शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

विदर्भाचा गौरवपुत्र _सौ. अश्विनी बुरघाटे


प्रत्येक राष्ट्राची अस्मिता त्या राष्ट्रात घडलेलया विविधांगी इतिहासानेच घडत असते, ही अस्मिता सतत जागती राहिली तरच राष्ट्राचे मन तरुण राहते, त्याचे कर्तृत्व फुलते, त्याचा उत्साह व महत्त्वाकांक्षा ही कधीही मंदावत नाही. 
प्राण नसेल तर देहाचे काय होईल? तसेच अस्मिता नसेल तर राष्ट्राचे काय होईल ? याचा सखोल अभ्यास करण्याची आज नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. याचा विचार केल्यास विविध मार्ग आपल्याला दिसतात. या मधील अस्मिता जागती ठेवण्यासाठी राष्ट्राच्या इतिहासातील, विद्बान, कर्तृत्ववान, समाजसुधारकांच्या व संतांच्या महानतेचा अभिमान बाळगून त्यांच्या कार्याची माहिती प्राप्त करुन प्रेरणा मिळविणे, त्या अनुषंगाने कार्य करणे हा मार्ग महत्त्वाचा व अनमोल असा आहे. 
अशा विविध महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा व त्यांच्या महानतेचा परिचय करुन येत असताना डोळ्यासमोर प्रतिमा तरते ती अशाच एका थोर समाजसुधारक, महापुरुष असणार्‍या म्हणण्याचे कारण, ती आपलया कर्तृत्वाने आजही जिवंत आहे. ही व्यक्ती म्हणजे डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांची. 

वक्तव्याने दिले अखंड मानवतेचे बोल |
मुखातूनी बरसे नित्य सात्विकतेचे मोल |
हृदयी दिला नित्य जन्म वास्तव विचारांना  
कवटाळले उरी सदा प्रगल्भ भावनांना |

भाऊसाहेब एक आपलंस वाटणार नाव, निस्वार्थ प्रतिमा, प्रगल्भ व वास्तवादी विचारसणीच.एक असामान्य व्यक्तीमत्त्व. पापळ या छोट्याशा खेडे गावातील काळ्या मातीतून अंकुरलेल हे बीज आणि या बीजाचा वटवृक्ष झला तो त्यांच्या प्रयत्नाने, जिद्दीने, नियमाने, परिश्रमाने, भाऊसाहेब नावाचा वटवृक्ष पंजाब नावाचा वटवृक्ष ज्याचे जीवनकार्य संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला व मराठी समाजाच्या एकत्रीकरणाला पोषक झाले ही एक ऐतिहासिक घटना फार महत्त्वाची आहे. संपूर्ण मराठी जनता आणि संपूर्ण मराठा समाज हा एका प्रदेशात आणि राज्यात आल्याशिवाय त्यांचे संघटन आणि उत्थान होणार नाही हे मूलभुत सत्य ज्या थोड्या मराठी नेत्यांनी ओळखले आणि ते मूर्तावस्थेत आणण्यासाठी ज्यांनी पद्घतशीर प्रयत्न केले, त्या मूठभर नेत्यांमध्ये भाऊसाहेबांची गणना अग्रभागी करण्यात आली आहे. 
भाऊसाहेब जरी राजकारणात बरेच चमकले, तरी ते हाडाचे समाजसुधारक होते आणि त्यांचे मुख्य कार्य त्या क्षेत्रातच झाले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने आपल्या समाजाची जेवढी अवनती झालेली आहे, तिचे कारण बहुजन समाजावर शिक्षणाचे संस्कार होऊच दिले नाही. अशी त्यांची पक्की खात्री झाली होती. म्हणून खेड्यापाड्यातील प्रत्येक स्त्री पुरुष शिकून सुजाण झाला पाहिजे, या एकाच तळमळीने त्यांनी विदर्भाच्या ग्रामीण विभागात प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षण प्रसाराच्यासर्व सोयी केल्या. लोकशाहीचे यश, हे मतदार हा शिक्षीत आणि सुजाण असण्यावरच अवलंबून असते, अशी त्यांची श्रद्घा होती. त्याही दृष्टीने त्यांनी शिक्षणावर एवढा भर दिला. त्याचप्रमाणे खेडुतांना जीवनोपयोगी शिक्षण देण्यासाठी त्यांनी रुरल इन्स्टिट्यूट, जनता कॉलेज सारख्या संस्थाही काढल्या. खर्‍या अर्थाने आपल्या दलित आणि अवनत समाजाचे जीवन सगळ्या बाजूंनी सुसंस्कृत आणि सफल करण्यासाठी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था काढणारा, असा क्षीतीजापलीकडील व्यापक दृष्टीचा थोर शिक्षण धुरीण अखिल भारतात दुसरा झालेला नाही. 
शिक्षणांबरोबरच कृषक कार्य हे भाऊसाहेबांचे जीवित कार्य होते. कृषकांचे दारिद्रय आणि अज्ञान दूर करुन भारताचा सर्वकष विकास साधण्याचे त्यांचे ध्येय होते. शेतकर्‍यांची समृद्घी म्हणजे हिंदुस्थानची शान असे ते मानत भाऊसाहेब एक क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी भारताला पुरोगामी तत्त्वज्ञान दिले. त्यांनी वर्‍हाड शेतकरी संघ या नावाने पहिली संघटना निर्माण केली. जागतिक कृषी आणि कृषक वर्गाला मान्यता मिळवून दिली. भारतीय कृषकांचा दरारा व वचक त्यांनी राज्यकर्त्यांवर बसविला. भारतीय कृषक म्हणजे वा राष्ट्राचा मानबिंदू हे त्यांनी जगाला पटवून दिले. शेताकर्‍यांनीची भारताला स्वातंत्र्याचा इतिहास दिला, त्यागाचा पाठ दिला, उत्पादनाचे पर्व दिले. शेतकर्‍यांच्या कष्टातूनच देशाची भरभराट होऊ शकते, अशी समज डॉ. पंजाबरावांनी या देशाला आपल्या कृतीतूनच दिली. ध्येयतत्वावर माणसे त्यांनी प्रेमाने सांभाळली. त्यावेळी त्यांना यश अपयश या दोन्ही गोष्टी सहन कराव्या लागल्या. आणि खरे कार्य कधी पुसल्या जात नसते. त्यांनी भारतीय कृषकांचा एक धवल कालखंड निर्माण केला. कृषकाचे भरघोष उत्पादन हा सामाजिक प्रगतीचा मुख्य झरा आहे हे त्यांनी जगाला पटवून दिले. भाऊसाहेबांनी कृषिमंत्री पद भूषवित, त् यांच्या कार्यकाळात भारत कृषक संस्थांशी संबंध ह्या क्रांतीकारी घटना घडवून आणल्या. शेतकर्‍यांच्या संघटनेशिवाय देशाला भाग्योदय नाही, हे भाऊसाहेबांनी ओळखले आणि कृषक संघटना मजबूत होण्यासाठी प्रयत्न केले. 
Tryst with Destiny या अजरामर भाषणात पंडित जवाहरलाल नेहरुनी म्हटले आहे, 
The service of India means the service of the millions who suffer. It means the ending of poverty and ignorance and disease and inequality of opportunity. So long as there are tears and suffering so long our work not be over.
निर्धनता, अज्ञान आजारपण आणि त्यांची असमानता नष्ट करणे हे आपले कर्तव्य आवश्यक हवे. असे नेहरुंनी प्रतिपादन केले हवे. सर्व घेऊनच भाऊसाहेबांनी देशसेवेचे व्रत यासाठी त्यांनी किती तरी क्षेत्रांमध्ये रुढ केले. प्रथमपासूनच सामर्थ्यांचे उपासक भाऊसाहेबांनी व्यायाम, खेळ, क्रीडा, शिक्षण यावर सतत भर दिला. यातूनच व्यायाम शाळा व व्यायाम प्रसारक सवींचे बलभीम व्यायाम प्रसारक मंडळ मुर्तिजापूर अभिमन्यू व्यायाम प्रसारक मंडळ, मंडळाचे एकत्रिकरण करुन भारत या नावाची नवीनच संस्था रजिस्टर्ड करुन घेतली. भारत सेवक दल हे केवळ शारीरिक शिक्षणाचे मंडळच न राहता ते बळवंताची खाण ठरावे, राष्ट्रीय वृत्तीच्या मुशीत ओतलेले शिस्तीचे तरुण नागरिक त्यातून निर्माण व्हावेत, म्हणून त्यांच्या शिक्षण पद्घतीत आवश्यक तो बदल वेळोवेळी करण्यात आला. ठिकठिकाणी तरुण मुलांचे व मुलींचेही व्यायाम वर्ग घेण्यात येऊ लागले. 
श्री यशवंतराव चव्हाणांनी भाऊसाहेबांविषयी काढलेल्या उद्गारात म्हटले आहे की, पंजाबरांवाचे ऋण विदर्भातील व महाराष्ट्रातील लोकांना पिढ्यान पिढ्या विसरता येणार नाही. पंजाबराव खरे पृथ्वीपूत्र होते. जमीन आणि जमिनीशी खेळणारी व झगडणारी माणसे यांचे जीवन सुधारणे हे ते आपले कर्तव्य मानीत. आज देशात असलेलया कृषी विद्यापीठाच्या निर्मिती मागील विचार व जाणीव पंजाबरावांची होती. 
डॉ. भाऊसाहेब म्हणजे शिवमंदिराचे सुवर्ण कळस, दिनदलितांचे माहेर, भारतातील दलितांच्या घृणा जनक व्यंगचित्राचे अत्यंत तेजस्वी व पुनीत चित्रात रुपांतर करणारे कलाकार, लाकादरास पात्र झालेला लोकोत्तर, लोकाग्रणी महर्षी महर्षी पंजाबराव म्हणजे भारतीय क्षितीजावर झळकणारा देदीप्यमान तारा, अननुभूत आकर्षणाचा लोहचुंबक, निर्भयतेचा महामेरु, पावित्र्याचा महासागर, उत्साहाचा नयगारा व चैतन्याचा महासिंधू होय असा शीलवान सामाजिक कार्यकर्ता क्कचितच दृष्टीस पडतो. असा या आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि शक्तीचा प्रत्येक कण आपल्या समाजाच्या उद्घारासाठी खर्च करणार्‍या महान विभूतीस कोटी कोटी प्रणाम करते आणि श्रद्घेची भावना असलेलया खालील शब्दांना भाऊसाहेबांच्या पावन चरणी अर्पण करते.
तू नावाप्रमाणेच पंजाब झालास, कर्तव्य श्रेष्ठ असे करुन गेलास,
काळ्या आईचे पांग फेडूनी, तू विदर्भाचा गौरव पूत्र ठरलास.
________________________________________________
सौ. अश्विनी बुरघाटे, कस्तुरबा कन्या शाळा, बेलपूर, अमरावती 7588544269

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...
लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा