शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

भाऊसाहेबांचे शेतीविषयक विचार ___प्रा. अशोक रा. इंगळे

जागतिकीकरणाच्या या पार्श्र्वभूमीवर विदर्भ आणि महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अशावेळी कृषीक्रांतीचे जनक भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांची आठवण होणे अपरिहार्य आहे. कारण शेतक-यांच्या समग्र उत्थानासाठी हिरीरिने किंवा तळमळीने विचार करणा-या समाजक्रांतिकारकांमध्ये म. ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडक र, कर्मवीर भाऊराव पाटील आणि विदर्भरत्न भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमु, यांनी वेळोवेळी शेतकरी आणि शेती व्यवसायाच्या संदर्भत विचार व्यक्त केले आहेत. 

शेती राष्ट्राच्या विकासाचा आधार :

माणसाप्रमाणेच समाजाच्या आणि राष्ट्राच्याही जीवनात शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यातही भारतासारख्या शेती प्रधान देशात तर अधिकच आहे, असे असून देखील शेती विकासाकडे स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतरही शासन गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. सध्या विदर्भ आणि महाराष्ट्रात घडून येणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आकडा जरी पहिला तरी ते आपल्या सहज लक्षात येते. शेती आणि शेतकर्‍यांची दूरावस्था ही बाब भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुखांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी शेतकरी संघटित करण्याकडे जास्त भर दिला. त्यातूनच 1927 साली भाऊसाहेबांनी शेतकरी संघ स्थापन केला व सर्व प्रथम शेतकर्‍यांना संघटित करण्याचे मौलिक कार्य केले. शेतकर्‍यांना संघटित करुन भाऊसाहेबांनी शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून तो एक व्यवसाय आहे. राष्ट्राच्या विकासासाठी शेतकर्‍यांनी शेतीला व्यवसाय समजून कष्ट केले पाहिजेत. कारण राष्ट्राच्या एकूण उत्पन्नात 50%टक्के उत्पन्न हे शेती व शेतीसंबधीत व्यवसायातून निर्माण होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मुलांनी शेती राष्ट्राच्या विकासाचा मुख्य आधार आहे असे समजून शेती करावी. कारण शेतकरी सुखी तर देश सुखी असा साधा सरळ विचार भाऊसाहेबांचा होता ते म्हणत Our culture is Agriculture कारण भारत हा कृषकांचा देश आहे. त्यांच्या घामावर शहरी माणसाचे जिणे आणि वैभव, परंतु त्या शेतकर्‍यांच्या घामाचं मोल भाऊसाहेबांशिवाय कुणी केले नाही. परंतु जागतिकीकरणामध्ये शेतकर्‍यांचे प्रश्न निष्ठेने समजून घेणारा नेता आज एकही नाही, असे खेदाने म्हणावे लागते. 

आधुनिक आणि तांत्रिक शेती: 

भारतीय शेतकर्‍यांची दैववादी, निराशवादी मानसिकता बदलून त्यांना जागतिकीकरणातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांची जाण करुन देणे काळाची गरज झाली आहे. कारण जोपर्यंत शेतीकडे पाहण्याचा सामान्य शेतकर्‍यांचा दृष्टिकोन बदलत नाही तो पर्यंत शेतकर्‍यांचा आर्थिक विकास घडून येणे शक्य नाही. त्यासाठी भाऊसाहेबा डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेती करताना आधुनिक आणि तांत्रिक शेतीचा वापर करावा असे म्हटले आहे. त्यासाठी भाऊसाहेबांनी कोलंबो प्लॅन प्रमाणे निरनिराळ्या देशात शेतकरी पाठविण्याची योजना आखली, तसे इंटर नॅशनल फार्म यूथ एक्सचेंज कार्यक्रम भरतात सुरु करुन बर्‍याच शेतकर्‍यांना दुसर्‍या देशातील शेतीची लागवड पद्घती पाहण्याची व प्रात्याक्षिक करण्याची संधी मिळवून दिली. (उदा. जपानी भात शेतीचा प्रयोग)आधुनिक आणि तांत्रिक शेती करताना अशा प्रकारच्या योजनांची आज अमंलबजावणी करण्याची नितांत गरज आहे. परिणामत: अशा प्रात्याक्षिकांमधून शेतकरी आधुनिक यंत्रे, उपकरणे यांचा कसा वापर करावा हे शिकतील, व त्यातून शेतीसाठी लागणारे पुढचे नियोजन ते करतील आणि त्यामाध्यामातून त्यांच्या वेळेची व श्रमाची बचत होईल. हा दृष्टिकोन भाऊसाहेबांचा आधुनिक शेतीसंबंधी होता.

सहकारी शेती:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे डॉ.पंजाबराव देशमुख यांनी सुद्घा सहकारी शेतीवर भर दिला. शेतकर्‍यांनी शेतीशी भावनिक नाते न ठेवता शेतीकडे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे त्यासाठी त्यांनी शेतीचे लहान लहान तुकड्यात होणारे विभाजन टाळून ती एकत्रित कशी करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यासाठी त्यांनी सहकारी शेती हाच त्यावर योग्य मार्ग आहे असे सांगितले. त्यामुळे शेतकर्‍यांचे दर एकरी उत्त्पन्न वाढेल तसेच उत्पादन मूल्य कमी होऊन राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. आज सहकारी शेती करण्याची नितांत गरज आहे. त्यादृष्टिने आपण प्रयत्न करुया म्हणजे भाऊसाहेबांचे स्वप्न साकार होईल. 

शेती व्यवसायाला प्रशिक्षणाची गरज :

भाऊसाहेब नेहमी म्हणत तुम्हला शेती जरी करावयाची असली तरी तुम्ही एम.ए. होऊन करा किंवा ऍग्रीकल्चर होऊन करा जेणे करुन तुम्हाला कुणी फसवणार नाही आणि तुम्ही उत्तम शेती करु शकाल, मला असे वाटते. भाऊसाहेबांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. कारण आज शेतकर्‍याला शिक्षणाची गरज नाही आणि कोणीही ऐरागैरा योग्य रितीने शेती करु शकतो हा सर्वदूर पसरलेला चुकीचा समज आहे. हा दृष्टिकोन बदलवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. कारण या चुकीच्या समजुतीमधूनच समाजात नैराश्य आणि वैफल्य पसरते आणि त्यातूनच मग सगळीकडे असफल झालेले लोक निराशेने, उदासिनतेकडे वळताना दिसतात किंवा आजच्या घडीला ते आत्महत्या करताना दिसतात. त्याचे कारण त्यांच्याजवळ ना शारीरिक क्षमता असते ना बौद्घीक कुवत, त्यामुळे इतर व्यावसायिक शिक्षाप्रमाणेच शेती व्यवसायाशी संबधित असणार्‍या सर्व सोयी, सुविधा नवनवीन पद्घती आणि अवजाराची माहिती असणे आवश्यक आहे. शेती व्यवसाय हा स्थितीशील व्यवसाय आहे. याची जाणीव करुन देण्याची गरज आज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. तसेच आजच्या शिक्षणाची गंगा संशोधकाच्या प्रयोगशाळेतून थेट शेतात राबणार्‍या शेतकर्‍यांच्या पर्यंत पोहचली पाहिजे. तरच तो शेतकरी उत्तम व आधुनिक शेती चांगल्याप्रकारे करु शकतो. 

शेतकर्‍यांच्या हितासंबंधी विचार :

म. ज्योतीराव फुले यांच्या प्रमाणे शेतकर्‍यांच्या हितासंबंधी अतिशय पोटतिडकीने भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांनी विचार मांडले आहेत. दि.3 सप्टेंबर 1994 रोजी शासनाने शेतकर्‍यांकडे केलेल्या दुर्लक्षासंबधी खेद व्यक्त करताना ते म्हणतात, सरकारच शेतकर्‍यांची अक्षम्य उपेक्षा करीत आहे. केवळ संख्या बळामुळे नव्हे तर श्रेष्ठतम कार्यामुळे या भारतभूमीवर शेतकर्‍यांना पूर्वापार प्राधान्य मिळत आले आहे. त्यामुळेच भारत शेतकर्‍यांचा देश म्हणून सर्वत्र प्रसिद्घ आहे व असा नित्य उद्‍घोषही केला जातो. हे शेतकरीच खर्‍या अर्थाने भारताचे स्वामी आहेत. पण तरी सुद्घा त्यांच्या कल्याणाची कुणालाच आस्था नाही. कामगार वर्ग व शेतकरी वर्ग यांच्या परिस्थितीचे तुलनात्मक दर्शन घडवून डॉ. पंजाबराव देशमुख म्हणतात, ज्या प्रचंड मानव समुहाच्या, कृषकांच्या घामावर आपण जगतो, विकास साधतो त्यांच्याकरिता अजून एकही कल्याणकारी अधिकारी नाही हे आश्चर्याने म्हणावे लागते. व आजची परिस्थिती सुद्घा यापेक्षा वेगळी नाही. आज ज्या शासकीय योजना आहेत. त्या सर्वसामान्य शेतकरी वर्गापर्यंत इथला भ्रष्टाचारी अधिकारी वर्ग (काही सन्माननीय अपवाद वगळता)पोहचू देत नाही हे वास्तव आपण मान्य केले पाहिजे. यावरुन भाऊसाहेबांचा शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती व्यापक होता हे कळू शकते. 

संपत्ती करावरील विधेयक:

संपत्ती करावरील विधेयक डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दि.6एप्रिल 1949 रोजी केलेल्या भाषणात शेतकर्‍यांच्या मालाला कमी भाव देण्याचे समर्थन करणार्‍यांवर सडकून टीका केली ते आपल्या भाषणात म्हणाले, शेतकर्‍यांनी उत्पन्न केलेल्या वस्तूंचे जास्त भाव दिले तर त्यामुळे पैशाची किंमत कमी होते म्हणून शेतकर्‍यांच्या उत्पादनाच्या किंमती कमी होते म्हणून शेतकर्‍यांच्या उत्पादनाच्या किंमती कमी करणे हाच चलनवाढ रोखण्याचा मार्ग आहे, असे बेजबाबदार विधान पण ते योग्य नाही. वास्तविक भारतीय शेतकरी पूर्वी कधीही नव्हता इतका आज दरिद्री झाला आहे. त्यांच्या हाती जो काही पैसा येतो तो सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यावर खर्च होऊन जातो. पुष्कळदा तर त्याला आपल्या कुटुंबाच्या सर्व साधारण गरजादेखील भागवता येत नाहीत. उलट ज्यांची संख्या संपूर्ण देशात दोन हजारापेक्षाही कमी आहे, अशा गर्भश्रीमंत माणसाच्या हातात देशातील शेकडा 75 टक्कापेक्षा अधिक संपत्ती या मूठभर लोकांच्या हातात जनतेची अधिक पिळवणूक करण्याकरिता राहू न देता, जर देशाच्या औद्यागिक विकासार्थ उपयोगात आणली तर देशाची अधिक प्रगती साधून लोक कल्याण होऊ शकेल. असे अत्यंत अभ्यासपूर्ण प्रतिपादन भाऊसाहेबांनी या विधेयकाबाबत मांडले, त्यातून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर व त्यांच्यावर झालेल्या अन्यायावर डॉ.पंजाबराव देशमुख किती जागरुक असत व शेतकर्‍यांच्या समग्र विकासाचा त्यांनी कसा ध्यास घेतला होता याची साक्ष पटते. 

शेतकरी संघटित होण्याची गजर :

शेतकर्‍यांनी स्वत:च्या हितासाठी व राष्ट्रीय विकास घडवून आणण्यासाठी संघटित झाले पाहिजे असे भाऊसाहेबांना नेहमी वाटत असे. शेतकर्‍यांच्या उद्घारासाठी व शेतकरी संघटित होण्यासाठी भाऊसाहेबांनी अनेक योजना राबविल्या. 1955 साली त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली आणि त्यातून अनेक उपसंघटना स्थापन केल्या अ)राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ. ब) कृषक सहकारी भारतीय अधिकोष. क)आफ्रो-आशिया ग्रामीण पुर्नरचना संघटना. इ)अखिल भारतीय ताडगूळ महासंघ. ई)कृषी उत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा महासंघ इत्यादी संघटना करण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब म्हणत इंग्लडमध्ये National Farmers Union आणि National Farmers Union of scotland ह्या संघटना शेतकर्‍यांनी मिळनूच बनविल्या आणि त्या शेतकर्‍यांच्या हितासाठीच राबतात. त्याचप्रमाणे अमेरिका व कॅनडातही अशा संघटना आहेत. त्या संस्था केवळ तेथील शेतकर्‍यांच शेतीहीतच न पाहता आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीची काळजी घेतात. इंग्लड,अमेरिका व कॅनडाचा आदर्श घेऊन त्यांनी इथल्या शेतकर्‍यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतही शेतकर्‍यांचे हीत जोपासणारी देशव्यापी संघटना असावी असे प्रतिपादन त्यांनी केले होते. पण दुर्दैवाने शेतकरी संघटित करण्याचे प्रयत्न त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आजही शेतकरी आणि कृषी व्यवसाय असंघटित आहे, त्याला संघटित करण्याची गरज जागतिकीकरणात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. शेतकरी आणि शेती व्यवसाय सुदृढ होईल. त्यादृष्टीने समाजातील शेतकरी नेत्यांनी व विचारवंतानी पुढे येणे काळाची गरज आहे, तरच भाऊसाहेबांचे स्वप्न साकार होईल व शेती व्यवसायाला चांगले दिवस येतील. 
एकंदरीत भाऊसाहेबांनी शेतकरी आणि शेतीविकासाचा जणू ध्यासच घेतलेला होता असे त्यांचे शेतीविषयक विचार समजून घेतल्यानंतर लक्षात येते. कार्ल मार्क्सने जगातील कामगारांनो एक व्हा हा संदेश दिला आणि जगातील कामगार संघटित झाले त्याप्रमाणे शेतकर्‍यांना संघटित करणारा एकमेव नेता म्हणजे भाऊसाहेब. अशा या महान शेतकरी पुत्राला त्यांच्या जयंतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रमाण. 


संदर्भ ग्रंथ-
1)लोकमहर्षी भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख गौरव ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती. मंडळ मुंबई
2)स्मरणिका- शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख जन्मशताब्दी महोत्सव 1997-98.
__________________________________________________
- प्रा. अशोक रा. इंगळे, डॉ. एच.एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर मो. 9421747417

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा