शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

काव्यपुष्पातील भाऊसाहेब ___प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले

सामान्य माणसाचे जीवन स्वकष्टाने अमृतमय करणारे जनक्रांतीचे लोकमहर्षी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कल्पवृक्षाची स्थापना करुन ज्ञानाग्नी प्रज्वलित करुन, ज्ञानदीप चेतवून शेतीच्या दरात ज्ञानाची गंगा पोहोचविणारे थोर शिक्षण महर्षी, अस्पृश्यता निवारण बील मध्यप्रांत व-हाडाचे मंत्री असताना कायदे कौन्सिलमध्ये पास करुन घेणारे तसेच प्रत्यक्ष जीवनात आचरणातून अस्पृश्यता निवारण करणारे अस्पृश्योद्घारक, वैदिक वाड्मय धर्माचा उगम व विकास या प्रंबधाचे लेखन करणारे थोर लेखक, मातीमधून शास्त्राच्या फुलबागा फुलविणारे, रंजल्या गांजल्या कृषकांचे दैवत झालेले कृषिपंडित, शिक्षणाने केवळ उपजीविकेचे प्रश्नसुटत नाही तर जीवनातील जटील प्रश्न सोडविण्याची शक्ती प्राप्त होते अशी शिक्षणाविषयक विचारधारा असल्यामुळे संपूर्ण समाजाला विद्येची दालन मुक्त करणारे शिक्षणमहर्षी, प्रशंसनीय व बहुजनांकरिता कार्य करणारे मी विदर्भातील एकाच व्यक्तिला ओळखतो ती म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख असे गौरवोद्गार पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ज्यांच्याविषयी काढले ते कर्मयोगी, धन,दौलत वैभव, समृद्घी, मान, सन्मान या सर्वांचा लोककल्याणासाठी त्याग करणारे, स्वप्रयत्नातून एका नव्या युगाची निर्मिती करणारे युग निर्माता डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना माझे विनम्र वंदन.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव फक्त लेखकांवरच नाही तर अनेक कवींवर सुद्घा पडला आणि विविध काव्यपुष्पांचा वर्षाव या कवींनी भाऊसाहेबाच्या प्रभावी व्यक्तिमत्वावर व कार्यकुशलतेवर केला. उदा. मा.राम शेवाळकर, स्व. सुदामजी सावरकर, कवी अनिल, मा. कृष्णा चौधरी, स्व. बजरंग सरोदे, कवी सोपानदेव चौधरी, कवी बाबा मोहोड
 कवी विठ्ठल वाघ, कवी राज यालवीकर याशिवाय अशा अनेक कवींनी आपल्या काव्यसुमनातून भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व साकार करण्याचा प्रयत्न केला.
भाऊसाहेबांना वंदन करताना सुप्रसिद्घ साहित्यिक व कवी राम शेवाळकर म्हणतात-

शतकाचे साहून शापे |
जी मने रापली होती |
आलास थेंब होऊनी |
तू अशा अभाग्यांसाठी ||
थरकाप तमाचा करण्या |
कोळसे पुन्हा धगमगले ||
ज्वाळांच्या रक्तफुलांनी |
तुज पाहिले वंदन केले ||

संत साहित्याचे गाढे अभ्यासक स्व. सुदामजी सावरकर म्हणत असत.
भाऊसाहेबांनी बहुजनांना दाखविलेला मार्ग हा खरा असून त्या मार्गावरुन त्यांनी मार्गक्रमण केल्यास बहुजनांचे अंधारमय जीवन प्रकाशमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच भाऊसाहेबांच्या कार्याची थोरवी आपल्या गीतात गाताना ते म्हणतात-

    हे लोकमहर्षी युगपथदर्शी | 
     विजयी नाम तुम्हारा || 
    लो प्रमाण कोटी जनोका || 
स्व. सुदामजी सावरकर भाऊसाहेबांच्या दलितोद्घाराच्या, गरीब जनतेच्या उद्घाराच्या कार्याचा उल्लेख करताना आपल्या गीतात म्हणतात.

हरसाल दिया लाखो कलियो को |
 खिलने तुमने मौका || 

अज्ञान, अविद्या व अंधश्रद्घेमुळे स्वत:च्या समाजाचा कधीच विकास करु न शकणा-या लाखो लोकांना स्वत:चे जीवन उज्जव करण्याची संधी भाऊसाहेबांनी दिली. 
श्री. शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करुन सरस्वतीचे मंदिर भाऊसाहेबांनी कसे उभारले याचे मोजक्या शब्दात वर्णन करताना वेद मुक्याचा या कवितेत कवी प्रा. डॉ. विठ्ठल वाघ म्हणतात-

ज्ञानियाने उभारिले | सरस्वतीचे मंदिर ||
बहुजनांसाठी तुच | उघडिले द्बार ||

तर कवी मधुकर केचे यांनी भाऊसाहेबांचे जीवन व कार्य सार्थ शब्दात वर्णन केले आहे ते म्हणतात-

पंजाबराव नावाने |
तेजाब जन्मले होते ||
जखमाच्या संगे अमुचे |
जोडले तयाने नाते ||

भाऊसाहेब गावागावातून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी सतत फिरत होते. दीन दलितांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी त्यांनी रात्रंदिन प्रयत्न केले. कवी प्राचार्य राज यावलीकर लिहितात-

सारथी तू शिव रथाचा |
शिंपीत गेला ज्ञान |
बहुजनांसाठी केले विद्यादान |||
भाऊसाहेबांनी त्या काळात केलेला आंतरजातीय विवाह, विवाह प्रसंगी अस्पृश्य मुलांच्या हाताने दिलेला प्रीतीभोज, अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्याकरिता केलेला यशस्वी प्रयत्न हा त्यांचा परिवर्तनवाद समाजाला पुरोगामित्वाकडे नेणारा ठरला. कवी प्रा. श्रीकृष्ण राऊत सूर्याची भाषा या कवितेत म्हणतात-

सातपुड्याचा उंच कडा तू |
तू पूर्णा माई ||
तू मजुरांचा महादेव गा|
तू दलितांची आई ||

शिक्षणसम्राट आज निर्माण होताना दिसतात पण भाऊसाहेब शिक्षणमहर्षी झाले. भाऊसाहेबाच्या शैक्षणिक कार्याची संजीवनी शिक्षण क्षेत्राला लाभली होती. हे सांगताना प्रा. डॉ. भोजराज चौधरी म्हणतात की, 

समाज शेतकरी रचनेने शिल्पकार तुम्ही | 
भाऊ शिक्षण क्षेत्रा लाभे, तुमची संजीवन ||

भाऊसाहेबांनी शिक्षणांच्या क्षेत्रात मुखी|| केलेल्या क्रांतीचा अगदी मोजक्या शब्दात उल्लेख करताना कवी सुधाकर मोहोड म्हणतात-

आकाशाच्या पाटीवरती| 
धरित्रीच्या मातीवरती || 
शिक्षणक्रांती रेखीत होता । 
दख्खणचा कुणबी राजा || 

आपल्या प्रयत्नरुपी कर्तृत्वालाच देव समजणा-या भाऊसाहेबांना आराम नावाचा शब्दही माहीत नव्हता. ते जनसेवेसाठी सतत कार्य करीत राहिले. यत्नालाच देव समजणा-या भाऊसाहेबांविषयी कवी अनिल म्हणतात- 

त्याने यत्नाला देव जाणला पूजला| 
लहान लहान आरंभ करुन महान संघटना उभी केली || 
डोंगर उपसत राहिला || 
आराम त्याला माहित नव्हता | 
काम करीत करीत तो कामी आला || 

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख फार मोठे पुण्यवान पुरुष. त्यांनी आपल्या जीवनात स्वत:च्या कार्यकर्तृत्वाने फार मोठे पुण्य प्राप्त केले. म्हणून कवी कृष्णा चौधरी या पुण्याई विषयी भाऊसाहेबांनाच प्रश्न विचारतात-

कुणाची पुण्याई येऊन तू अवतरलास बुद्घाची, ख्रिस्ताची, गांधीची | 
पोटाला भाकरी येऊन मानवतेचे अध्यात्म सांगणा-या मार्क्सची ||

कवीच्या मते बुद्घाची समानता, ख्रिस्ताची दया, गांधीजीची सत्य व अहिंसा आणि कार्ल मार्क्सची मानवता भाऊसाहेबांनी सामान्य माणसाला आपल्या कर्मातून दिली.
भाऊसाहेबांचे शिक्षण क्षेत्राप्रमाणेच कृषिक्षेत्रातील कार्य अनमोल आहे. कृषी, शिक्षण व संशोधन तसेच अन्य क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान किमान खर्चात जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न भाऊसाहेबांनी केला.शेतकर्‍यांना शोषणमुक्त केले.म्हणूनच कवी बजरंग सरोदे म्हणतात-

 उघडी नागडी शेतक-यांची पोरे केले सुखी | 
मायेहूनि माय होऊनी घास भरविले मुखी||
वत्सलतेचा सागर होऊन प्रेम इथे वाटले | 
म्हणून तुमचे आज पाहिजे गीत इथे गाइले |

शिक्षणापासून कोसो दूर असलेला ग्रामतील शेतक-यांचा मुलगा शिक्षण घेऊ लागला तो भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेमुळेच. बहुजनांचे अंधारमय जीवन भाऊसाहेबांना प्रकाशित करायचे होते. त्यासाठी त्यांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेकरीता स्वत:च्या बंगला गहाण ठेवला. भाऊसाहेबांच्या या त्यागी आणि परोपकारी वृत्तीचे वर्णन करताना कवयित्री प्रा. कविता डवरे म्हणतात- 

अस्वस्थ कुणाची मात्र| 
तुज पाहवेना काळी रात्र| 
सुख भोगाचे म्हणुनी ||
कधी न हाती धरिले प्याले |
तव कष्टाने जीवन आमुचे अमृतमय झाले|| 

भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या श्री.शिवाजी शिक्षण संस्थारुपी रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झालेले पाहून कवी प्रा. गिरीश रा. खारकर म्हणतात.

रोपातून वटवृक्ष झाला |
शिवाजी संस्थेचा आज ||
शिक्षणाने आम्हा तारले |
धन्य पंजाबराव ||

कवी विष्णू सोळंके यांनी भाऊसाहेबांचा गुणगौरव सूर्याची उपमा देऊन केलेला आहे. सूर्य घराला आला या कवितेत ते म्हणतात.-

अंधाराच्या कुशीत कैसा |
सूर्योदय हा झाला || 
ज्ञानाची ही घेऊन गंगा | 
सूर्य घराला आला ||

भाऊसाहेबांची प्रेरणा येऊन कवी प्राद्य शरद पुसदकर यांचा म-हाटी तोरण फुलविण्याचा विचार अतिशय मोलाचा वाटतो ते भाऊसाहेब या कवितेते म्हणतात. 

शिवबाच्या शिवारास भाऊ तू भूषण | 
एक दिलाने फुलवू आता म-हाटी तोरण |

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे भाऊसाहेबांचे जीवन कृतीशील वर्णन करताना कवी अजय खडसे,    
भाऊ तूच आम्हा या अभंगात म्हणतात की, 

मंदिर प्रवेश |
सत्याग्रह केला || 
विचार दिसला |
कृतीतूनी||

भाऊसाहेबांच्या पंढरीचे वारकरी आम्ही आहोत म्हणून भाऊसाहेबांचे आम्ही भक्त, त्याचे कार्य पुढे नेण्याचा सतत प्रयत्न करु. भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वावर असे प्रेम. करणारे वारकरी प्रा. सतीश देशमुख आपल्या आम्ही वारकरी या अभंगात म्हणतात की, 
आम्ही वारकरी | तुझ्या पंढरीचे |
भक्त राहू साचे | सदा म्हणे ||
बहुजनांच्या मायेचे आहा तेजस्वी हिरा 
    कर्मातून वाहे मानव धर्माचा वारा ||

भाऊसाहेबांनी कृषीविषयक प्रदर्शनी, हरितक्रांतीविषयक प्रकल्प राबवून शेतक-यांचे जीवन सुखमय केले, लवाद कायदा आणून कर्जमूक्ती मिळवून दिली आणि श्री. शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करुन विद्येची गंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहचविण्याचा निश्चय वर्णन करण्याच्या संदर्भात श्री.एस.बी.उमाळे (माजी प्राचार्य)म्हणतात की, शिक्षण संस्था स्थापन करुनी निश्चय मनी एकच केला 
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख बहुजनांची माय कशी ठरली हे पोवाड्यात सांगताना कवयित्री प्रा. सौ कल्पना पी. देशमुख म्हणतात की, 

ज्ञानगंगा घरोघरी नेली |
अज्ञानाची झापड दूर केली |
कष्टाच फिकीर नाही केली |
    बहुजनाची माय जणू ठरली जी जी || 

दिनांक 10 एप्रिल 1965 रोजी भाऊसाहेबा नावाच एक युग काळाच्या पडद्याआड गेलं आणि या युगानं येथील मना मनाला दुखात बुडविल. या दुखाचं वर्णन कवी दे. ग. सोटे यांनी संग्रामातील निखारा या कवितेते शब्दबद्ध केलं ते म्हणतात.

संग्रामातील एक निखारा |
तो ही चमकत विझूनी गेला ||
इतिहासाच्या पानाचाही |
आज अचानक वेग थांबला ||

भाऊसाहेबांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचे दर्शन अशा अनेक मान्यवर कवींच्या काव्यपुष्पातून घडविले. भाऊसाहेबांच्या या विविध कार्याचा आढावा घेतल्यास ते बहुजन सामाजातील प्रत्येक घटकांचा आधार बनले होते. 
दिनांक 27 डिसेंबर 1898 रोजी जन्मलेले बहुजनोद्घारक भाऊसाहेब दिनांक 10 एप्रिल 1965 रोजी अनंतात विलीन झाले. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाला माझे कोटी कोटी वंदन!
_________________________________________________
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले, नांदगाव कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती.

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...
लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा