शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

समतेचे समर्थक___प्रा. व्ही. जी. पडघन

पृथ्वी-तलावर सर्व मानव निर्सगत:च समान असताना माणसानेआपल्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक तर काही अजानता मानवामध्ये विविध भेद निर्माण केले. विशेषत: भारतामध्येच या भेदाची उत्पत्ती झाल्याचे दाखले पहायला मिळतात. आजही त्याचे उग्र स्वरुप पहायला मिळते. त्यामुळे देशाचे अतोनात अतोनात नुकसान झाले. अशिक्षितपणा, अंधश्रद्घा, कालबाह्य रुढी-परंपरा इत्यादीमुळे अनेक प्रकारचे भेदभाव भारतीय समाजामध्ये रुढ झालेत. प्रामुख्याने स्पृश्य-अस्पृश्य, स्त्री-पुरुष, ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत इत्यादी.
भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांना विद्यार्थी असतानाच ह्या समस्येची जाणीव झाली असावी. विद्यार्थी दशेतच ह्या समस्येबाबत त्यांचया मनाची घडण होत गेली. त्यावर चिंतन, मनन होते गेले. पण वेळ आली नव्हती. कारण प्रथम शिक्षण पूर्ण करणे हे भाऊसाहेबांचे ध्येय होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा व त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा प्रभाव भाऊसाहेबांवर पडणे क्रमप्राप्त होते. महात्मा ज्यातीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेबाबा यांचया कार्याची जाणीव लोकमान्य टिळक, आगरकर तसेच महात्मा गांधीची स्वातंत्र्यांची चळवळ दृष्टिआड करणे शक्य नव्हते. लंडन येथील वास्तव्यात तेथील समता-स्वातंत्र्य आणि आर्थिक उन्नती पाहून कोसोदूर असल्याची जाणीव भाऊसाहेबांना होती. विलायतेतील सहा वर्षाच्या वास्तव्यात ज्ञान सामर्थ्य संपादन करुन 1926 मध्ये भारतात परत आले. त्यानंतर तन-मन-धनाने त्यांनी भारत देशाची सेवा केली.
भाऊसाहेबांचे कार्य बहुविध असून त्यापैकी त्यांच्या भेदभाव निर्मूलन व समानता स्थापित करण्याच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात करीत आहे. 

अस्पृश्यता निर्मूलन कार्य :

स्पृश्य-अस्पृश्यता या भेदान सर्व भारतभर उग्र स्वरुप धारण केले होते. संपूर्ण भारतभर अस्पृश्यता पाळली जात होती. त्याला वर्‍हाड प्रांत अपवाद नव्हता. अस्पृश्यता नष्ट करण्यात महाराष्ट्रामधील समाजसुधारकांनी सुरुवात केली होती. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, वि.रा.शिंदे यांचे कार्य मोलाचे होते. भाऊसाहेबांच्या समकालीन समाज सुधारकांमध्ये संत गाडगे बाबा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचे सामाजिक कार्य हाती घेतले होते. त्याच काळात भाऊसाहेबांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य हाती घेऊन त्या कार्याला सुरुवात केली होती. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी भाऊसाहेबांनी केलेले प्रभावी कार्य खालील प्रमाणे आहे.  

मंदिर प्रवेश सत्याग्रह :

अस्पृश्यांना देव-देवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करता येत नव्हता. त्यांना मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घ्यावे लागत होते. भाऊसाहेबांनी अस्पृश्यता तनवारणाचा मार्ग म्हणून नोव्हेंबर 1927 मध्ये अमरावतीतील अंबादेवीच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्याचे ठरविले. मंदिर प्रवेश हा प्रश्न फक्त धार्मीक नसून सामाजिक होता. म्हणून भाऊसाहेबांच्या पुढाकाराने विदर्भ प्रांतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. भाऊसाहेबांनी गावो-गावी जाऊन सत्याग्रहाचे महत्त्व सांगून प्रचार केला. त्यामुळे हजारो सत्याग्रही मंदिर प्रवेशाकरिता नियोजित तारखेला उपस्थित झाले होते. बहुजन समाजातील अनेकांचा अस्पृश्यांना मंदिर प्रवेशास विरोध होता. तसेच अमरावती मधील अंबादेवी पुराणमतवादी विश्वस्त मंडळाचाही विरोध होता. पण भाऊसाहेब सच्चे समाजसुधारक होते. त्यामुळे ते आपल्या मतावर ठाम होते. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब खापर्डे होते. भाऊसाहेबांनी सत्याक्रहाकरिता डॉ. बाबासाहेबांना बोलाविले होते. 
मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष, दादासाहेब खापर्डे यांनी अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्याविषयी आश्वासन भाऊसाहेबांना दिले. तशी तडजोड झाली. त्यामुळे तसे पत्र खापर्डे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाठवून येत्या तीन महिन्यात मंदिर अस्पृश्यासाठी खुले करुन देण्याबाबत कळविले त्यामुळे भाऊसाहेबांना सत्याग्रह तात्पुरता मागे घ्यावा लागला. भाऊसाहेबांच्याच कार्याचे फळ म्हणून अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले. 

एक पाणवठ्याची योजना :

पाणी पिण्यासाठी स्पृश्य -अस्पृश्य यांचया वेगवेगळ्या विहिरी होत्या. स्पृश्यांच्या विहिरीवर अस्पृश्यांना पाणी भरण्यास मनाई होती. प्रथम महात्मा फुल्यांना स्वत:च्या मालकीची विहीर अस्पृश्यांसाठी पाणी पिण्यांकरिता खुली केली तेच कार्य पुढे भाऊसाहेबांनी केले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि स्पृश्य-अस्पृश्य यातील भेदभाव कमी करण्यासाठी खुल्या केल्या. भाऊसाहेब बोलके सुधारक नव्हते तर ते कर्ते समाजसुधारक होते म्हणून त्यांनी अस्पृश्यांसाठी पिण्याच्या विहीरी खुल्या करण्यासोबतच स्वत:च्या खर्चाने अनेक विहीरी खोदून दिल्या. स्पृश्य-अस्पृश्य एकाच विहीरीवर पाणी भरत असलयाचा पहिला प्रयोग भाऊसाहेबांनी यशस्वी केला. त्यामुळे स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव कमी होऊन अस्पृश्यता कमी झाली. 

श्रद्घानंद छात्रालयाची स्थापना :

अस्पृश्यता एवढी भयंकर होती तसेच जाती विषमता होती. विविध जातीतील विद्यार्थी एका वसतिगृहामध्ये राहणे अशक्य होते. विविध जातीतील विद्यार्थी एका छात्रालयांमध्ये एकत्र आणणे म्हणजे विरोधकांच्यादृष्टीने धर्मबुडवेपणाच होता.जाती व्यवस्थेला विरोध म्हणजे धर्माला विरोध. त्याकाळी अनेक जातीसाठी स्वतंत्र छात्रालये होती. भाऊसाहेब देशमुखांनी स्पृश्य, अस्पृश्य भेद नष्ट व्हावा, अस्पृश्यता नष्ट व्हावी, खेड्यातील शेतकरी, शेतमजूर व अस्पृश्यांची मुले शिकावी याकरिता कमी खर्चात मोफत शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून श्रद्घानंद छात्रालय स्थापन केले. सर्वच जाती धर्मातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून जाती व्यवस्था व अस्पृश्यता नष्ट केली. भाऊसाहेबांच्या शैक्षणिक संस्थेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच पुढे वर्‍हाडातील अस्पृश्यता व जातीयता नष्ट करण्यात मोलाची भर घातली. 

सहभोजन घडवून आणले: 

भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचा सहभोजनातून अस्पृश्यता नष्ट होऊ शकते ह्यावर गाढा श्रद्घा होती. त्यांच्या मते कायदेमंडळात कायदे करुन आणि पुढार्‍यांनी भाषणे देऊन अस्पृश्यता व जातियता नष्ट होणार नाही. भाऊसाहेब हे बोलके सुधारक नसून कृतिशील सुधारक होते. म्हणून त्यांनी झाडांच्या फांदयाना हात न घालता प्रत्यक्ष बुंध्यावरच त्यांनी घाव घातला. सहभोजनाचा पहिला प्रयोग त्यांनी श्रद्घानंद छात्रालयाच्या स्वरुपात केला. तसेच गावा-गावामध्ये अस्पृश्यांसहित सर्व जातीतील लोकांना एकत्र आणून सहभोजन दिले. त्यांच्या वडिलांच्या श्रद्घांच्या वेळी पारंपारिक श्रद्घेला फाटा देऊन पितर म्हणून अस्पृश्यांना निमंत्रित केले व त्यांनाच भोजन दिले. भाऊसाहेबांचे हे कार्य क्रांतिकारक , अंधश्रद्घेला फाटा देणारे व अभिनंदनीय ठरले. 

स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते :

भाऊसाहेब हे स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते. भारतामध्ये प्राचीन काळापासून स्रियांना पुरुषांकडून दुय्यम वागणूक मिळत होती. स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही स्त्री-पुरुष असामानतेची प्रथा सुरुच होती. भाऊसाहेबांसारख्या दुरदृष्टीच्या समाज सुधारकाला बाब खटकणारी वाटत होती. भाऊसाहेबांनी स्वत: स्रियांच्या उन्नतीकरिता व त्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता पुढाकार घेतला. स्त्री ही स्वतंत्र असली पाहिजे. स्रियांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला पाहिजे, म्हणूनच भाऊसाहेबांनी स्रियांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले. श्रीमती राधाबाई बुधगांवकर या तमाशा कलावंत बाईचा भाऊसाहेबांनी सत्कार केला.
भाऊसाहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या काकूंची विधवा बहीण राहत होती. त्यांची मुलांच्या वसतिगृहावर निरीक्षिका म्हणून नियुक्ती केली. स्वत:च्या पती विमलाताई मॅट्रीक होत्या. विवाहानंतर भाऊसाहेबांनी एल.एल.बी. शिकवले तसेच सौ.कुसुमावती देशपांडे ह्या स्त्री असल्यामुळे महाविद्यालयात प्राध्यापिका करिता सिलेक्शन कमिटीने नियुक्ती केली नाही. उमेदवाराची पात्रता असूनही फक्त ती स्त्री असल्यामुळे नाकारणे म्हणजे कुसूमावतीवर अन्यायच होता. भाऊसाहेबांनी स्वत: लक्ष घालून कुसूमावती बाईची नियुक्ती केली. त्यामुळे कुसूमावतींना न्याय मिळाला व स्त्री पुरुष समानता हे तत्व भाऊसाहेबांनी अंगिकारले. 

ग्रामीण-शहरी भेद अमान्य :

भाऊसाहेबा स्वत: ग्रामीण व शेतकरी कुटुंबामधून आले होते. ग्रामीण जीवनाशी त्यांचा जवळून संबंध होता होता. शहरी लोकांच्या तुलनेत ग्रामीण लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. शेतकरी दिवस-रात्र राबून देखील त्यांच्या कुटुंबाला खायला पोटभर अन्न मिळत नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये मुलीचे लग्न किंवा इतर सामाजिक कार्य करावयाचे झाल्यास सावकाराकडून शेतकर्‍याची लुबाडणूक होत होती म्हणून भाऊसाहेबांनी ग्रामीण जीवन सुधारण्याकडे लक्ष दिले. 
विषमता, शोषण, गरिबी, अज्ञान इत्यादी नाहीसे करण्यासाठी शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे. करिता शाळा व महाविद्यालये काढून त्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या. त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता चौदा कलमे ही प्रभावी उपाय योजना भाऊसाहेबांनी मांडली त्याला बर्‍याच प्रमाणात यश येऊन ग्रामीण जीवन सुधारण्यास मदत झाली. पण दुर्दैवाने पुढील काळात भाऊसाहेबांच्या चौदा कलमांचा शासनाला विसर पडला परिणामत: विदर्भातील शेकडो शेतकर्‍यांनी अलिकडे आत्महत्येचा मार्ग निवडून आपली जीवनयात्रा संपविली. भाऊसाहेबांनी त्याकाळी चौदा कलमे मांडून शेतकर्‍यांविषयी असलेली तळमळ व ग्रामीण जीवनमान सुधारण्यासाठी केलेले कार्य दृष्टिआड करता येत नाही. 
__________________________________________________
प्रा. व्ही.जी. पडघन, डॉ. एच.एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर 

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा