शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

सर्वंकष कर्तृत्वाचा महामेरू___डॉ. रवींद्र शोभणे

काही माणसं एकट्यानं मोठी होतात, काही माणसांना समाज मोठं करतो, तर काही माणसांमुळं समाज मोठा होतो. ज्या माणसांमुळे समाज मोठा झाला अशी माणसं म्हणजे महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या परंपरेत अभिमानानं ज्या नावाचा उल्लेख करावा लागतो ते नाव म्हणजे शिक्षणमहर्षी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे होय. आपल्या कर्तृत्वाने हे नाव दिवसेंदिवस वाढत आहे. या नावाच्या प्रभेमुळे आणि कृपाप्रसादामुळे अनेकांच्या आयुष्याचं सोनं झालं. परंपरेनं आणि समाज चौकटीनं ज्या वर्गाला या व्यवस्थेत शिक्षणापासून वंचित राहावं लागलं, अशा बहुजनसमाजाच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा आणण्याचे भगिरथ प्रयत्न करणारे म्हणून, इथल्या शेतकर्‍यांच्या दैन्यावस्थेला नेमकेपणाने ओळखून त्यांचा स्तर सर्वार्थाने उंचावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आणि विवेकवादी दृष्टिकोनातून विचार करणारे समाजसुधारक म्हणून आजची पिढी भाऊसाहेबांकडे अतीव श्रद्घेनं आणि आदराने पाहते, हे घटित सामाजिक स्थित्यंतराच्या या प्रवासात अधिक मोलाचं आहे.
अमरावती जिल्ह्यातील पापळसारख्या एका खेडेगावात जन्मलेल्या भाऊसाहेबांनी स्थळाच्या आणि काळाच्या सीमा उल्लंघून शिक्षणासाठी जो संघर्ष केला, त्यातुनच त्यांच्या संघर्षशील व्यक्तिमत्वाला आकार प्राप्त झाला. त्या काळात खेड्यापाड्यातल्या मुलांना शिक्षणासाठी जे अथक परिश्रम करावे लागायचे, त्याचा अनुभव बालपणीच त्यांना आला होता. महात्मा जोतीराव फुल्यांनी शिक्षण ाचं महत्त्व - विद्येविना मती गेली. या वचनातून विषद केलं होतं, तोच वसा भाऊसाहेबांनी स्वीकारला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातला हा काळ खर्‍या अर्थाने प्रबोधनाचा आणि सामाजिक पुनर्रचनेचा काळ होता. एकीकडे ब्राह्मण समाजातील अनिष्ट रूढी-प्रथा-परंपराविरुद्घ लढणारे ब्राह्मण समाज सुधारक होते, इंग्रजी सत्तेविरुद्घ पेटून उठलेले सवर्णीय क्रांतिकारक होते, त्याच काळात अंत्यजांचा, बहुजन समाजाचा सर्वार्थाने विकास करण्यासाठी आपले आयुष्य झोकून देणारे बहुजन समाजातील थोर विभूती होत्या; त्यांचे अग्रणी म्हणून आपल्याला म. फुल्यांना हा मान द्यावा लागेल. इंग्रजी सत्तेची भारतात रुजलेली मुळं उखडून फेकून तिथे पुन्हा हिंदू राष्ट्र (चातुवर्ण्याधिष्ठित समाज) निर्माण करण्याचे काही बंडखोर प्रयत्न तत्काळी झाले. (1857 चे बंड), पण ते अपयशी झाले. कारण बंडखोरीची आणि नवराष्ट्राची या क्रांतिकारकांची दृष्टी इतिहासात रमणारी होती. त्यामुळे या बंडखोरीची साद भारतातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचू शकलीच नाही. ती साद घालण्यासाठी जो मार्ग अधिक प्रभावी होता, त्या शैक्षणिक क्रांतीचा महामार्ग तत्कालीन बहुजनसमाजातील समाजसुधारकांनी अवलंबिला, अक्षर शत्रू असलेल्या या समाजाला अक्षरांची ओळख करून दिली, त्यामुळेच या समाजाच्या मनीमानसी अस्मितेची भावना जागृत झाली. हे बीज महात्मा जोतीरावांनी लावले. त्यातूनच पुढे राजर्षि शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील (रयत शिक्षण संस्था, कोल्हापूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पीपल्स एज्युकेशन सोसायटी, औरंगाबाद) आणि डॉ. पंजाबराव देशमुख (श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती) असे शिक्षण देणारे वटवृक्ष उभे राहिलेत. या तिन्ही शिक्षणमहर्षींची प्रेरणा आणि श्रद्घास्थान म. फुले होते हे यातूनच स्पष्ट होते.
योगायोग म्हणता येईल किंवा, जाणीवपूर्वकही केलेली कृती म्हणता येईल; पण भाऊसाहेबांच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या घटनांचे साम्य म. फुलेंच्या लौकिक जीवनाशी नाते सांगणारे आहेत. त्यातील एक महत्वपूर्ण घटना म्हणजे म. फुलेंच्या जन्मशताब्दी वर्षात भाऊसाहेब विमलबाईंशी विवाहबद्घ झाले ती 26 नोव्हेंबर 1927 रोजी भाऊसाहेबांचा विवाह झाला होता आणि म. जोतीराव फुलेंची जन्मशताब्दी 28 नोव्हेंबर 1928 मध्ये संपन्न झाली होती. तसाच आणखी एक योगायोग म्हणजे 1831 हे सावित्रीबाई फुलेंचं जन्मवर्ष आणि 1931-32 या वर्षात भाऊसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची अमरावतीला स्थापना केली. आणखी एक योगायोगा शोधायचा तर म. फुलेंनी शिवाजी महाराजांवर तीस पानी पोवाडा लिहिला. शिवाजी महाराज हे म. जोतीराव फुलेंचे दैवत. भाऊसाहेबांनीही शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानले आणि आपल्या शिक्षणसंस्थेला त्यांचे नाव दिले. पश्चिम महाराष्ट्रात ज्या शिवाजी महाराजांची हयात गेली, त्यांचे कार्यकर्तृत्व फुलले, त्या प्रांतात त्यांच्या नावाने एवढे मोठे प्रतिष्ठान कुठे उभे राहिल्याचे दिसत नाही. याचाच अर्थ भाऊसाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या दिशांची आखणी करताना कुठेही प्रांतभेद वा सीमाभेद ठेवला नाही. उलट त्यांनी शिवाजी महाराजांचे मोठेपण, त्यांची दुरदृष्टी ओळखूनच आपल्या शिक्षणसंस्थेला त्यांचे नाव बहाल केले, हा भाऊसाहेबांचा द्रष्टेपणा तेवढाच महत्त्वाचा वाटतो.
शिक्षण, समाजकारण, राजकारण हे मराठी समाजाला उन्नत करणारे आणि प्रगतीच्या दिशा दाखविणारे क्षेत्रे भाऊसाहेबांच्या जिव्हाळ्याची क्षेत्रे होती. समाजकारणाला आणि शिक्षणाला खर्‍या अर्थाने बळ प्राप्त व्हायचे असेल तर राजकीय सत्ता हातात असणेही तेवढेच गरजेचे आहे, हेही त्यांनी ओळखले होते. त्यामुळेच ते 1931 पासूनच भारतीय राजका रणाच्या मध्यप्रवाहात सामील झाले. 1931 साली मध्यप्रांत वर्‍हाडच्या मंत्रीमंडळात सर्वात तरुण मंत्री म्हणून (वय वर्षे 33) ते सहभागी झाले. पुढे 1952 ते 1962 ही दहा वर्षे ते स्वतंत्र भारताच्या मंत्रीमंडळात पहिले कृषिमंत्री म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना करून शेतकर्‍यांसाठी जे मोलाचे कार्य केले ते निश्चितच अपूर्व म्हणावे लागेल. विचारांची एवढी मोठी झेप आणि काळाच्या पुढे जाऊन निर्णय घेण्याची बौद्घिक कुवत असलेले भाऊसाहेब हे एकमेव कृषिमंत्री होते, असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरु नये. त्यांच्या विचारांना पुढे ठेवून नंतरच्या कृषिमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले असते, तर आज होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या निश्चितच टळल्या असत्या.
भाऊसाहेबांची बुद्घिमत्ता आणि प्रतिभा ही चतुरस्त्र होती. ते जसे कृषिपंडित होते, शिक्षणतज्ज्ञ होते, राजनीतिज्ञ होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित आणि धर्मविषयक तत्त्वज्ञानाचा वैचारिक आणि आधुनिकतेच्या अंगाने विचार करणारे धर्मज्ञही होते; The origin and Development of Religion in vedic literature (वैदिक वाङमयातील धर्माचा उदय आणि विकास) हा प्रबंध लिहून त्यांनी वैदिक वाङमयाचा आधार घेऊन धर्माची जी नव्याने मांडणी केली, ती किती महत्त्वपूर्ण आहे, ते प्रस्तुत प्रबंध वाचून जाणवते. त्यासंबंधी भाऊसाहेबांचा विचार पुढे ठेवता येईल.
A religion is a social institution, having a set of principles beliefs and practices and certain more or less imperative rules of conduct. Which are in accordance with those principles, doctrines and beliefs and with aims at furtherin human happiness. (Page No. 18 : The origion and Development of religion in Vedic literature.)
भाऊसाहेबांनी वैदिक धर्माचा विचार करताना तो बौद्घिक आणि तार्किक पातळीवर केला आहे. अंधश्रद्घेची आणि भाविकतेची पुटं बाजूला सारून धर्मासंबंधी असा विचार करणे सोपे नाही.
कायदेतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ म्हणूनही भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. भारतीय संविधानाच्या घटना समितीचे सदस्य म्हणून भाऊसाहेबांनी केलेले कार्यही अतिशय मोठे आहे. 1935 च्या कायद्याने दिलेल्या मर्यादित मताधिकारानुसार निवडण्यात आलेल्या विधानमंडळाच्या सदस्यांनी अप्रत्यक्षरित्या निवडलेल्या प्रतिनिधींना संविधानसभेचे सदस्य म्हणून संविधानाची जडणघडण करण्याची संधी मिळाली त्यानुसार डॉ. भाऊसाहेब देशमुख यांची काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रांत-वर्‍हाडातून निवड करण्यात आली. 9 डिसेंबर, 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या तीन वर्षांच्या काळात भाऊसाहेबांनी संविधानसभेच्या वादविवादात भाग घेतला. घटनेच्या प्रत्येक कलमाविषयी विचारविमर्श करताना, वादविवाद करताना भाऊसाहेबांचा दूरदर्शीपणा, व्यासंग आणि समाजाभिमुखता यांचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. म्हणूनच घ्घ्डॉ. पंजाबराव देशमुखादी टीकाकार घटना समितीत नसते तर घटना केवळ मुक्या-बहिर्‍यांचीच ठरली असती. तो केवळ एक कळसूत्री देखावा ठरला असता.’ बाबासाहेब आंबेडकरांचे हे विधान (घटना समितीतील समारोपीय भाषण) भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाची महत्ता पटवून द्यायला पुरेसे आहे.
डॉ भाऊसाहेब देशमुख हे अर्थतज्ज्ञही होते. त्यांनी भारतीय शेतकर्‍यांच्या व भारतीय शेतीच्या संदर्भात वेळोवेळी जे विचार व्यक्त केले, त्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू अधिक प्रकर्षाने समोर येतो. भारत कृषक समाजाची स्थापना (1955), गोसंवर्धनाच्या संदर्भात भाऊसाहेबांनी 3 नोव्हेंबर 1954 रोजी आकाशवाणीवरून केलेले भाषण, मालमत्ता कराचे केलेले समर्थन (6 एप्रिल, 1948), गृहउद्योगासंबंधी त्यांनी घेतलेली भूमिका किंवा 4 फेब्रुवारी 1949 रोजी लोकसभेमध्ये अधिक धान्य ि पकवा या उपक्रमाच्या संदर्भात भाऊसाहेबांनी केलेले भाषण यातून त्यांचे विचार अधिक गंभीरपणे व्यक्त होतात. आर्थिक नियोजनाच्या संदर्भात भाऊसाहेबांनी नियोजनाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.
If planning requires anything, it requires the greatest amount of thinking, deliberations, discussions and then recommendations of constructive type.
आर्थिक स्तरांवरील प्रश्नांचा मागोवा घेताना भाऊसाहेबांच्या डोक्यात भारतीय गरीब शेतकरी आणि विपन्नावस्थेतील शेती हेच घटक प्रामुख्याने असायचे. भाऊसाहेबांच्या या कार्याचा गौरव खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पुढील शब्दांमधून केला आहे.
‘शेतकर्‍यांची सेवा करणे सोपे आहे त्यासाठी सोपे कायदे, साधे शिष्टाचार व सरळ माणसे हवी आहेत. हे तीनही गुण अंगीकारलेला डॉ. पंजाबराव देशमुख हा कदाचित भारताता या युगातला एकमेव असावा, ज्याने पद, प्रतिष्ठा व पैसा यांना तुच्छ लेखून आपला जीवनयज्ञ चेतविला.’ 
महात्मा गांधींच्या या विधानातून त्यांच्या कार्याचे मोठेपण आपल्याला प्रती होते. मोठी माणसे ही हिमनगासारखी असतात. त्यांचा आपल्याला प्रतीत होणारा जो मोठेपणा असतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक भाग हा अगोदर, अदृश्यच राहतो. डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांचं मोठेपण हे या प्रकारचं आहे आणि म्हणूनच ते विसाव्या शतकातील थोर पुरुषांच्या मांदियाळीत अग्रक्रमाने उठून दिसतात.
__________________________________________________
-डॉ. रविंद्र शोभणे, मराठी विभाग प्रमुख, घनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) 

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा