पापळ गावी श्यामराव बापू आणि राधाबाई यांचे पोटी दिनांक 27 डिसेंबर 1998 रोजी एक विदर्भरत्न जन्माला आले, ते म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख. काबाडकष्ट करून प्रसंगी अर्धपोटी व उपाशी रहाून पंजाबरावाचे प्राथमिक शिक्षण त्यांचे आई-वडिलांनी पापळ येथेच पूर्ण केले. मुलानं खूप शिकावं, मोठं व्हावं आणि आईवडिलांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे देशाचे पांग फेडावे अशी महत्त्वाकांक्षा त्यांचे आईवडील उराशी बाळगून होते.
राधाबाईने फाटका संसार नेटका करून अत्यंत काटकसरीने पंजाबचे माध्यमिक शिक्षण कारंजा लाड येथे पूर्ण केले. विशेष करून त्यांनी पंजाबरावांच्या प्रकृतीची आणि शिक्षणाची काळजी घेतली. त्यांचेवर सुसंस्कार केले. डॉ. पंजाबराव देशमुख एक तीव्र संवेदनशील व्यक्तिमत्व होते. गरिबांविषयी त्यांचे मनात कणव होती. याची प्रचिती खालील उदाहरणावरून येते. एकदा प्राथमिक शाळेत शिकताना त्यांचा वर्गमित्र सोबत होता. ते दोघेजण रस्त्याने पायी चालत शाळेत जात होते. उन्हाळ्याचे दिवस होते. मित्राच्या अंगात सदरा नव्हता, त्याच्या अंगाला चटके बसत होते. ही गोष्ट पंजाबरावांना लगेच खटकली. त्यांचे संवेदनशील मन एकदम गहिवरून आले. त्यांनी स्वत:च्या अंगातील सदरा काढून त्या गरीब मित्राला दिला. त्या गरीब मित्राला देवदर्शन झाल्यासारखे वाटले.
पंजाबरावांचे आईवडील देखील सात्विक, प्रेमळ, संवेदनशील, सहिष्णू, परोपकारी आणि वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. शुद्घ बिजापोटी ! फळे रसाळ गोमटी ! या उक्ती प्रमाणे त्यांचे जिवितकार्य ठरले. ते इतिहासात अमर ठरले आहे. कितीही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी चालेल; परंतु पंजाबरावाचे उच्च शिक्षण थांबवायचे नाही, ही जिद्द आई-वडिल मनाशी बाळगून होते. त्या दिशेने वाटचाल करून स्वत:ची शेती गहाण ठेवून 21 ऑगस्ट 1920 रोजी पंजाबरावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला रवाना केले. पंजाबरावांनी उच्च शिक्षण घेत असताना विविध शिष्यवृत्त्यांचा अभ्यास केला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांना आर्थिक मदतीशिवाय पर्याय नव्हता. व्हॅन्स डनलॉप संस्कृत स्कॉलरशीप मिळविण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यात त्यांना यश प्राप्त झाले. यावेळी त्यांना कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्राची आठवण झाली. कमवा आणि शिका हा विद्यार्थ्यांसाठी दिलेला संदेश होता. यातून होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. शिष्यवृत्ती प्राप्तीचा आनंद अवर्णनीय आणि अविस्मरणीय होता. तेथील वृत्तपत्रांनी या घटनेची नोंद घेऊन पंजाबरावांचा यथोचित सन्मान केला. हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नव्हता तर तो भारताचा सन्मान होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये असे वाटते.
इंग्लंडला शिक्षण घेत असताना पंजाबरावांनी तेथील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विशेष करून कृषीक्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास केला. महत्वाच्या नोंदी घेऊन अनुभवांची गाठोडी मोठी केली. विलायतेमधील ऐश्वर्य संपन्न जीवन जर भारतात आणायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे त्यांचे मत बनले. तेथील सुशिक्षित शेतकर्यांचे जीवन जवळून अनुभवले ते प्रत्यक्ष भारतात केव्हा साकार करता येईल याची वाट पाहू लागले. एडीनबर्ग विश्वविद्यालयात पंजाबरावांचा नावलौकिक होता, खरोखरच पंजाबरावांच्या बुद्घीची धार तेज होती. बॅरिस्टर अॅट लॉ ही पदवी त्यांनी संपादित केली. वैदिक धर्माचा वाङमयातील उदय आणि विकास या विषयावर त्यांनी पीएच. डी. संपादन केली. इ.स. 1926 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख मायदेशी परतले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि मायदेशाची सेवा ह्या दोन प्रेरणा मायदेशी परतताना सोबत आणल्या होत्या. भारतात त्या प्रत्यक्ष कृतीत आणावयाच्या होत्या. भारतात येऊन ऐश्वर्यसंपन्न जीवन जगायचे नाही, तर समाजाची सेवा करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी धडपडायचे आणि शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यात झोपडीपर्यंत पोचविणे आपले आद्यकर्तव्य आहे, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती.
केंब्रीजला असताना त्यांची गाठ एकदा सुभाषचंद्र बोस यांचेशी पडली, तेव्हा ते आय.सी. एस. ची परीक्षा देत होते. सुभाषचंद्र बोसांनी घरी पाठविण्यासाठी लिहलेले पत्र डॉ. पंजाबरावांना वाचायल मिळाले. पत्रातील मजकूर असा होता- मी आय. सी. एस. पदवीचा उपयोग मान-सन्मान आणि पैसा कमविण्यासाठी करणार नाही तर माझ्या मयभूला स्वतंत्र करण्यासाठी करेन. या विचाराने भाऊसाहेब प्रभावित झाले आणि त्याचवेळी खर्या अर्थाने समाजक्रांतीची मुहूर्तमेढ राजर्षी शाहू महाराजांनी रोवली. पुढे हेच कार्य नेटाने चालविण्याचे व्रत डॉ. पंजाबराव देशमुखांनी घेतले. पंजाबराव अवघे सत्तावीस वर्षांचे असताना त्यांना तत्वज्ञानाचे महापंडित ही उपाधी प्राप्त झाली. खरोखरच डॉ. पंजाबराव देशमुख हे एक कृतिशील समाजसुधारक होते.
भारतात आल्यानंतर वडिलांनी शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्याचे प्रथम कार्य हाती घेतले. त्यासाठी वकिली सुरू करून पैसे मिळविले. बहुजनांना त्यांनी कमी खर्चात न्याय मिळवून दिला. मी जरी बॅरिस्टर झालो असतो तरी माझा एकट्याचा काय उपयोग? माझेसारखे अनेक बॅरिस्टर तयार झाले पाहिजेत. माझा विलायतेचा अनुभव हेच सांगतो की, आपल्या रक्ताचा एकेक थेंब, एकेक करण बहुजनांच्या अभ्युदयाकरीता खर्ची करीत रहा. ज्ञानयज्ञ अखंड चालू दे. विद्यामृतानेच विद्यार्थ्यात आणि विशेष करून विदर्भात नवचैतन्य निर्माण होईल. असे त्यांनी हेरले होते.
महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा अनेक समाजसुधारकांनी शिक्षणालाच विशेष प्राधान्य दिले होते. या सर्वांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विचारसरणींचा पगडा डॉ. पंजाबराव देशमुखांवर पडला होता. इकडे बुलडाणा जिल्ह्यात दलितमित्र, समाजभूषण पंढरीनाथ पाटीलांनी समाजकार्याला वाहून घेतले होते. तसेच आनंदराव मेघे, श्यामरावजी गुंड, आप्पासाहेब देशमुख आणि लक्ष्मणराव भटकर या आणि अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजात जनजागृती करण्याचा विडा उचलला होता. पंढरीनाथ पाटलांनी डॉ. पंजाबराव देशमुखांना सहकार्य करण्याचे कबूल केले. डॉ. पंजाबरावांनी शिक्षणाची विशेष जबाबदारी पंढरीनाथ पाटलांवर टाकली आणि ती त्यांनी प्रामाणिकपणे स्वीकारली. त्यावेळी विदर्भात बोटांवर मोजता येतील एवढ्या कमी शाळा होत्या. अशा शाळेत केवळ गर्भश्रीमंत आणि भांडवलदारांचीच मुले शाळेत जात असत. तालुक्याच्या ठिकाणीच शाळा असल्यामुळे गोरगरीबांच्या आणि मागासलेल्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती. तेव्हा अशा मुलांच्या शिक्षणासाठी सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुखांनी अमरावती येथे श्रद्घानंद छात्रालय स्थापन केले. या कामासाठी त्यांना आबासाहेब खेडेकर, नानासाहेब मोहोड, मारोतराव कदम, दलपतसिंग चव्हाण आदी मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्रद्घानंद छात्रालयात सर्व जाती-धर्मांची मुले एकत्र येऊन शिक्षण घेतात, जेवतात, हे पाहून संत गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुखांची तोंड भरून स्तुती केली आणि त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. अमरावती येथे त्यांनी आणखी एक शाळा स्थापन के ली, ती म्हणजे श्री शिवाजी मराठा हायस्कूल होय. त्यामुळे बहूजनांच्या मुलांना शिकण्याची अधिकच सोय झाली. तिलाच अनेकजण तट्टा हायस्कूल म्हणून निवू लागले. तिला समाजकंटकांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉ. पंजाबरावांनी त्याकडे विशेष लक्ष देऊन तिचे संरक्षण केले. तिचे 1 जुलै 1932 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती असे नामकरण केले. या ज्ञानगंगेचा उगम अमरावती येथे झाला असला तरी ती ज्ञानगंगा तिच्या वैशिष्ट्याने वाहत जाऊन मोठी झाली. आज ती विशाल वटवृक्षासारखी फोफावली आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा उद्देश फार मोठा असल्यामुळे तिच्यात छोट्यामोठ्या शिक्षण संस्था नदीसारख्या येऊन मिळाल्यात. बेरार एज्युकेशन संस्था या शिवगंगेत सामील झाली. अनेक कार्यकर्ते नि:स्वार्थी भावनेने आणि त्यागी वृत्तीने संस्थेच्या विकासासाठी झटू लागलेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले होते की, डॉ. पंजाबरावांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा वृक्ष लावून तो सर्वदूर फोफावला त्याची मधुरफळे गोरगरीबांच्या सर्वजातीधर्माच्या मुलांना प्राप्त करून दिलीत. हे कार्य फार मोलाचे आहे. त्यास तोड नाही.
शाळेला इमारत नाही, पुरेसा पैसा उपलब्ध नाही, ब्रिटीश सरकार मदत करीत नाही. अशा वेळी पुढे कसे जायचे? याबाबतीत भाऊसाहेब सतत विचार करीत असे. त्यातून मार्ग शोधीत, अशा वेळी संस्थेसाठी मित्रांकडून आणि शत्रूंकडून देखील पैसा मिळवित असे. प्रसंगी स्वत:चा बंगला गहाण ठेवून संस्थेच्या कामात खंड पडू दिला नाही. अमरावती येथे एक भव्य इमारत उभी केली. निजामापासून दोन लाख रूपये देणगी मिळविली. रंकापासून रावांपर्यंत, अधिकार्यापासून शिपायापर्यंत मदत घेतली. परंतु शिक्षणाच्या आणि इमारतीच्या कार्यात रूकावट येऊ दिली नाही. श्री शिवाजी शिक्षण संस्था उभारणीत अण्णासाहेब पडोळे, बाबासाहेब धारफळकर, मामासाहेब लोंढे, डॉ. आबासाहेब खेडेकर, बी. एम. देशमुख, कानफाडे गुरुजी, पंढरीनाथ पाटील अशा मोठमोठ्या व्यक्तींचे योगदान आहे.
गुणग्राहकता, संघटन कौशल्य, गोरगरिबांविषयी आत्मीयता आणि नि:स्वार्थ सेवाभावी वृत्ती ही डॉ. पंजाबराव देशमुखांची गुणविशेष होय. शिवाजी शिक्षण संस्थेचा आज आढावा घेतला तर या संस्थेच्या शाळा, महाविद्यालये, अध्यापक आणि कृषी महाविद्यालये, कला, वाणिज्य, विज्ञान, शारीरिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण व विधी महाविद्यालय अशा एकूण 277 शिक्षण संस्था आज कार्यरत आहेत. शिक्षणाच्या समाजिकरणात या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. बुलडाणा, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वाशिम आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यात या संस्थेच्या सर्व शिक्षण संस्था नावलौकिक मिळवत असून सामान्यजनांच्या मुलांना शिक्षणाच्या सोयी अत्यल्प दरात उपलब्ध करून देत आहेत ही एक अभिमानाची बाब आहे.
27 डिसेंबर रोजी कर्मवरी, शिक्षणमहर्षी, कृषिरत्न आणि बहुजनांचे कैवारी डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला आहे. त्यांचे चरणी विनम्र अभिवादन !
________________________________________________
प्रा. डी. एम. कानडजे, श्री शिवाजी महाविद्यालय, चिखली, जि. बुलडाणा फोन 8275231874
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)
No comments:
Post a Comment