आयुष्याच्या क्षितिजावरती मावळणारा सूर्य जर उद्याची पहाट घेऊन उगवणारा असेल तर त्याच्या पहिल्याच किरणा मला श्री शिवाजी संस्थेच्या उत्कर्षाचा सोनेरी उष:काल दिसतो. सूर्याचं तेजही फिकं पडाव असं स्वयंप्रकाशित, क्रांतिकारी, परिवर्तनशील व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख. वैभवशाली, समृद्घ कृषीप्रधान देशाचे स्वप्न पाहणार्या लोकनेत्याचं विचारसामर्थ्य शब्दबद्घ करणं शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारे, सामान्या माणसाला सकारात्मक प्रेरणा देणारे, शेतकर्याला बळ देणारे, चिंतनशील, निरपेक्ष नेतृत्व, मातीशी इमान राखणारं दातृत्व, भूमीपुत्रात चैतन्य निर्माण करणार कर्तृत्व पाहिलं की अभिमानाने मान ताठ होते. नि:स्वार्थ लोकसेवेमुळे विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या या महामानवाच्या कार्यकर्तत्वाचा सुगंध प्रत्येकाच्या अंतरंगात चंदनाप्रमाणे दरवळत आहे. समाजसेवेची बाग फुलवण्याचे सामर्थ्य त्यांच्या कार्यात आहे. आज विकासाचं बीज याच महामानवाच्या विचारानं मशागत केलेल्या जमिनीत पेरलं आहे.
सामाजिक जाणिवेची धग उराला लागली की मनुष्य माणूस होतो आणि आपली सामाजिक जबाबदारी ओळखून समाजकल्याणासाठी सिद्घ होतो. त्याचे जगणे व्यक्ती आणि कुटुंबाच्या पलिकडे जाते. म्हणूनच भाऊसाहेबांचे विचार आजही क्रांतिकारी वाटतात. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्थित्यंतरे झाली. सुधारणा झाल्या. मध्यवर्हाड प्रांतामध्ये 1930-33 कालखंडात भाऊसाहेबांनी मांडलेले कर्जलवाद बील, देवस्थान संपत्ती बिल, शेतकर्यांचा चौदा कलमी कार्यक्रम ठराव लोकसभेत पारित करून अंमलात आणले असते तर हे तीनही मार्ग अज्ञान, बेकारी, निरक्षरता, भ्रष्टाचार, शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी होते. कृषीप्रधान भारत देशाला महासत्ता बनवण्याचा दुर्दम्य आशावाद भाऊसाहेबांच्या कार्याचं वेगळेपणं सांगतो.
ह्याच विचारांची आणि कृतीची आज गरज आहे. कारण संविधानात्मक लाभान्वित शोषित व शासकवर्गाला जनकल्याणाची जाणीव, जबाबदारीचा विसर पडलेला दिसतो. लोकशाहीचा वापर स्व-विकासासाठी होत असल्याने, नेतृत्वाच्या भावनेला गळफास लावल्या जात आहे. भारतात संविधान लागू होऊन सहा दशकांपेक्षा जास्त काळ लोटला परंतु आजही अधोगती, अवनतीने समाज जीर्ण होतोय, जातीयवाद पोसला जातोय. भ्रष्टाचार राखला जातोय, शेतकरी मारल्या जातोय, गरीब गाडल्या जातोय. गरीब-श्रीमंतीची दरी वाढलीय म्हणून पुन्हा तुम्हा-आम्हाला अखंड निद्रेतून चाललेल्या प्रवासात खंडित करण्याची ताकद भाऊसाहेबांच्या विचारात आहे.
बहुजन समाजाच्या उत्थानाची जाणीव व बांधीलकी असल्याने त्यांनी संघटनात्मक, संस्थात्मक पातळीवर लोकजागृती व लोक चळवळ उभारली. समर्पित भावनेने धेय्याकडे झेपावत कार्य पूर्णत्वास नेले. यामुळे भाऊसाहेबांच्या प्रतिनिधित्वाची भावना, जाणीव व संकल्प आजही प्रभावीपणे कार्यरत राहून जिवंत आहेत. म्हणूनच जयंतीदिनाचे औचित्य साधून जनकल्याणाच्या प्रेरणेने भाऊसाहेबांच्या कार्याचं पुन:स्मरण करणं शिवपरिवार आपलं कर्तव्य समजतो.
शिक्षणाने क्रांती होते, नव्या जगात झेपावण्याच सामर्थ्य निर्माण होतं. स्वत:चं जग घडवता येतं असा विश्र्वास सर्व स्तरावर रुजवणारे भाऊसाहेब ह्या भूमीचे शिक्षणमहर्षी आणि कृषिरत्न ठरले. बालवयापासून संघर्षमय आयुष्य जगलेल्या, दु:ख-दारिद्र्याने गांजलेल्या, कर्जाच्या भाराखाली वाकलेल्या, अज्ञानात खितपत पडलेल्या दीन दुबळ्या माणसांच्या मोडलेल्या कण्याला त्यांनी ताकद दिली. विषमतेची, अज्ञानाची कारणे शोधली. अंत:शक्तीचा संपूर्ण आविष्कार करण्यासाठी अपार कष्ट घेतले. शिक्षणसेवेच्या माध्यमातून अंत:करणावर संस्कार करणारा माणुसकीचा धर्म दिला. परिस्थितीपुढे न झुकता जागतिक पटलावर वशाची मोहोर उमटविली. भाऊसाहेबांच्या वाटचालीचा, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा, साधलेल्या परिणामांचा लेखाजोखा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विकासात्मक वाटचालीतून प्रत्ययाला येत आहे. कालचे भाऊसाहेब आजचे चिरंजीव, यशवंत, आदर्श आहेत. त्यांचे नि:स्वार्थ कार्य आज वैभवाने डोलत आहे.
मानसशास्त्राच्या प्रणेत्यांपैकी एक असणार्या विल्यम जेम्स यांनी म्हटलयं ‘माझ्या पिढीची सर्वात मोठी क्रांती म्हणजे माणसाला मनोवृत्ती बदलून आयुष्यात बदल घडवता येतो याची समज येणं.’ अशा विचारांनी प्रेरित होऊन सत्ता, संपत्ती, पद, समाजमान्यता यापैकी कसलेही पाठबळ नसताना महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक पातळीवर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी क्षेत्रात स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. विदर्भाच्या कुशीत वसलेल्या कर्मभूमीत पापळसारख्या छोट्या खेड्यातला भाऊ, भारतीय समाजकारण, राजकारणातला, घ्भाऊसाहेबङ झाला. शोषित, पीडित, दलित, रुढीग्रस्त समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आयुष्यभर झटला. प्रत्येक शेतकर्याच्या घरात सामर्थ्यशाली माणूस निर्माण करण्याची दुर्दम्य आकांक्षा मनी बाळगून श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. नवी उमेद दिली. बदल घडवून आणण्याची संधी दिली. संधी अधिक कर्तृत्व म्णजे गुणवत्ता असते. संधी मिळाल्यानंतर कर्तृत्व गाजवले पाहिजे यात मुळीच शंका नाही. पण ज्यांना संधीच मिळत नाही, त्यांनी कर्तृत्व कसे गाजवावे? हे जाणल्यामुळे समाजप्रबोधनातून विदर्भात विकासाचे मार्ग विस्तृत होऊ लागले. शेकडो वर्षांपासून मानगुटीवर बसलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्घा वाईट चालीरितींना फाटा देऊन सर्वांना समान पातळीवर आणून समाजक्रांती घडवून आणली.
भाऊसाहेबांचे आयुष्य एक खडतर प्रवास ज्यामध्ये कधी उत्तुंग शिखरे तर कधी खोलदर्या तरी अपयश पचवण्याची ताकद ठेवून यश मिळवण्याची चिकाटी, कौशल्य अनुकरणीय आहे. चाकोरीबाहेर पडून समाजकल्याणासाठी अनेक अडथळे पार करीत गुण माणसांना एकत्र आणून सहकार, शिक्षण, शेती आणि शेतकरी या क्षेत्रात खंबीरपणे कार्य केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, भारत कृषक समाज नवी दिल्ली ह्या संस्थाचे संस्थापक, अध्यक्ष म्हणून कृषक नेता पालनहार ठरला. ही गरुड भरारी क्रियाशील कर्तृत्व ठरले. अखंड परिश्रम, घरावर तुळशीपत्र स्व-सुखाच्या समिधा समर्पित करणारे जीवन बहुजनांचे उद्घारक ठरले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रुपानं भाऊसाहेबांनी शिक्षणाचं शस्त्र हाती दिलं आणि प्रगतीचे अशोकचक्र वेगाने फिरू लागले. बौद्घिक, वैचारिक खतपाणी घालून मेंदूची शेती केली. नव्या पिढीला आकार दिला. विकासाची बाग फुलवली. अविवेकाचं, असहकाराचं, अनितीचं तण उपटलं. समतेने निराधारांना आश्रय दिला. साहित्यिक म्हणून लेखनातून राष्ट्रकार्य केले. संशोधनवृत्तीने समाजाच्या घरसत्या नीतिमूल्यांबद्दल परखडपणे विचार मांडले. सांस्कृतिक मूल्ये जोपासली. उभ्या आयुष्याची शिदोरी गरिबांच्या चरणी समर्पित केली. क्रांतीसूर्याप्रमाणे आपल्या कार्याची प्रखरता अधिक तेजोमय झाली. वर्हाडच्या भूमीत शिक्षणाची बीजे पेरली. शैक्षणिक विकासासाठी राजर्षी शाहू महाराज, हैदराबादचा निजाम, प्रिन्स ऑफ बेरार, मध्यप्रदेशचे प्रशासक हेन्री गीरफिल्ड इ. अनेक दानशूर व्यक्तिंकडून आर्थिक सहकार्य मिळवले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेस अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यापैकी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन, विद्यमान राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची नावे विशेषत्वाने नमूद कराविशी वाटते.
पंडित जवाहरलाल नेहरू भाऊसाहेबांच्या वक्तव्याबद्दल विचार करीत, कारण मुलभूत हक्काच्या मसुद्यावरील त्यांचे भाषण चिंतन करण्यासारखे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊसाहेबांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. घटना समितीत समारोपाच्या वेळी दिलेल्या भाषणात गौरव करताना ते म्हणाले, ‘डॉ. पंजाबराव देशमुखांसारखे टीकाकार घटना समितीत नसते तर घटना समिती केवळ मुक्या बहिर्यांची झाली असती. तो एक कळसुत्री देखावा ठरला असता, आणि आज जे घटनेला स्वरूप प्राप्त झाले ते झाले नसते.’
डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जीवनपट उलगडतांना आपणच कुठंतरी कमी पडतोय ही जाणीव मनात उमटते. कळतं पण वळत नाही. धावतो सवयीनं, जगण्यासाठी, स्वत:साठी, जिंकण्यासाठी पण आतला प्रेरक आवाज ऐकू येत नाही. भाऊसाहेबांसारखी स्वप्न उघड्या डोळ्यांना पडत नाही, पंख असून बळ येत नाही, आकाश आपलं पण झेप घेत नाही. भाऊसाहेबांनी दिलेल्या संधीचं सोनं करत नाही...
मग उगवतो 27 डिसेंबर. जन्मदिन... नैराश्येच्या अंधारात उत्कर्षाचा दिवा बनून. सोनेरी किरणांनी ही विदर्भभूमी पुन्हा उजळते. भाऊसाहेबांची पावलं जिथं रुजली ती माती जगण्याचा धर्म सांगते, यशाचे मर्म जाणते. पुन्हा शिवपरिवाराचं अखंडीत रूप आपलं वाटू लागतं. एकजुटीनं आव्हाने पेलण्यास मनगटात बळ येतं. पावलांची गती वाढते, विझलेले दिप उजळतात, लढण्याच बळ येतं पुन्हा भाऊसाहेब भेटतात. नव्या जाणिवा फुलतात प्रचंड त्यागातून मिळवलेलं भारतीय स्वातंत्र्य अबाधित राखणं समजतं. समाजव्यवस्थेत, सामाजिक ज्ञान लक्षात घेऊन, समाजपरिवर्तनाची कामगिरी उमगते ध्येय असेल तर कष्टाला पर्याय नाही हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात सक्सेसचा पासवर्ड सापडतो. कितीही संकट आली तरी नाऊमेद व्हायचं नाही हा धागा गवसतो.
सारं जग सक्सेस फ्रेंडली वाटू लागतं आजवर कुणी विचारलं नाही पण उद्या कधी विचारलच... तुम्हारे पास क्या है?... तर ! भाऊसाहेबांनी दिलेल्या स्वप्नांशिवाय खरंच आपल्याकडे काय आहे? संत तुकोबाराय म्हणतात,
चंदनाच्या वासे । तरु चंदन जाले स्पर्शे॥
अशा नवसृष्टीच्या भाग्यविधात्यास मानाचा मुजरा
________________________________________________
- डॉ. स्मिता देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)
No comments:
Post a Comment