शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

भाऊसाहेबांविषयी

1

श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील सर्व अध्यापकांना व विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या सुवर्ण संधी उपलब्ध होत आहेत. त्यांचा उपयोग करुन त्यांनी आपले संस्थेचे व समाजाचे आधिकाधिक हित साधणे शक्य आहे.
मला माझ्या कामात मिळालेली माणसे ही खालच्या तळातून आलीत, तरी ती प्रामाणिक होती, त्यामुळेच मी एवढे काम करु शकलो.
सुशिक्षण, ज्ञानप्रसार, सुयोग्य स्वास्थ व सुखसमृद्धी या बाबतीत विदर्भातील ग्रामीण जनता समोन्नत कशी होईल, याची चिंता वाटणे हे आमचे इष्टसाध्य आहे.
शेती नुसत्या खतांचा वापर करुनच अधिक पिकत नाही, तिला मेहनत , मशागत इ. गोष्टीची जरुरी आहे.
 - शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख
______________________________________________________________________
ठसे पाऊलांचे त्यांच्या इथे देव व्हावे,
रोज पाळण्यांनी त्यांचे दैवगीत गावे.
जगी वावरावे त्यांचे पांघरुन शेले,
देशकार्य करुनी गेले तेच धन्य झाले.
- सुधाकर देशमुख
उधळून प्राणांची फुले महाराष्ट्र तुज मुजरा करी,
वाहून तनमनधन तुला पंजाब चरणांना धरी,
गावी यशोगीते तुझी वंगीय अमृत वैखरी,
गंगेचिया लाटातुनी उठती तुझे नामध्वनी.
- सुरेश भट
सुप्रसिद्घ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि भारताचे महामहिम राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 1965 साली आपल्या संदेशात म्हटले की, ‘मी डॉ. पंजाबराव देशमुख यांना अनेक वर्षांपासुन ओळखतो. त्यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेला मी व्यक्तीश: अमरावतीला जाऊन भेट दिली आहे. समाजातील अशिक्षित आणि अज्ञानी लोकांसाठी त्यांनी केलेले कार्य खूप मोलाचे आहे. विशेषत: शेतकर्‍यांसाठी तर त्यांनी अतिशय तळमळीने महान कार्य केले आहे.’
पंजाबराव नावाचे तेजाब जन्मले होते,
जखमांच्या संगे अमुचे जोडले तयाने नाते
इंधनापरी तो जळला, चंदनापरी तो झिजला,
ज्ञानांची टाके ठिणगी अग्नी न अजूनही विझला.
मधुकर केचे
सक्तीच्या प्राथमिक शिक्षणावर भाऊसाहेबांनी त्यावेळी आपले लक्ष केंद्रित केले पण ते केवळ साधन होते. मुख्य साध्य शेतकर्‍यांचा उद्घार आणि म्हणून शेतकरी हाच त्यांच्या कार्यांचा केंद्रबिंदु होता. शेतकर्‍यांनी शिक्षण घेतले पाहिजे, तिकडे त्यांची प्रवृत्ती नसेल तर ती निर्माण केली पाहिजे, हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या अंगीकृत कार्यासाठी आरंभीची पावले टाकली.
शेतकर्‍यांसाठी नव्हे तर सर्वांसाठी त्यांनी शिक्षण सक्तीचे केले. इतकेच नव्हे तर शेतकरी संघ नावाची संस्था निर्माण केली. ही गोष्ट आजच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होय.
- डॉ. वि. भि. कोलते
डॉ. भाऊसाहेबांविषयी मान्यवरांचे गौरवोद्‍गार
ह्या भागातील शिक्षण संस्थांनी मी प्रभावित झालो आहे. शिक्षण सवलती उपलब्ध नसलेल्या ग्रामीण क्षेत्राला ज्ञानप्रकाश देत असलेल्या श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे कार्य स्फूर्तिदायक आहे.’ - डॉ. राजेंद्रप्रसाद
‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे अतिशय दुरदृष्टीचे नेते होते. त्यांनी कृषी आणि शिक्षण अशा दोन्ही क्षेत्रात अद्बितीय कार्य करून ठेवले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच बहुजन समाजातील तरुण पिढी शिक्षण घेऊ शकली. आज मी ज्या पदावर आहे त्याचे सर्व श्रेय डॉ. भाऊसाहेबांना जाते. त्यांनीच मला प्रथमत: आमदारकीसाठी तिकीट दिले होते.’
- महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई देविसिंह पाटील, शिवसंस्थेच्या अमृत महोत्सव समारंभातील उद्‍गार
‘टिळक, आगरकर, महर्षि शिंदे, महर्षि कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील या सर्वांच्या शैक्षणिक कार्यापेक्षा डॉ. भाऊसाहेब यांच्या श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे कार्य हे काही बाबतीत मूलगामी आणि व्यापक ठरेल. बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नतीचे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या संयमीत रीतीने आणि इतक्या विविध स्वरूपात यशस्वी करून दाखविणारा श्रेष्ठ शिक्षण संघटक त्यांच्याशिवाय महाराष्ट्रात आज तरी दुसरा दिसत नाही.’
- गं. त्र्यं. माडखोलकर, सुप्रसिद्घ साहित्यिक व संपादक दै. तरुण भारत.
‘भाऊसाहेबांनी शिक्षण कार्य केले नसते तर आज काही क्षेत्रात चमकणारी नवी पिढी दिसली नसती ती तयार करण्याचे महान कार्य डॉ. देशमुखांचे आहे. ते भारतातील शेतकर्‍यांचे खरे मित्र एक मार्गदर्शक आहेत.’
-श्री ना. ग. गोरे, समाजवादी नेते
संकलन : डॉ. शोभना र. लोंढे
श्री शिवाजी, शिक्षण महाविद्यालय, अमरावती
मी आय. सी. एस. न झालो तरी आपली निराशा होऊ नये, कारण आय. सी. एस. होण्यापेक्षा जगात हजारपटींनी चांगल्या लोकहिताच्या व त्याचबरोबर किर्तीच्या असणार्‍या कितीतरी गोष्टी आहेत.
-शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख
‘लोकशाही राज्यपद्घती स्वीकारल्यानंतर लोकशाहीच्या तत्वांची योग्य बाजू सर्वांकडून विशेषत: अधिकारारुढ पक्षाकडून राखल्या गेली पाहिजे.’
‘प्रौढ मताधिकारामुळे विधान मंडळात सर्वसाधारण माणसाला प्रतिनिधीत्व मिळून त्याचे हाती फार मोठे अधिकार आले आहेत, त्यामुळे या अधिकाराचा उपयोग तो संबंध राष्ट्राच्या कल्याणार्थ करु शकतो.’
- शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख.

आठवणी
डॉ. भाऊसाहेबांना शिक्षणाविषयी प्रचंड तळमळ होती. त्यासाठी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना तर केलीच पण खेड्यापाड्यातील इतरही शिक्षण संस्थांना मोलाची मदत केली. खेड्या-पाड्यातील कार्यकर्त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले. 1953 सालचा प्रसंग मला आठवतो. मी तळवेल येथे माझ्या काकांच्या नावे श्री. बाबाराव शिक्षण संस्थेची स्थापना केली. या शिक्षणसंस्थेचा उद्‍घाटनासाठी मी भाऊसाहेबांना निमंत्रित केले. वास्तविक पाहता इतक्या मोठ्या पदावर असणारी व्यक्ती लहानशा शिक्षण संस्थेच्या उद्घाटनासाठी येईल किंवा नाही अशी धास्ती होती. परंतु या उद्‍घाटनाला भाऊसाहेब आवर्जून उपस्थित राहिले आणि उत्कृष्ट भाषण त्यांनी आम्हा तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. यावरुन त्यांची दुरदृष्टी,मनाचा मोठेपण आणि शिक्षणाविषयी तळमळ दिसुन येते.
भाऊसाहेबांची एक महत्त्वाची आठवण म्हणजे त्या काळात आम्ही युवक भारत सेवक समाजाचे कार्य करित होतो. माझी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा भारत सेवक समाजाचे अखिल भारतीय अध्यक्ष होते. मी स्वत: विदर्भ विभागाचा उपाध्यक्ष होतो. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, गावातील तरुणांना एकञ करणे, त्यांचे शिबिर येणे, बंधारे बांधणे अशी कामे आम्ही करत होतो. अशाच एका शिबीराचे आम्ही यावली या गावी आयोजन केले होते. त्यासाठी भाऊसाहेबांना निमंञित केले. भाऊसाहेब तेव्हा सहकारी मंञी होते. ठरल्यानुसार भाऊसाहेबांन कार्यक्रमाला आले. गावकरी मंडळी जमली होती. माझे प्रास्तविक भाषण सुरु झाले आणि अचानक गावातील तरुणांचा एक गट व्यासपीठाकडे धावून आला. पकडा-मारा असा आवाज आला. भाऊसाहेबांवर हल्ला करण्यासाठी विरोधी गटाचे लोक आले होते. इतक्यात समयसूचकता दाखवून भाऊसाहेबांना वाचविण्यासाठी मी मधे पडलो. तो वार माझ्यावर झाला. मी रक्तबंबाळ झालो. आमच्या कार्यकर्त्यांनी भाऊसाहेबांना गाडीजवळ पोहोचविले आणि रवाना केले. त्यामागून काही वेळाने मी गेलो. भाऊसाहेब माझी वाट पाहत पुढे उभे होते. त्यांनी मला स्वत:च्या गाडीतून अमरावतीला आणले आणि दवाखान्यात भरती केले आणि मगच गेले. तेव्हाचे नेते असे होते. एक अनर्थ टळला. भाऊंसाहेबांना कोणतीही दुखापत झाली नाही याचे मला मनोमन समाधान वाटले व आजही वाटते.
-श्री भैय्यासाहेब देशमुख, माजी आमदार

आठवणी
1955-56 सालची ही गोष्ट आहे. संयुक्त महाराष्ट्राचे तेव्हावातावरण होते. आबासाहेब खेडकर, यशवंतराव चव्हाण आणि भाऊसाहेब ही मंडळी काँग्रेसच्या प्रचारासाठी गावोगावी दौरे करीत होती. अमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर असताना ते सभेसाठी तळवेलला आले. तेव्हा गावात फारश्या सोयी नव्हत्या. आजच्यासारखे स्टेज, लाऊडस्पिकर तेव्हा खेड्यात उपलब्ध होत नसत. आम्ही तख्तपोसावर जाजम-गाद्या टाकून स्टेजची बैठक व्यवस्था केली. साध्या खोक्या ची पायरी केली आणि दुर्देवाने यशवंतराव चव्हाण चढत असताना ती तुटली. पण या नेत्यांनी त्याचे काहीही वाईट वाटून घेतले नाही. आबासाहेब,यशवंतराव, भाऊसाहेब या नेत्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचा आयोजक म्हणून मी प्रास्ताविक भाषण केली. एवढ्या मोठ्या नेत्यांसमोर बोलण्याची माझी पहिलीच वेळ होती. कार्यक्रमानंतर गाडीत यशवंतरावांनी माझ्या आयोजनाचे कौतुक केले, भाऊसाहेबांनी त्याला दुजोरा देऊन मला जिल्हा विकास मंडळावर घेण्याबाबत यशवंतरावांना सुचविले आणि काही दिवसातच माझी नियुक्ती झाली. भाऊसाहेबांमुळे मला हे पद प्राप्त झाले. भाऊसाहेब असे गुणग्राहक होते. त्यांच्या सहवासातील त्या आठवणींनी आजही मनाला दिलासा मिळतो.
अमरावती जिल्हात त्याकाळात हिमालयाच्या उंचीची माणसे होती. राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत वैर नव्हते. डॉ.पंजाबराव देशमुख आणि तपोवनचे संस्थापक डॉ. शिवाजीराव पटवर्धन हे राजकिय दृष्ट्या परस्पर विरोधी होते. एका निवडणूकीत डॉ. भाऊसाहेब आपला प्रचार प्रचार आटपून परत येत होते. त्यांना रस्त्यात डॉ. पटवर्धन हे उभे दिसले. चौकशीअंती कळले की, डॉ. पटवर्धनांची मोटार नादुरुस्त झाली आहे. डॉ. भाऊसाहेबांनी स्वत:ची गाडी डॉ.पटवर्धनांना दिली आणि मी नुकताच प्रचार करुन आलो आहे. आता तुम्ही सावकाश तुमचा प्रचार करुन या. गाडी देण्याची घाई करुन नका असे सांगितले. किती मोठ्या उंचीची ही माणसे होती.
- श्री भैय्यासाहेब देशमुख, माजी आमदार
डॉ. भाऊसाहेबांविषयी मान्यवरांचे गौरवोद्‍गार
‘ह्या भागातील शिक्षण संस्थांनी मी प्रभावित झालो आहे. शिक्षण सवलती उपलब्ध नसलेल्या ग्रामीण क्षेत्राला ज्ञानप्रकाश देत असलेल्या श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे कार्य स्फूर्तिदायक आहे.’
 - डॉ. राजेंद्रप्रसाद
‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे अतिशय दुरदृष्टीचे नेते होते. त्यांनी कृषी आणि शिक्षण अशा दोन्ही क्षेत्रात अद्बितीय कार्य करून ठेवले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच बहुजन समाजातील तरुण पिढी शिक्षण घेऊ शकली. आज मी ज्या पदावर आहे त्याचे सर्व श्रेय डॉ. भाऊसाहेबांना जाते. त्यांनीच मला प्रथमत: आमदारकीसाठी तिकीट दिले होते.’ - महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई देविसिंह पाटील, शिवसंस्थेच्या अमृत महोत्सव समारंभातील उद्गार
घ्घ्टिळक, आगरकर, महर्षि शिंदे, महर्षि कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील या सर्वांच्या शैक्षणिक कार्यापेक्षा डॉ. भाऊसाहेब यांच्या श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे कार्य हे काही बाबतीत मूलगामी आणि व्यापक ठरेल. बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नतीचे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या संयमीत रीतीने आणि इतक्या विविध स्वरूपात यशस्वी करून दाखविणारा श्रेष्ठ शिक्षण संघटक त्यांच्याशिवाय महाराष्ट्रात आज तरी दुसरा दिसत नाही.’
- गं. त्र्यं. माडखोलकर, सुप्रसिद्घ साहित्यिक व संपादक दै. तरुण भारत.
`भाऊसाहेबांनी शिक्षण कार्य केले नसते तर आज काही क्षेत्रात चमकणारी नवी पिढी दिसली नसती ती तयार करण्याचे महान कार्य डॉ. देशमुखांचे आहे. ते भारतातील शेतकर्‍यांचे खरे मित्र एक मार्गदर्शक आहेत.’
-श्री ना. ग. गोरे, समाजवादी नेते
संकलन : डॉ. शोभना र. लोंढे
ज्ञानदीप हा विद्यार्थ्यांचा वर्‍हाडचा हरपला,
अरे हा थोर पुरूष लोपला
शासनात बसुनी शेतकरी जगविला
कृषकांचा मेळा दिल्लीला भरविला
तुकड्या म्हणजे श्री पंजाबराव किर्तीला पावला
विसरी ना भारत तव शक्तीला
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...
लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा