शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

मी पाहिलेले भाऊसाहेब!___श्री अशोकराव कोंडे

माझा 70 प्रतिशत समाज ग्रामीण भागात राहतो. माझा भारत कृषिप्रधान आहे. माझा समाज कृषक असून तो कुणबी आहे व ह्या स्वतंत्र भारतात त्याची स्थिती अत्यंत शोषणीय आहे. मी कृषीमंत्री म्हणून ह्या 70 प्रतिशत भारतीयांचे नेतृत्व माझेकडे आहे. ह्या माझ्या ग्रामीण जनतेचे अज्ञान दूर झाल्याशिवाय त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे शक्य नाही. जोपर्यंत ह्या समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्याचे भगिरथ प्रयत्न होणार नाहीत. तो पर्यंत खर्‍या अर्थाने आम्ही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारल्याचा यज्ञ पूर्ण होणार नाही, असे वक्तव्य करणारे भाऊसाहेब शेतकरी शिक्षित झाला पाहिजे. त्यांची मुलं डॉक्टर, इंजीनियर झाली पाहिजेत. हे स्वप्न उराशी बाळगून बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात हात घालून भाऊसाहेब पुढे सरसावले व या भारताच्या मातीत स्वत:ला झोकून दिले.
समाजबांधवांनी किती तळमळ, त्यांच्याबद्दल असलेली कळकळ त्यांच्या प्रत्येक कृतीमधून दिसत होती. मी एका केवळ 500 ते 600 लोकसंख्या असलेल्या लहानशा खेड्यात एका सर्वसाधारण शेतकर्‍याच्या घरात जन्माला आलो. दुर्दैवाने वयाच्या 6-7 व्या वर्षीच आई व वडिलांपासून पोरका झालो. अत्यंत दरिद्री अवस्थेत वाढलो. इलीचपूर सारख्या गावांपासून 5 किलोमीटरव असलेल्या शहरात सिटी हायस्कूलमध्ये कसाबसा 1957 साली मॅट्रीक पास झालो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचे कीर्तन ऐकणे हा त्यावेळेचा मनोरंजनाचा भाग होता. विजेचे दिवे, आकाशवाणी, बस वा रेल्वे प्रवास ह्या बाबी जादूटोणा वा चमत्कार वाटत होत्या. ह्या थोरामोठ्यांची कीर्तने ऐकून आपण शिकलो पाहिजे. हा ध्यास मनात भरला गेला होता. मॅट्रीक पास झालो परंतु आणखी पुढे शिकलो पाहिजे. भाऊसाहेब देशमुख नावाच्या एका महात्म्याने अमरावती शहरात ज्ञानपीठ उघडले आहे. ज्याला शिकायचे आहे त्याने खुशाल अमरावतीला जावे व पुढील शिक्षण घ्यावे असे सर्वत्र सांगितले जात होते नव्हे तशी दवंडीच पिटली जात होती.
इलीचपूर ते अमरावती बसने जायला पाच आणे तिकीट होती. गेल्या वर्षभरात (खाऊचे व जत्रेत खर्च करायला मिळालेले) जतन केलेले चार रुपये खिशात खुळखुळत होते. आपले पुढील शिक्षण होण्यास ते पुरेसे वाटले व मी उमरावतीची तिकीट काढली. मळलेला पांढरा सदरा व फाटलेली खाकी रंगाची हाफ पँट व त्यावर चढवलेला करदोडा, पायात चप्पल नाही, अशा अवस्थेत खिशात चार रुपयांची भक्कम पुंजी टाकून सरळ उमरावती गाठली. मोटार स्टँड वरून विचारत विचारत मला सायन्समध्ये अ‍ॅडमिशन घ्यायची आहे म्हणून किंग एडवर्ड कॉलेज, आताचे विदर्भ महाविद्यालय गाठले. चार आण्याचा फॉर्म घेतला व काऊंटरवर अ‍ॅडमिशन हवी म्हणून देशपांडे नावाच्या बाबु पुढे धरला. मॅट्रीकमध्ये हायर सेकंडक्लासमध्ये पास असून फिजिक्स व केमेस्ट्री ह्या दोन विषयांत प्राविण्य मिळविले आहे तेव्हा मला सायन्स फॅकल्टीला प्रवेश द्या असे ठणकावून सांगितले, परंतु देशपांडे बाबूने तिरस्काराच्या रुपात तितक्याच वेगाने झिडकारले. ‘काहून तिकडे तुमच्या त्या भाऊसाहेबांच्या कॉलेजात जावून का नाही तडफडला?’ अहो पण सर, शिवाजीमध्ये सायन्स नाही ना... तेव्हा, मग सांगाना तुमच्या भाऊसाहेबांना सायन्स उघडा म्हणून, आणि मी तर ऐकलं, त्या देशमुखांनी तुम्हा दळभद्रींसाठी यंदा सायन्स सुरू केला ! असे म्हणून फॉर्म माझे अंगावर भिरकावला मला वाटले देशपांडे बाबू खरं बोलत असावा. तो खोटं कशाला सांगेल? मी निमुटपणे शिवाजी कॉलेजकडे चालू लागलो. रस्त्यात एक सद्गृहस्थ भेटलेत. ते तेथे जवळच राहत असावेत. त्यांना शिवाजी कॉलेजचा पत्ता विचारला. त्यांनी माझा खेडूत अवतार बघून प्रेमळपणे वाट दाखविली, परिचय दिला, म्हणाले माझ नाव ढोरे गुरुजी. मी इथे समोरच राहतो. तुला गरज वाटली तर माझेकडे जरूर ये. कॉलेजला दौलतराव गोळे भेटतील त्यांना जाऊन भेट, ते तुला मदत करतील. मला खूप बरे वाटले. हुरूप आला. मी शिवाजी सायन्स कॉलेजच्या आवारात शिरताच थेट गोळे काकांकडे गेलो, मला सायन्य कॉलेजला अ‍ॅडमिशन हवी. मी गावाकडून आलो आहे. अरे पण आपल्याकडे केवळ आर्ट व कॉमर्स कॉलेज आहे. सायन्स नाही. मी ऐकायच्या तयारीत नव्हतो. नाही तुम्ही खोटं बोलत आहात मला देशपांडे बाबूंनी सांगितले आहे. मी त्यांना हकीकत विशद केली. गोळे काका बुचकळ्यात पडले. इतक्यात बाजुच्या प्राचार्य एन. सी. देशमुख ह्यांच्या दालनातून भाऊसाहेब व प्राचार्य बाहेर आले. त्यांना सामोरे जावू म्हणून रजिस्टार गोळे सुद्घा चटकन पुढे झाले. त्यांचे मागे मी उभाच होतो.
कोण हा पोरगा ? अ‍ॅडमिशन साठी आला असावा म्हणून भाऊसाहेबांनी विचारपुस केली. काय नाव तुझं? घेतली का अ‍ॅडमिशन? माझं नाव कोंडे, मला सायन्सला ऍडमिशन हवी; परंतु हे सर मला नाही म्हणतात. मी तक्रार केली, गोळे काकांनी माझी हकीकत भाऊसाहेबांना सांगितली. भाऊसाहेबांनी डोळ्यांच्या भुवया उंचावल्या. बाबू, खरंच आपल्याकडे सायन्स कक्ष नाही. पण आता यंदा मात्र तुला आर्ट किंवा कॉमर्सला प्री. युनी मध्ये ऍडमिशन घ्यावी लागेल. पुढील वर्षी तुला सायन्सला ऍडमिशन देऊ. जमेल ना? मी थोडा विचार करून ठीक आहे म्हणालो कारण माझेकडे दुसरा पर्यायच नव्हता व कॉमर्सला अ‍ॅडमिशन द्या म्हणालो. 10 रू भरून अ‍ॅडमिशन घेण्यास भाऊसाहेबांनी फर्माविले, परंतु भाऊसाहेब, माझे जवळ फक्त 3 रू. आहेत बाकीचे नंतर देईन म्हणालो. भाऊसाहेब थांबले, म्हणाले, शहाणा आहेस राहू दे तुझे 3 रु. तुझ्याजवळ भाऊसाहेबांनी खिशातून 10 रु. ची नोट काढली. गोळे काकांच्या हातात 10 रु. देत म्हणाले, याला अ‍ॅडमिशन द्या व फ्री शिपचा फॉर्म भरून घ्या आणि त्याची श्रद्घानंद होस्टेलवर निवासाची व्यवस्था करून द्या. असे बोलून भाऊसाहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला व पुढे निघून गेले.
10 रु. मध्ये माझी अ‍ॅडमिशन झाली व श्रद्घानंद होस्टेल वर 15 रु. महिन्याला देऊन निवास व बोर्डींगची सोय होती. परंतु मला तेथेही पूर्ण सवलत देऊन व्यवस्था करण्यात आली. ह्या 10 रु. मध्ये शिवाजी कॉलेजमधून मी बी. कॉम. झालो 1959-60 मध्ये भाऊसाहेबांचा हीरक महोत्सव झाला. मी प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत होतो. रुरल इंस्टिट्युटच्या प्रत्येक कार्यक्रमास हटकून भाऊसाहेब हजर राहत. आम्हा मुलांच्या पाठीवर थाप मारत. कुणाच्या डोक्याला तर कुणाच्या खांद्याला स्पर्श करीत. त्यांचा प्रेमळ स्पर्श अजूनही अंगावर शहारे आणतो. भाऊसाहेबांचे स्विय सहायक कोंडे होते. त्यांना मी त्यांचाच कुणीतरी नातलग असावा म्हणून म्हणाले, काय रे कोंडे, अभ्यास वगैरे करतो ना? नाहीतर आमच्या कोंडेच नाव घालवशील? आणि हसुन पुढे निघून गेले. भाऊसाहेब मला ओळखतात म्हणून माझी नेहमी कॉलर ताठ असायची.
एकदा दिवाळीला सर्व विद्यार्थी आपआपल्या गावी निघून गेले होते. होस्टेलवर आम्ही केवळ 7-8 मुलं होतो. घरी कोण नव्हते. गावी जाण्याची ओढ नव्हती. आई बाप नसलेली अनाथ बालके आम्ही. होस्टेलवरच राहणं पसंत केले. परंतु अचानक निरोप आला, भाऊसाहेब होस्टेलकडे यायला निघाले. आम्ही 7-8 मुलं बाहेर आलो. आम्हाला दिवाळी असून भाऊसाहेब आल्याचे आश्चर्य वाटले. आम्हाला वडील भेटायला आल्याचा आनंद झाला. भाऊसाहेब आलेत भाऊसाहेबांच्या सोबत आणखी एक फेटा बांधलेले गोरेपान राजसिंह असे मित्र होते. त्यांचे नाव दाजीसाहेब पटवर्धन होते. दिवाळीसारख्या सणाला तुम्ही होस्टेलवर आहात म्हणून तुम्हाला भेटायला आम्ही आलो. तुमच्यासारखेच, आमच्या तपोवनला मुले, मुली आहेत. तुम्हाला कुणी नाही, परंतु त्यांना सर्व नातेवाईक आहेत, तरीही ते घरी जाऊ शकत नाहीत. कारण ते कुष्ठरोगी आहेत. ते बरे झाले आहेत तरीही अनाथ आहेत. त्यांना तुमची गरज आहे. त्या मुली तुम्हाला भाऊ म्हणून तुमची वाट बघत आहेत. तुम्ही तपोवनला या. शिवाजीराव पटवर्धन ऊर्फ दाजी साहेबांनी आमच्या पेक्षा दु:खी असलेल्या तपोवनातील मंडळीची व्यथा आम्हाला सांगितली. भाऊसाहेबांनी सुद्घा दुजोरा दिला. तेव्हा आम्हाला फारसं कळलं नाही. भावना समजल्या नाहीत. परंतु आज उलगडा होता आहे. कीती खोलवर विचार करीत होते हे महान महात्मे!
भाऊसाहेबांना जबरदस्त दुरदृष्टी होती. त्यांना सतत ग्रामीण शेतकरी व शेतमजुरांची काळजी सलत असावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहरात असणार्‍या शोषित कामगारांची नेहमी बाजू मांडत परंतु तितक्याच हिरीरीने शेतमजुरांचा प्रश्न भाऊसाहेब पुढे करीत (अर्न अँड लर्न) कमवा व शिका हे भाऊसाहेबांचे त्यवेळेच ब्रीद वाक्य. दिवसभर काम करणार्‍या गरीब मजुरांना शिकता आले पाहिजे. त्यांना रात्रीच्या शाळेत शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून जवाहर एज्युकेशन सोसायटी नागपूर ही त्यांचीच संकल्पना होती. जवाहर सोसायटीचे रात्र शाळा जन्माला आल्या. श्रीमंत्र घनवटे हे भाऊसाहेबांच्या प्रभावात होते. बाल मुकुंद अग्रवाल सारखे कार्यकर्ते भाऊसाहेबांच्या आदेशाची वाटच पाहत होते. मी त्यावेळी भाऊसाहेबांच्या कार्यास एक झपाटलेला तरूण होतो व त्यांच्याच मेहरबानीने एम. कॉम. शिकण्याकरिता नागपुरला गेलो असता ह्याच जवाहर नाईट हायस्कूलचा शिक्षक म्हणून लागलो होतो. मला आठवते, 1963-64 साल असावे. जवाहर एज्युकेशन सोसायटी धंतोली ह्या संस्थेच्या जवाहर नाईट स्कूल, सरस्वती नाईट हायस्कूल ह्या शाळांचे संयुक्त स्नेहसंमेलन होते. भाऊसाहेब कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. मंचावर त्यावेळचे तरुण शिक्षणमंत्री श्री मधुकरराव चौधरी, आमदार आचार्य अत्रे, सौ. सुमतीदेवी घनवटे ही मंडळी उपस्थित होती. सोसायटीचे सचिव मोतीराम पावडे हे भाऊसाहेबांचे आवडते कार्यकर्ते होते. भाऊसाहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ह्या ग्रामीण भागातून पोटाची खळगी भरायला आलेल्या बाल मजुरांना, घरात काम करणार्‍या, मोलमजुरी करणार्‍या बायांना, मुलींना रात्रीच्या शाळा. ज्ञानदान करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करीत आहेत. त्या दारिद्र्य रेषेखालील, मजूर, कामगार ह्यांना ज्ञानगंगा खुली असली पाहिजे. शासनाने ह्या शाळांना मान्यता देणे अत्यंत जरूरीचे आहे. ह्या भारत देशात आज मोतीराम पावडे सारखे तरुण नि:स्वार्थी कार्यकर्ते हवे आहेत. एका जमीनदाराचा शिकलेला हा तरुण मुलगा, रात्रशाळा चालवून माझेच स्वप्न पूर्ण करण्याचा आटापिटा करीत आहे. मुक्त विद्यापीठाची कल्पना त्यावेळी भाऊसाहेबांच्या मनात घोळत असावी. भारताचा शेतकरी हा अन्नदाता आहे. तो सुखी असणे, समृद्घ असणे, सुशिक्षित असणे, त्याची मुलं त्याला आधुनिक शिक्षण घेतलेली, त्याला साह्यभूत अशी तंत्रज्ञ असलेली निर्माण झाली तरच हा भारत खर्‍या अर्थाने समृद्घ असा स्वतंत्र भारत म्हणता येईल व महात्मा गांधींच्या विचारांची आम्ही स्वप्नपूर्ती केली असे म्हणता येईल.
आम्ही परमेश्वर बघितला नाही. परंतु भाऊसाहेब देशमुख ह्यांना बघितले आहे. त्यांचे विचारधन आम्हाला जीवन जगण्याची कला शिकवित आहे. जीवन समृद्घ व आनंदमय करीत आहे. आमच्यातला माणूस जागा करीत आहे. गाडगेबाबा व तुकडोजी महाराज म्हणतात त्या प्रमाणे, भाऊसाहेबांच्या प्रेरणेतून आम्ही आमच्यातला माणूस दाखविण्यास समर्थ ठरतो आहोत व परमेश्वर रुपाने भाऊसाहेब अनुभवतो आहोत व म्हणुनच त्यांच्याविषयी – 

दिव्यत्वाची जेथे प्रचिती 
तेथे कर माझे जुळती!
_________________________________________________

श्री शिवाजी, शिक्षण महाविद्यालय, अमरावती - श्री अशोकराव कोंडे, जनसंपर्क अधिकारी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती.

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) 

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा