शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

कर्तृत्वाचा महामेरू - प्रा. डॉ. रमाकांत वि. ईटेवाड

आमलांगी विदर्भ मातेच्या सकस कुशीतून अनेक नररत्नांनी जन्म घेतला. संत महंत, विचारवंत, समाजतज्ज्ञ, समाजसुधारक, राजकारणी, देशप्रेमी, कवी, लेखक, तत्त्वज्ञ, धर्मसंस्थापक इत्यादी सोपानदेव चौधरी आपल्या कवितेतून सांगतात 

धुळाक्षरे पाटीवरी । जेव्हा धुळीतुनी आली ॥
तेव्हा विद्येची महती । मातीलाही समजली ॥
विदर्भाच्या मातीमाजी । अवतारे योगी ज्ञानी ॥
ज्ञानवल्लीची लावणी । केली पंजाबरावांनी ॥

याच वैभवशाली परंपरा लाभलेल्या विदर्भ भूमीचे श्रीकृष्णालाही आकर्षण वाटावे एवढे पावित्र्य, मांगल्य, आत्मिकसौंदर्य, धार्मिक अधिष्ठान या भूमीला प्राप्त झालेले आहे. त्याच पवित्र अशा भूमीत एकेकाळी अज्ञानरुपी अंध:कारानी कहर माजविला होता. या अंध:कारातून मुक्त करण्याकरिता इथला प्रत्येक व्यक्ती एखाद्या तपस्वी, ज्ञानयोग्याच्या प्रतिक्षेत होता. काळाची गरज आणि सामान्यांची प्रतीक्षा बघून प्रत्यक्ष विधात्याने या भूमीचे ग्रहण सोडविण्याकरिता, पांग फेडण्याकरिता भाऊसाहेबांच्या जन्माची योजना केली असावी. कवी सुरेश भटांच्या कवितेनुसार 

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे । 
आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे ॥

या भूमीचा कायापालट करण्याकरिता या भूमीचे थोर सुपुत्र, विश्वभूषण, कृषिरत्न, प्रखर राष्ट्रवादी, द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, शिवसंस्कृतीचे उपासक, बहुजनांचे कैवारी, भौमर्षी, शिक्षण महर्षी भाऊसाहेबांचा जन्म झाला असावा. तेव्हाच अभिवादनाकरिता राम शेवाळकरांनी आपल्या शब्दांची उधळण केली.

शतकांचे साहून शाप । जी मने रापली होती ॥
आलास थेंब घेऊनी । तू अशा अभाग्यांसाठी ॥
थरकाप तमाचा करण्या । कोळसे पुन्हा धगधगले ॥
ज्वालांच्या रक्त फुलानी । तुज पहिले वंदन केले ॥

भाऊसाहेबांच्या जन्माने पुलकित झालेल्या विदर्भमातेचे ऋण भाऊसाहेबांनी आपल्या कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्वाने फेडले याचे प्रत्यंतर म्हणजे भाऊसाहेबांनी आपल्या कृतार्थ हाताच्या पावन स्पर्शांनी स्थापित केलेल्या ज्ञानतीर्थांची म्हणजे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.
या संस्थेने अनेकांच्या जीवनाला आकार दिला. आधार दिला. अनेकांची स्वप्ने साकार केलीत, अनेकांच्या मृत आकांक्षांना संजीवनी देऊन पल्लवित केल्यात, अनेकांचे अश्रू पुसलेत आणि अनेकांच्या ओठावर हसू निर्माण केले, दीन-दु:खितांच्या वाट्याला आलेली दु:ख दूर केलीत.
मानवी जीवनाचे अंतिम ध्येय स्वाभीमानाने जगणे हे आहे. मूल्याधिष्ठित जीवन जगण्याकरिता आत्मविश्र्वास आणि आत्मनिर्भरतेची गरज असते. त्याकरिता ज्ञान आत्मसात करावे लागते. ज्ञान हे केवळ शिक्षणामुळेच मिळू शकते. जर माणूस शिकला नाही तर त्याचे व्यावहारिक नुकसान होतेच; परंतु सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक दृष्टीने देखील तो मागासलेला राहतो. त्यांच्या जीवनातील गडद अशा काळोखातील अंधार नष्ट करण्यासाठी ज्ञानरुपी प्रकाश किरणांचा उदय अत्यंत महत्त्वाचा असतो. हे या क्रांतिसूर्यांनी ओळखले आणि उघड्या-नागड्या बहुजनांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि तशी शिवतीर्थाच्या निर्मितीतून व्यवस्थाही करुन दिली.
बजरंग सरोदे आपल्या कवितेत लिहितात

भव्य दिव्य अन्‌खरे विदर्भी भाऊ तुम्ही जन्मले ।
म्हणूनी तुमचे आज पाहिजे गीत इथे गाईले ॥

पापळसारख्या अतिदुर्गम भागात जन्माला आलेल्या भाऊसाहेबांना आपल्या शिक्षणासाठी अतिशय खडतर अशी पायपीट करावी लागली. पापळ-नांदगाव (खंडेश्वर), पुणे ते इंग्लंड पर्यंत केलेल्या शिक्षण प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सावकार, नातेवाईकांकडून कर्ज घ्यावे लागले. प्रसंगी शेती गहाण ठेवावी लागली. अतिदाहक असा अनुभव पुढील आयुष्यातील शैक्षणिक कार्यासाठी प्रेरक ठरला असावा त्यामुळेच त्यांनी गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना भरपूर मदत केली आणि सर्वांकरिता शिक्षणाचे दालन खुले करून दिले.
जगजीवनराम यांच्या सहकार्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता काका कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारच्या वतीने चौकशी समिती नेमून अदर बॅकवर्ड कास्टस ची शिष्यवृत्ती मंजूर करून घेतली आणि सरकारी नोकरीमध्ये देखील काही राखीव जागा मंजूर करून घेतल्यात. होतकरू विद्यार्थ्यांसह ज्ञानपीपासू, वृत्तीच्या ज्ञानी उपासकांचा देखील योग्यतेनुसार सन्मान केला. डॉ. वि. भि. कोलते आणि कुसुमावती देशपांडे या दोन्ही प्राध्यापकांच्या नेमणुकीच्या वेळी भाऊसाहेबांनी त्यांची योग् बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. डॉ. ज्वालाप्रसाद हे तत्वज्ञानाचे प्रसिद्घ चिंतक होते. श्री शिवाजी कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक केली. पुढे त्यांची लोकविद्यापीठाच्या कुलगुरुपदी भाऊसाहेबांच्या कृपेने नियुक्ती झाली.
अशाप्रकारे अनेक यथायोग्य व्यक्तींवर भाऊसाहेबांनी अनेक प्रसंगी उपकार केलेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
काळे नावाच्या विद्यार्थ्यांचा प्रसंग अतिशय बोलका आणि तेवढाच हृदयस्पर्शी आहे, या प्रसंगातून भाऊसाहेबांच्या विशाल अशा क्षमाशील हृदयाची प्रचिती येते.
जगद्गुरू तुकोबांच्या उक्तीनुसार दया क्षमा शांती तेथे देवाची वसती याचा प्रत्यक्ष अनुभव करून देणारा हा प्रसंग आहे.
काळे यांनी दिल्लीमध्ये शिकत असताना इतर मागासवर्गीयांकरिता मंजूर असलेली शिष्यवृत्ती मिळावी म्हणून भाऊसाहेबांची खोटी सही केली. लोंढे यांनी त्याला पोलिसात देण्याची धमकी दिली तेव्हा लोंढे यांना भाऊसाहेब म्हणाले, तुम्ही त्याला असे धमकावू नका भारतात अनेक लक्षाधीश विनाकारण लाखो रुपयांचे खोटे धंदे करतात वरून शहाजोग बनतात या मुलाने शिकण्यासाठी हा गुन्हा केला म्हणून काय पाप केले? या शिष्यवृत्तीशिवाय त्याला जर शिकताच आले नाही तर त्यात त्याचा काय दोष? जा बाळ निर्धास्तपणे जा, ती सही माझीच आहे, असे मी अधिकार्‍यांना सांगेन. यापुढे मात्र तू असे करू नकोस. गरीबांचा गुन्हा कोर्टात रचत नाही. या अभयदानातून भाऊसाहेबांची गरीबांप्रती असलेली अपार करूणा दिसून येते. त्यातून न्यायप्रिय, क्षमाशील तसेच कृपाळू भाऊसाहेब आपल्या समोर येतात. ते मधुर केचे यांच्या काव्यपंक्तीनुसार 

पंजाबराव नावाने तेजाग्नि जन्मले होते
जखमांच्या संगे अमुचे जोडले तयाने नाते
इंधनापरी तो जळला चंदनापरी तो झिजला
ज्ञानाची टाके ठिणगी, अग्नी न अजूनही विझला

कुठल्याही व्यक्तीचा, संस्थेचा देशाचा विकास त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञान, साहित्य, कला, प्रतिभा, प्रज्ञा यातील प्रगतीच्या आलेखावरून मोजायचा असतो. या भौतिक विकासासह लौकिक गरजांची पूर्तता झाल्याशिवाय कुठलाही माणूस ज्ञानसाधना कैवा कलास्वादाकडे वळतच नाही. मूल्यवान जीवन जगण्यासाठी त्याला सर्व प्रकारच्या शास्त शाखा आणि विद्येच्या ज्ञानाची जाणीव करून घेणे गरजेचे ठरते आणि गरज ही शोधाची जननी असते. या शोधप्रक्रियेतूनच सर्वस्पर्शी असा विकास साधता येतो.
भौतिक विकासासह आत्मिक विकासही साधता यावा, विज्ञान आणि आध्यात्म याचा सुरेख समन्वय साधूनच श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली असावी. 

ज्ञानीयाने उभारिले सरस्वतीचे मंदिर 
बहुजनांसाठी तुच पुन्हा उघडले द्बार
ब्रह्मविद्येचा पिंपळ दारोदार फुलविला 
वेद मुक्या ओठातून अमृताचा बोलविला

हे विठ्ठल वाघांच्या कवितेतून जाणवते. भाऊसाहेबांचे जीवन म्हणजे अशा अपरिग्रही संन्यासाचे आहे.
खलील जिब्रानची महासागर नावाची एक रुपककथा वि. स. खांडेकरांनी काही साहित्यिकांवर लिहिलेली आहे.
खलील जिब्रानच्या या कथेत एक कवी आपल्या आत्म्यासह समुद्र किनार्‍यावर फिरायला जातो. तिथे त्याला अनेक व्यक्ती दिसतात. भोवतालच्या जगाचं जणू त्यांना भानच नसतं. त्यातील एक व्यक्ती समुद्र किनार्‍यावर लाटांसोबत येऊन पडलेल्या मृत माशांना आपल्या हातांनी अत्यंत हळूवारपणे उचलून त्यांना पुन्हा जीवनदान देण्याच्या हेतूने समुद्रात नेऊन सोडतो. हा त्या व्यक्तीचा कर्मयज्ञ तिथं अखंड चाललेला असतो. ती व्यक्ती म्हणजे भाऊसाहेब. पांढरी वस्त्र परिधान केलेला हा मुनी अविकसित जनसागराच्या किनार्‍यावर उभा राहून मृतांमध्ये प्राण ओतण्यासाठी जन्मभर धडपडला.
असा हा सच्चा मराठी माणूस कुणासमोर कधी वाकला नाही, कधी झुकला नाही, तो झुकला असेल, वाकला असेल पण स्वत:साठी कधीच नाही परंतु पददलित बहुजनांसाठी जन्मभरी मनस्वी तो धडपडला, व्याकुळला, रडला पण सर्व सामान्यांसाठी ते मधुकर वाकोडे यांच्या कवितेनुसार,

तुझ्या पावलो पावली उभे असे ज्ञानपीठ ।
नवा ज्ञानीया पाहता हर्षे पंढरीची वीट ॥
भावभोळ्या जीवा वाटे तुकयाचा अवतार ।
मुक्या ओठातून आता वेद काही निरंतर ॥

भाऊसाहेबांनी आपल्या जीवनात अनेक प्रसंग अनुभवलेले ते असे - चटणीसोबत भाकरीची चव चाखली आणि राज्योपभोगही घेतला. बैलगाडीतून, खटार्‍यातून भ्रमण केले आणि जगभर विमानातूनही फिरले. पं. नेहरू सारख्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि बंडू चपराशाच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. पं. नेहरू प्रथमच अमेरिकेत गेले होते. इकडे घडना समितीच्या बैठकी सुरू होत्या. अमेरिकेत पत्रकारांनी पंडित नेहरूंना विचारले, तुमच्या मनात सध्या काय सुरू आहे. नेहरू म्हणाले, भारतात गेल्याबरोबर घटना समितीच्या बैठकीत डॉ. पंजाबराव आणि ह. वि. कामथ मला कसे आडवे प्रश्न विचारतील याचा मी सध्या विचार करीत आहे. म्हणजे जीवनात ते बुद्घीमत्तेची अशी उंच शिखरे गाठते झाले आणि त्याचवेळी बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाने कारकुनीही पत्करते झाले. असा समतोल राखला.कधी संयम ढळू दिला नाही.
भारतातील तळागाळातील ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना शिक्षणाचे दरवाजे बंद आहेत. ही वस्तुस्थिती भाऊसाहेबांना बेचैन करीत होती. यातूनच श्री शिवाजी लोकविद्यापीठाची कल्पना अस्तित्वात आली. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अशी ऋषीतुल्य माणसे जन्माला येतात. ती काळाची गरज असते.
 ना. धों. महानोरांच्या काव्यपंक्तीनुसार, 

या नभाने या भुईला दान द्यावे । 
आणि या मातीतुनी चैतन्य गावे ॥
कोणती पुण्ये अशी येती फळाला । 
जोंधळ्यात चांदणे लखडून जावे ॥

अशाप्रकारे भाऊसाहेबांनी या भूमीला प्रकाशमान करण्याकरिता बरेच योगदान दिले. समाजाच्या आत्मविश्वास जागविण्याकरिता शिक्षणाची प्रथम व्यवस्था केली. शेतकर्‍यांचा गेलेला स्वाभिमान परत मिळावा म्हणून कृषिविषयक अनेक योजना राबविल्यात. राष्ट्राचे कल्याण आणि भविष्य भूमी व जल संपत्तीच्या संवर्धनावर अवलंबून आहे. कृषकांचा विकास म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास. कृषी ही औद्योगिकरणाचा आधार आणि आर्थिक विकासाचे भांडवल आहे असे मौलिक विचार सरकार दरबारी मांडलेत. शिक्षण, रोजगार, सामाजिक समता, आर्थिक समता या न्याय्य बाबींकडे भाऊसाहेबांनी आपले लक्ष्य केंद्रित केले आणि समाजाच्या मुख्य व्यंगावर अचूक बोट ठेवले. रक्तबंबाळ झालेल्या सामाजिकतेला आपल्या कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि दुरदृष्टीच्या माध्यमातून आपल्या पुरोगामी आचाराविचारांचा परिचय करून दिला. प्रवाहासोबत राहून तर कधी प्रवाहाच्या विरूद्घ जावून. कधीही आपल्या तात्विक अधिष्ठानाची पायमल्ली होऊ दिली नाही. सर्वस्पर्शी ज्ञान कौशल्यातून परदु:ख प्रवेश करणारे एक ऋषीतुल्य, उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या समोर येते. या संयमी, कल्पक, दयाळू, मायाळू, कृपाळू, क्षमाशील महर्षिला कोटी कोटी वंदन.
__________________________________________________
- प्रा. डॉ. रमाकांत वि. ईटेवाड, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती

 (श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) 

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा