शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

बहुआयामी भाऊसाहेब ___बी.जे. गावंडे/ रजनी बढे

बहुजन समाजाच्या उत्थानाच्या इतिहासात सर्वप्रथम नाव येते ते महात्मा ज्यातीबा फुले यांचे शेतकर्‍यांचा आसुड लिहून ज्योतिबांनी शेतकर्‍यांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला. दैन्य, कर्जबाजारी, शोषित, शेतकर्‍यांचे हुंकार व उसासे त्यांनी लिपीबध्द केले. या लिपीबद्घ, हुंकारात डॉ. पंजाबरावांना आपल्या जीवनध्येयाचे, जीवनकार्याचे प्रतिबिंब दिसले. ज्योतिबांच्या शिक्षणविषयक कार्याची प्रेरणा मिळाली, बहुजन समाजाच्या विकासाच्या मूलमंत्र शेती आणि शिक्षणात असल्याचे भाऊसाहेबांनी मनोमन स्वीकारले आणि एका नव्या युगाचा जन्म झाला. या युगाचे शिल्पकार होते डॉ. पंजाबराव देशमुख.
प्रात:स्मरण करुन स्फूर्ती घ्यावी असे विदर्भ भूमीतील नररत्न, महामानव डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख बहुजन समाजातून उदयाला आलेले व बहुजन समाजासाठी समर्पित झालेले जीवन होय.या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करण्यास शब्दसामर्थ्य कमी पडल्यास नवल नाही. सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व साकार होऊ शकते याचे नाही. सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व साकार होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब. इंद्रधनुष्यातील सप्तरंग भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वात सामावलेले होते. कृषिक्षेत्रात भाऊसाहेब अग्रणी, शिक्षणक्षेत्रात आघाडीवर, तर सहकार क्षेत्रात भाऊसाहेब स्पर्धा करणार्‍यांच्या पुढे होते. राजकारणात राहूनही राजकारणाच्या दुर्गंधीपासून अलिप्त असणारे भाऊसाहेब म्हणजे, चिखलातून उगवलेले कमळच होय.
27 डिसेंबर 1898 ला गीताजयंतीच्या दिनी अमरावती जिल्ह्यातील पापळ ह्या गावी कदम घराण्यात श्यामराव बापू देशमुख व आई राधाबाई यांच्या पोटी जन्म झाला. श्यामराव बापू सामान्य शेतकरी होते. आपल्या मुलाला शिक्षण द्यावे अशी त्यांची इच्छा होती. भाऊसाहेबांनी तिसरीपर्यंत पापळ येथेच शिक्षण घेतले. पापळ गावी चौथा वर्ग नसल्यामुळे तिसरा वर्ग पास झाल्यावर पुन्हा त्याच वर्गात प्रवेश घेतला. चवथी ते सातवी पर्यंतचे शिक्षण पापळ पासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या कारंजा लाड येथे घेतले. पुढील शिक्षण अमरावती येथे मॅट्रीकची परीक्षा 1915 साली उच्च श्रेणीत पास केली. आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे, अशी शामराव बापू ह्या स्वाभीमानी आणि दूरदृष्टीच्या कर्तव्यतत्पर शेतकर्‍याची इच्छा होती. आर्थिकस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी आपली शेती सावकाराकडे गहाण ठेवून कर्ज घेऊन भाऊसाहेबांना 1916 मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्यूसन कॉलेज पुणे येथे पाठविले. अनेक आर्थिक अडचणींवर मात करुन त्यांनी 1922 मध्ये बी.ए.ऑनर्स ही पदवी पुणे विद्यापीठातून मिळविली. आपल्या मुलाने फार मोठे होऊन केवळ आईवडिलांनाच मिळविली. आपल्या मुलाने फार मोठे होऊन केवळ आईवडीलांनाच मदत न करता वर्‍हाडातील सर्व गोरगरीब शेतकरी आणि ग्रामीण, पिडीत समाजाला मदत करावी यासाठी कर्जबाजारीपणची खंत न बाळगता उच्च शिक्षणासाठी 1923 ला इंग्लडला पाठविले. 
1923 ला इंग्लंड येथे पोहोचल्यानंतर भारतातील एक बुद्घिमान शेतकर्‍यांचा मुलगा उच्च शिक्षणासाठी आलेला आहे आणि तो गुणानुक्रमे पहिला आहे. म्हणून त्यांना 1923 पासून डनलॉप स्कॉलरशिप शासनाकडून मंजूर करण्यात आली. 1926 पर्यंत त्यांनी अनेक अडचणींचा सामना करुन लंडन येथील एडीनबर्ग विद्यापीठातून एम.ए.ची. उच्च पदवी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केली. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात वैदिक वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास हा संशोधन प्रबंध सादर केला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने 1926 मध्ये त्यांना डी.फिल. ही पदवी बहाल केली. ह्याच कालखंडात भाऊसाहेबांनी कायदेशास्त्राचा अभ्यास करुन बार- अ‍ॅट-लॉ ही पदवी मिळविली. 1926 ला भाऊसाहेब भारतात परत आले. भाऊसाहेब भारतात परत आल्यावर वडिलांच्या आग्रहास्तव वकिली सुरु केली. परंतु भाऊसाहेबांचा पिंड शेतकर्‍याची दैनावस्था, त्यांच्या हालअपेष्टा, त्याचप्रमाणे त्यांची हलाखीची परिस्थिती व कर्जबाजारीपणा पाहून भाऊसाहेबांचे अंत:करण द्रवले आणि त्यांनी शेतकरी व ग्रामीण समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी सुखी होण्याकरिता, त्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत ह्याकरिता वसतीगृहाची व व्यायाम शिक्षण संस्थेची स्थापना केली. श्रद्घानंद वसतीगृहामध्ये समाजाच्या सर्व स्तरातील कष्टकरी होतकरु विद्यार्थ्यांना विनामूल्य राहण्याची, जेवण्याची व शिक्षणाची सुविधा 1926 ते 1965 पर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत तसेच कोणतेही शासकीय अनुदान उपलब्ध नसताना करुन दिली. या संस्थेच्या स्थापनेपूर्वी महाराष्ट्रात अशा शिक्षणाच्या सोयीची उपलब्धता केवळ महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थांनात माननीय व आदरणीय शाहू महाराजांनी सुरु केली होती. 
शाहू महाराजांच्या या शैक्षणिक कार्य व संवर्धनाचा वसा शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुखांनी घेतला आणि अनेक गरीब विद्यार्थ्यांना श्री श्रद्घानंद अनाथलयाद्वारे शिक्षणाची दारे उघडी करुन ज्ञानाची गंगा प्रवाहीत केली. कर्मयोगी संत गाडगेबाबांचे सहाय्य मिळाले. ह्या वसतिगृहातून अनेक समाज भूषण व्यक्तिमत्त्वांची निर्मिती झाली. शेतकरी सुखी होण्याकरिता त्या गोरगरिबांची मुल शिकली पाहिजेत. ह्याकरिता 1928 मध्ये अमरावती जिल्हा जनपद सभेचे अध्यक्ष झाल्याबरोबर सर्वप्रथम जिल्ह्यात अनिवार्य शिक्षणाची सोय व्हावी म्हणून विरोधकांचे हृदय परिवर्तन करुन 18 पै. असलेला अधिभार 27 पै पर्यंत वाढविण्यात यश मिळविले. म्हणजे 50% करात वाढ करुन त्यांचा वापर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करण्याचा ठराव मंजुर केला. बहुजनांमधील अंधश्रद्घा, वाईट चालीरिती, रुढी परंपरा,नष्ट करुन त्यांना आधुनिक, वैज्ञानिक विचार प्रवाहात उभे करायचे असेल तर शिक्षण आवश्यक आहे. विद्यामृतानेच विद्यर्थ्यांत आणि विदर्भात नवचैतन्य निर्माण होईल. शिक्षित हाच समाजाच्या क्रांतीच नेतृत्व करु शकतो. हे त्यांनी हेरले होते. म्हणूनच भाऊसहोबांनी 1931-1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करुन बहुजन, ग्रामीण गरीब शेतकर्‍यांच्या मुला मुलींना सुशिक्षीत व संपन्न बनविण्याच्या जाणिवेतून वटवृक्ष उभा केला. शिक्षण संस्थेवर आर्थिक संकट आले असता स्वत:चा अमरावती येथील बंगला गहाण ठेवून अर्थप्रबंधन केले होते. हे सर्वांना माहीत आहे. 30 जानेवारी 1950 ला भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे 2011-12 ह्या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सुरु झाले आहे. 
सर्वप्रथम पहिली शाळा खापर्डे बगिच्यात काढण्यात आली. तिला तट्टयाची शाळा म्हणून ओळखायचे. नंतर त्या शाळेचे स्थानांतर रेल्वे. स्टेशन जवहील जागेत करण्यात आले. श्री शिवाजी हायस्कूल, स्टेशन ब्रँच अमरावती ह्या नावाने आज ती ओळखली जाते. ह्या शाळेची भूमी डॉ. पंजाबराव व संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने झालेली आहे. त्या शाळेतून अनेक महान व्यक्ती घडल्या. त्यापैकी अमरावती शहर व परिसरातील नामवंत डॉक्टर व समाजभूषण मा.वा.पु. राऊत हे सुद्घा आहेत. तयांनी वर्ग 5 वा 6वी पर्यंतचे शिक्षण ह्याच शाळेत घेतले. महणजे शिक्षणाचा नया ह्याच शाळेत भक्कम झाला. त्या जोरावर पुढे मेनब्रँचमध्ये हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले व नागपूरला वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय शास्त्रातील उच्च शिक्षण इंगलंडला पूर्ण करता आले व एक नामांकित डॉक्टर म्हणून सतत 50 वर्षे रुग्णांची सेवा त्यांनी केली. भाऊसाहेबांबद्दल बोलताना ते म्हणाले की, गाडीत बसलयावरही जर त्यांना भेटायला कोणी आले तर ते गाडीतून उतरुन त्या व्यक्तीची भेट येत. चहापान करीत व मग निघून जात असे हे निगर्वी व्यक्तिमत्त्व होते. भाऊसाहेबांचे बी.पी. तपासण्यासाठी मी दररोज बंगल्यावर जात असे परंतु अंत्यसमयी मी त्यांचे जवळ नव्हतो याची मला सदैव खंत राहील. भाऊसाहेबांच्या या संस्थेत मी सतत 20 वर्षापासून कोषाध्यक्ष आहे. हे मी माझे भाग्य समजतो थोड्या फार प्रमाणात का होईना त्यांच्या रुणातून उतराई होऊ शकलो. याचे मला समाधान आहे असे ते म्हणाले अशी समाज कार्य करणारी असंख्य माणसे भाऊसाहेबांमुळे घडली आहे.

स्त्री शिक्षण विषय कार्य :

मुलींच्या आयुष्याचे सुखी स्वप्न रंगविताना त्यात शिक्षणांचे रंग भरायला विसरु नका असेच जणू भाऊसाहेब सांगत. या समाजव्यवस्थेत स्रियांचे शोषण अतिशय चिंताजनक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वैदिक धर्मग्रंथ हा हिंदू संस्कृतीचा आधारस्तंभ समजला जातो. या पार्श्र्वभूमीवरच त्यांनी ‘वैदिक साहित्यातील धर्माचा उगम व विकास’ या विषयावर संशोधन करुन शोषणाच्या मुळाचा शोध घेण्याच प्रयत्न केला. मनुष्याची निर्मिती ही कोणत्याही चमत्कारिक जगदात्म्याने केली नसून ते सरळसरळ उत्क्रांती क्रमाचे फळ आहे. साहजिक या सिद्घांतमुळे स्त्री-पुरुष भेदाभेदच नष् ट होतो. मग स्त्री ही शुद्र कशी ठरु शकते? असा प्रश्न भाऊसाहेब करतात. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कार्यात स्त्री-उत्थानाचा प्रयत्न निहित असलेला दिसतो. स्त्री-शिक्षणाचा खर्‍या अर्थाने विकास व्हावा म्हणून विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा प्रयत्न भाऊसाहेबांनी केला. 
नागपूरचे श्री.पी.बी. काळे आणि त्यांच्या सुविध पत्नी तत्कालीन खासदार अनुसया काळे यांच्याकडून त्यांच्या ट्रस्ट मधून 18 हजार रुपयांची देणगी भाऊसाहेबांनी मिळविली आणि यातून विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था केली भाऊसाहेबांनी आपल्या आयुष्यात स्रियांच्या संदर्भात कार्य केले. त्यापैकी हिंदू हायस्कूलवर स्त्री-शिक्षकांची नेमणूक केली. याच काळात कुसूमावती देशपांडेना शासकीय महाविद्यालयात नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. श्रद्घानंद मुलींचे वसतीगृह स्थापन केले. विमलाताई सोबत जिजामाता मंडळ, शिवबालमंदिर याचे काम पाहिले. अमरावतीत कस्तुरबा कन्या शाळा, अशा अनेक मुलींच्या शाळांची स्थापना केली. आपल्या शिक्षणासाठी आपल्या आई वडिलांनी केलेला संघर्ष त्यांनी स्वत: अनुभवला होता. म्हणुनच आपल्या आयुष्यात त्यांनी ज्यांना शिक्षणाची आस व जिद्द आहे अशा होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना भरभरुन मदत केली. इंजिनिअरिंग खात्यात मोठ्या मानाच्या पदावर पोहोचलेल्या-दशरथ ढोरे नावाच्या एका गरीब विद्यार्थ्यांला जो श्रद्घानंद अनाथलयात एक वेळ जेवून अर्धपोटी राहून शिकत होता त्याला शिक्षणाची संधी दिली. 

कृषी संस्कृती:

भारत हे एक मोठे कृषिप्रधान राष्ट्र आहे. ह्या देशात सर्वात मोठा कृषक शेतकरी समाज आहे. शेतकरी तसेच कष्टकर्‍यांच्या मुलाबाळांचा विकास व उन्नतीकरिता खर्‍या अर्थाने आजीवन अहोरात्र झटणारा एखादाच नेता समाजसेवक केवळ डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख असतो.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी मानवी जीवनातील कृषी हीच आद्य व सर्वात श्रेष्ठ संस्कृती मानली आहे. या कृषी संस्कृतीनेच मानवी जीवनाची वस्तुनिष्ठ मूलतत्वे निर्माण केली आहेत. कृषी शिवाय मानवी जीवनाच्या विकासाचे व सभ्यतेचे सिद्घांत फोल आहेत. पृथ्वीवरील मानवी संस्कृती व सभ्यतेचा विकास कृषीतूनच झाला असे भाऊसाहेब मानत होते. महापुरुषांचे विचार समूह पातळीवर रुजविले पाहिजे. असे भाऊसाहेब मानत होते. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख कृषकांचे नेते होते. ते कृषी संस्कृतीचे उपासक होते आणि कृषिक्रांतीचे प्रणेते होते. भाऊसाहेबांनी बहुजन समाजाची शैक्षणिक प्रगती आणि शेतकर्‍यांची उन्नती ह्या दोन गोष्टींचा विशेष ध्यास घेतला. नवसमाजाची बांधणी करावयाची असेल तर शेती उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचे भाव ठरवावे, शेतकर्‍यांना विमा योजना लागू करावी यासाठी आग्रह धरला. खेड्यातील भारत समृद्घ करावयाची असतील तर कृषक क्रांतीशिवाय तरणोपाय नाही. हे भाऊसाहेबांच्या कृषी विचाराचे सूत्र होते. 
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाऊसाहेबांनी गाजविलेली यशस्वी कारकिर्द सर्वज्ञात आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातून ते सलग तीन वेळा निर्वाचित झालेत. सन 1952 ते 1957 पर्यंत कृषिमंत्री आणि 1957 ते 1962 पर्यंत कृषिमंत्री व काही काळ सहकार मंत्री होते. 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. शेतकर्‍यांच्या मुलांना सवलती मिळवून दिल्यात.1959-60 मध्ये जागतिक स्वरुपाची कृषी प्रदर्शनी दिल्ली येथे भरवून कृषी विज्ञानाचे प्रगत स्वरुप भारतीय नागरिकांना दाखवून दिले. ह्या कृषी प्रदर्शनाकरिता अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर व रशियाचे अध्यक्ष क्रुश्चेव्ह उपस्थित होते. जगातील इतर सर्व देशातून प्रतिनीधी या मेळाव्यास उपस्थित होते. त्यावेळी भाऊसाहेबांची संघटन शक्ती व कार्य पाहून कृषकांविषयी आस्था पाहून सर्व लोक आश्चर्यचकीत झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेन हॉवर इतके प्रभावित झाले होते की, यांनी वाशिंग्टनला परतल्यावर भाऊसाहेबांना पत्र पाठविले. 
संपूर्ण ह्यातील भाऊसाहेबांनी बहुजनांचे, शेतकरी कष्टकरी, आबाल वृद्घांचे जीवन सुकर व्हावे म्हणून अहोरात्र परिश्रम घेतले. भाऊसाहेबांच्या ह्या बहुजनांच्या उत्थानाच्या चळवळीत वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबांनी आपल्या किर्तनातून सर्व समाजातील धनिकांनी श्रद्घानंद अनाथालय वसतिगृहाला आर्थिक सहाय्य करण्याचे वेळोवेळी आवाहन केले व सक्रीय मदत केली. एका शेतकर्‍यांच्या मुलगा सर्व समाजातील शेतकर्‍यांच्या कष्टकर्‍यांच्या हिताकरीता शिक्षणाच्या माध्यामातून अहोरात्र झटतो आहे. याचा सार्थ अभिमान कर्मयोगी गाडगेबाबांना होता. जेव्हा भाऊसाहेबांचा समावेश कृषिमंत्री म्हणून पहिल्या मंत्रीमंडळात झाला ती भारतातील शेतकर्‍यांसाठी अभिमानाची व भाग्याची बाब होती. म्हणूनच वैराग्यमूर्ती गाडगेबाबांनी भाऊसाहेबांच्या अमरावतीच्या प्रथम आगमनाप्रसंगी गाडगेनगर चौकातील सर्व तरोटा स्वत: उपडून झाडूने मैदान स्वच्छ केले व भाऊसाहेबांची भेट येऊन त्यांना आशीर्वाद दिलेत. 

समाज परिवर्तनाची तळमळ:

अस्पृश्यांसाठी बंद असलेले अमरावतीचे अंबादेवीचे मंदिर सर्वासांठी खुले करण्यासाठी 1927 ला सत्याग्रह केला. मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करताना भाऊसाहेबांना मंदिरातील प्रतिमा, पूजा महत्त्वाची नव्हती तर माणसातील ईश्वर महत्त्वाचा वाटत होता. ईश्वराचे स्मरण करण्याचा अधिकार सर्वच प्राणिमात्रांना असताना काही ठराविक लोकांनाच मंदिरात प्रवेश का?हा प्रश्न त्यांना सतत भेडसावित होता. नेमक्या ह्याच मनोवृत्तीतून अस्पृश्यांसाठी बंद असलेले अमरावतीचे अंबादेवी मंदिर खुले करावे यासाठी सत्याग्रह केला. यातूनच त्यांची समाजपरिवर्तनाची तळमळ दिसून येते. 
1947 ला त्यांची भारताच्या घटनासमितीवर निवड झाली. त्यांनी 1949ला घटना समिती समोर शेतकर्‍यांची कैफियत मांडली.
शेतकर्‍यांची सेवा करणे सोपे आहे. पण त्यासाठी, सोपे कायदे, साधे शिष्टाचार व सरळ माणसे हवीत. ते तीनही गुण अंगिकारलेला डॉ. पंजाबराव देशमुख हा कदाचित भारतात या युगातील एकमेव माणूस असावा ज्याने पद, प्रतिष्ठा व पैसा यांना तुच्छ लेखून आपला जीवन यज्ञ चेतविला. असे गौरवद्गार राष्ट्रपिता महात्मा गांधीनी भाऊसाहेबाबद्दल काढले होते. 
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे भाऊसाहेबांचे आदर्श होते, भाऊसाहेबांनी 1954 साली अमरावती येथे तुकाराम महाराजांवर अभंगवृत्तातच लिहिलेल्या कवितेतून त्यांच्यातील साधर्म्याची कल्पना येते. (तुकाराम महाराजांनी अभंगवाणीतून समाजाचे प्रबोधन करुन प्रपंचासोबतच परमार्थ साधला, तर भाऊसाहेबांनी आपले संपूर्ण जीवन अहोरात्र समाजाच्या उत्थानाकरिता खर्ची घालून प्रत्यक्ष कृतितून परमार्थ साधला.)

रोजनिशी लेख:

या महामानवाच्या व्यक्तिमत्वात सामावलेला आणखी एक गुण म्हणजे एक प्रकारे स्वत:चे आत्मनिरीक्षण व आत्मपरिक्षण करणे होय. त्यात सातत्यता व प्रामाणिकणा हवा हे दोन्ही गुण भाऊसाहेबांमध्ये होते. रोजनिशी लिहिण्याची सवय त्यांना बालपणापासून होती. आपले हस्ताक्षर अधिक चांगले व्हावे असे त्यांना वाटे त्यासाठी पेनची नीब बदलण्याची सूचना स्वत:लाच करुन त्याची अमलबजावणी केली. दि.21.1.1918 ला रोजनिशीत त्यांनी लिहिले आहे. 'अक्षर सुंदर होऊ शकेल, पण लिहिलेला शब्द खोडण्यांचा दोष नव्यानेच उत्पन्न झाला आहे. हे बरे नव्हे' त्यांच्या रोजनिशी लेखनातून त्यांची साहित्याची आवड डोकावते, राजकारण, समाजकारणातून जर त्यांना वेळ मिळाला असता तर ते निश्चितच एक थोर साहित्यिक झाले असते. याची साक्ष अतिशय आनंदाच्या क्षणी लिहिलेल्या त्यांच्या रोजनिशीतील खालील वाक्यावरुन वाटते. 
ते लिहितात, बा दु:खा! कधी कधी तू मला अगदी ग्रासून टाकतोस हे मला कबूल करणे भाग आहे. पण आज मात्र तुझी स्थिती अत्यंत करुणास्पद झाली आहे. हे पहा! तुझ काळठिक्कर केविलवाण तोंड ! आज तुझ्या सर्वच भांडवलाला आग लागलेली दिसते. 
भाऊसाहेबांचे आयुष्य अनेकांच्या कल्याणसाठीच होते. म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश व सुगंध सर्वत्र पसरला होता. सार्‍या देशाची फिकीर भाऊसाहेबांनाच का ? असा प्रश्न अनेकांच्या मनात येई. पण ह्या प्रश्नाचे उत्तर आपणाला सहज काढता येईल. सूर्याला विचारवे, तू कोणासाठी वाहतेस ? तहानलेल्यांना जलतृप्ती दिल्याने तुला काय मोबदला मिळतो? वरुणराजाला तोच प्रश्न विचारावा. हिरवीगार सृष्टी फुलवून तुझ्यापदरी काय पडते? निकालाकाशात उगवणार्‍या शशीला हाच प्रश्न विचारुन पहा, देतो तुला हा स्वार्थी मानव?या सार्‍यांचे उत्तर एकच ! फुलांचा सुगंध कुणी घेवो अथवा न घेवो, तो मंदगतीने वाहणार्‍या वायुबरोबर आसमंतात दरवळत असतो. तद्बतच थोरांचे जीवन असते. थोरपुरुष समाजाचे दीपस्तंभ असतात. भाऊसाहेबांचा कीर्तीरुपी सुगंध सार्‍या भारतात सर्वत्र पसरला आहे. 
10 एप्रिल 1965 ला रामनवमीच्या दिवशी रामाचे स्मरण करुन रामस्वरुपी विलीन झालेल्या मृत्युंजय भाऊसाहेबांच्या जीवनाची सांगता झाली, ती प्रेरणादायी ज्योत चेतवूनच. एक ज्योत विझली ती जणू अनेक ज्योतींना प्रकाशमय करुनच. 
एका मध्यम उंचीच्या व्यक्तिने आपल्या कर्तृत्वाने जीवनातील श्रेष्ठतम उंची गाठली होती.
भाऊसाहेबांनी जे बहुमोल विचार आणि कृतिशील आचार दिलेत त्याचे विस्तृतपणे संगोपन करणे, आचरणात आणणे हीच भाऊसाहेबांना खरी श्रद्घांजली ठरेल. 
डॉ.पंजाबराव देशमुख भारतीय शेतकर्‍यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे समर्थक होते. शेती व शेतकरी क्षेत्रात त्यांनी अथक कार्य केले. सार्वजनिक जीवनातील ते एक प्रभावशाली नेते होते. अशी आदरांजली भारताचे द्बितीय पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी वाहिली.
ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विदर्भाच्या हृदय सम्राटाला वाहिलेल्या गीतांजलीतील काही पंक्ती. 

ज्ञानदीप हा विद्यार्थ्यांचा, वर्‍हाडचा हरपला |
अरे हा थोर पुरुष लोपला || धृ ||
अखिल विश्व कृषकांचा योजक, आम्हास का विसरला ?
समाजातूनी ध्वनी गर्जला|
________________________________________________
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा