसाहेबांचा अस्थिकलश आणण्याकरिता गेलेले सोसायटीचे सचिव श्री मामासाहेब लोंढे यांनी परतल्यावर वरील हकिकत सांगितली.

अस्थींचे विसर्जन :

भाऊसाहेबांच्या अस्थींचा कलश घनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रतीक्षागृहात त्यांच्या चाहत्यांच्या, शिक्षण प्रेमींच्या दर्शनासाठी ठेवला होता. प्रात:काळी नागपूरच्या सार्‍या वर्तमानपत्रातून ही बातमी प्रसारित झाली असल्यामुळे फार मोठ्या संख्येने लोक अस्थिकलश घेऊन आम्ही अमरावतीसाठी प्रस्थान केले. एक गाडी अस्थिकलशाच्या आगमनाची बातमी जाहीर करीत पुढे जात होती. अमरावती मार्गावरील त्यातील ग्रामस्थ सडकेच्या कडेला उभे राहून आदरांजली वाहत होते.
अस्थिंचे अमरावतीला आगमन होताच रुरल इन्स्टिट्यूटमध्ये जमलेल्या हजारो चाहत्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहू लागला. अनेकांनी ते दृश्य सहन न होऊन हंबरडे फोडले. एकच आकांत माजला, रडारड झाली तिला सीमाच नव्हती. ते हृदद्रावक दृश्य पाषाणालाही पाझर फोडणारे होते. आपल्या घरातील आपला सगासोयराच दगावला या जाणिवेने सर्वांना अपरंपार दु:ख झाल्यामुळे ते हमसून हमसून रडत होते. त्या दृश्याचे वर्णन करणे शक्ती बाहेरचे होते.
रात्र झाली. अस्थी विसर्जनाच्या यात्रेला प्रारंभ झाला. लाऊडस्पिकरने ही वार्ता शहरात प्रसारित केली होती. विशेषत: ज्या मार्गाने तिचे प्रस्थान होते त्या रस्त्याच्या कडेला यात्रा जसजशी पुढे सरकू लागली तसतशी सहभागी होणार्‍यांची संख्या वाढू लागली. मार्गाच्या कडेला उभे असलेल्या लहान थोर स्त्री पुरुषांनी रांगच लावली होती. आदरांजली वाहण्याकरिता पुष्पवृष्टी झाली. अश्रूंच्या महापूरात अस्थिंचे विसर्जन झाले. अमरावतीच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेच्या पटांगणावर श्रद्घांजली वाहण्याच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची अफाट गर्दी लोटली होती. अभूतपूर्व असा तो देखावा होता.
एक ऐतिहासिक महापुरुष काळाच्या पडद्याआड झाल. त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन !
________________________________________________
प्राचार्य श्री एम. एस. लांजेवार, माजी कुलगुरू, नागपूर विद्यापीठ, निवृत्त महाविद्यालयीन पीठासनाधिकारी 115 अ, रामदास पेठ, नागपूर

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) 

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा