शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

कृषी पंढरीचे दैवत__प्राचार्य डॉ.देवानंद अतकरे/प्रा.डॉ.पंजाब पुंडकर

कृषिप्रधान देश म्हणून भारताची स्वतंत्र ओळख आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा, समाज व्यवस्थेचा कणा आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा हा कृषीचा आहे. असे आम्ही मोठ्या गौरवाने सांगतो. परंतु आज कृषी व कृषकांची शोकांतिका आमच्यासमोर चिंतनाचा विषय आहे.
गेल्या दशकात विदर्भ, मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी उच्चां गाठला. काल परवाच दूरदर्शनवर आलेली बातमी जीवाला चटका लावून गेली. गेल्या पाच दिवसात विदर्भात बावीस शेतकर्‍यांच्या आत्महत्या. भारतीय शेतकर्‍यांचे दु:ख, त्यांचे आर्थिक हाल यातून हे सत्र कधी थांबणार? या त्याच्या अधोगतीला कोण जबाबदार? मूळात शेतकरी आत्महत्या का करतो? शेती तोट्यात जाते. हे एवढे एकमेव कारण त्याला असू शकत नाही. आजपर्यंत पूर्वजांनीही पारंपारिक पद्घतीने शेती केली. त्यांच्यावर ही वेळ कधीच आली नव्हती. मग आजच ही वेळ का यावी ? याची उत्तरे शोधून त्यावर अंमलबजावणी करण्याची गरज आमच्यावर आलेली आहे. नाहीतर पुढील पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही. शासनकत्यांनी सुद्घा याला शासन जबाबदार नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊ नये. जेव्हा देशावर नैसर्गिक किंवा मानव निर्मित संकटे येतात तेव्हा हाच जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या कापसाच्या बंडीवर पाच-पन्नास रूपयाची मदतनिधी देश सावरायला देतो, हे विसरता कामा नये. शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला योग्य किंमत मिळत नाही, व्यापार्‍याकडून त्याचे शोषण होते, वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे तुकडे झालेत, सत तची नापिकी, वाढती महागाई, वाढणारा कर्जाचा बोजा, विजेचे भारनियमन, सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न, पारंपारिक व्यवसायाचा अस्त, खते-किटकनाशकांचा वाढता वापर, कौटुंबिक कलह, हुंड्या सारख्या प्रथा, खाजगीकरण, उदारीकरण, वाढते शहरीकरण, मुक्त अर्थव्यवस्था इत्यादी समस्यांमुळे ग्रामीण शेतकरी अंधाराच्या खाईत पडलेला आहे. त्याला प्रकाशाच्या किरणांची साथ हवी आहे. तो कृषी पंढरीचे वारकरी पांडुरंगरूपी कृषिमहर्षी डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्य व विचारानुसार चालणार्‍या पांथस्थाची वाटत पाहत आहेत.
शेतकर्‍यांचे अपार दु:ख दारिद्र्य भाऊसाहेबांनी जवळून अनुभवले, अज्ञान, दारिद्र्य व्यसनांनी वेढलेल्या या समाजाला मुक्तीचा मार्ग त्यांनी सुचविला. आज त्या मार्गाची नितांत गरज आहे. भाऊसाहेबांना एकच ध्यास होता तो म्हणजे शेतकरी व शेती विकास, त्यासाठी त्यांनी विकासाचे प्रत्यक्ष कार्यक्रम शेतकर्‍यांना दिले.

शेतकरी संघटन :

ग्रामीण लोकजीवनातील वेगवेगळ्या कारणांनी विखुरलेला शेतकरी हा एकसंघ करण्याचे कार्य सर्वप्रथम भाऊसाहेबांनी केले. त्यासाठी त्यांनी शेतकरी संघ स्थापन केला. आपल्याला आपला हक्क व न्याय मिळवून घ्यायचे असतील तर संघटित होणे गरजेचे आहे. हे भाऊसाहेबांनी शेतकर्‍यांना पटवून दिले. शेतकरी संघाविषयी भाऊसाहेबांची भूमिका स्पष्ट होती. शेतकरी मंच कुठल्याही पद्घतीने राजकीय असणार नाही. तर तो शेतकर्‍यांचेच प्रतिनिधित्व करणार. शेतकरी व मंच कुणा मूठभर मोठ्या शेतकर्‍यांच्या हाती राहू नये. तसेच तो केवळ मागण्या करणारी व मतभेदांना महत्त्व देणारीही संघटना होऊ नये तर ती स्वत:वर श्र्िवासणारी, शेतकर्‍यांना मदत देणारी एक सहकारी संघटना व्हावी. अशी त्यांची शेतकरी संघामागील भूमिका होती. दुर्दैवाने आज अशी ध्येय, धोरण असणारी शेतकर्‍यांची संघटना व संघटक नाही, परंतु असे असणे गरजेचे आहे. संघटन शक्तीशिवाय अर्थात नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मात्र तेवढेच खरे आहे. याच दरम्यान भाऊसाहेबांनी ग्रामीण भागात शेतकरी समाज निर्व्यसनी व बलशाली करण्यासाठी भारत सेवक दल स्थापन केला. शेतकर्‍यांच्या कल्याणाकरिता जेवढे करता येतील तेवढे प्रयोग भाऊसाहेबांनी केले. त्यातील उत्तम उदाहरण भारत कृषक समाजाचे देता येईल. भारत कृषक समाज निर्मितीमागील उद्देश असा होता की, शेतकर्‍यांना आधुनिक पद्घतीने शेती करण्याचे प्रशिक्षण देणे, शेतीच्या नवनवीन प्रयोगाची माहिती देणे, कृषी प्रदर्शनी, चर्चासत्रे, संमेलने, समारंभ आयोजित करणे, राज्यातील तसेच परेदशातील शेतकर्‍यांना परस्पर भेटीगाठी द्बारे एकमेकांना कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करता यावी. भाऊसाहेबांनी शेतकर्‍यांच्या उद्घारासाठी अनेक योजना राबविल्यात उदा. राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ, कृषक सहकारी अधिकोष, आफ्रो आशिया ग्रामीण पुनर्रचना संघटना, कृषी सहाय्यक संघटना, अखिल भारतीय ताडगुळ महासंघ, कृषी उत्पादकांच्या माध्यमातून त्यांनी कृषी व्यवसायाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य अलौकिक स्वरूपाचे आहे.

बुडती हे जन देखवेना डोळा :

संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे भाऊसाहेब इंग्लंडहून उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परतलेत तेव्हा अनेक चाणाक्ष संस्थानिकांचा डोळा त्यांच्या बुद्घिमत्तेवर होता. नोकरीकरिता त्यांना निमंत्रणे आलीत. ती त्यांनी विनम्रपणे नाकारली. भाऊसाहेबांच्या डोळ्यासमोर अठराविश्र्वे दारिद्र्यात जीवन जगणारा ग्रामीण शेतकरी-कष्टकरी समाज होता. त्याच्या उन्नतीकरीता आपण झटलो पाहिजे. याच जगाच्या पोशिंद्याच्या दु:खाला वाचा फोडण्याचे भाऊसाहेबांनी मनोमन ठरविले. सत्ता हे प्रब ोधनाचे साधन आहे. साध्य नाही. याची जाणीव भाऊसाहेबांना होती. अमरावती जिल्हा कौंसिलचे अध्यक्ष असताना त्यांनी जनतेच्या हिताची बरीच कामे केली.
महात्मा ज्योतिबांनी शोधलेल्या ग्रामीण लोकजीवनाच्या दारिद्र्याचे मूळ कारण अविद्या आहे ती नाहिशी करण्याचा ध्यास भाऊसाहेबांनी घेतला. या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण ठराव केलेत. गावागावात शाळा त्यांनी उघडल्यात. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले. यामागील त्यांचा उद्देश असा, भारतात गरीब शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, आणि तो निरक्षर पर्यायाने अज्ञानी आहे. त्यामुळे तो पारंपारिक शेती करतो. त्याला आधुनिक शेती-तंत्रज्ञान विषयक ज्ञान मिळावे, पुरक व्यवसायाचे महत्त्व पटावे. यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. शिक्षणामुळे त्याला चांगल्या वाईटाचा विचार करता येईल. यातून शेती व्यवस्थेत आणि शेतकर्‍यांच्या परिस्थितीमध्ये निश्चितच बदल होईल, यासाठी भाऊसाहेबांनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले. आजही कृषी तंत्रज्ञान, व्यवसाय-कौशल्य, लघु-कुटीर उद्योग निर्मितीबाबत व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे.

जागतिक कृषी प्रदर्शनी : 

शेतीतून शेतकर्‍याला चांगला आर्थिक लाभ झाला तरच शेतकर्‍यांची सर्वांगीण उन्नती होऊ शकते. शेतकर्‍यांच्या सर्व दु:खाचे मुळ हे आर्थिक आहे. हे भाऊसाहेब ओळखून होते. त्यासाठी पारंपारिक शेती व्यवसायात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. हे येथील शेतकर्‍यांना पटवून देण्यासाठी भाऊसाहेबांनी दिल्लीला जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केले. तेथे भारतीय शेतकर्‍यांना अधिक उत्पन्न देणार्‍या बियाण्यांची ओळख झाली. नव्या नव्या तंत्रज्ञानाची व संकरित वाणांची ओळख पटली. भाऊसाहेबांना हेच अपेक्षित होते. केंद्रिय कृषी मंत्री असताना भाऊसाहेबांनी अनेक शेतकर्‍यांना विदेशात कृषी व तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी पाठविले. अनेकांना त्यांनी बिजोत्पादनासाठी प्रोत्साहित केले. संकरित बियाणे येथे निर्माण होऊ लागले. पण आज दुर्दैवाने स्वत:च्या स्वार्थापायी देशी विदेशी कंपन्या येथील शेतकर्‍यांची लूट करीत आहेत. बदलते हवामान, ओला, कोरडा दुष्काळ इत्यादी कारणांमुळे अनेक कंपन्यांचे संकरित वाण जमिनीत पेरलेले उगवत नाही. दोनदा-तिनदा पेरणी करण्याची वेळ शेतकर्‍यावर येते. त्यातून येणारा कर्जबाजारीपणा, त्यातून निर्माण होणारी विमनस्कता यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हे केवळ आमच्या स्वार्थीवृत्तीमुळे झाले.

सावकार व बँक कचाट्यातून सुटका :

1932-33 ला भाऊसाहेबांनी आणलेल्या कर्ज-लवाद कायद्यामुळे शेतकर्‍यांनी सावकाराकडून घेतलेल्या कर्जापोटी गहाण ठेवलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी शेठ सावकाराला घशात जात होत्या, त्या जमिनी या कायद्यामुळे वाचविता आल्यात. या कायद्याच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी शेतकर्‍यांची सुटका केली. हे अनंत उपकार शेतकरी कधीच विसरू शकणार नाही. असाच एक निर्णय भाऊसाहेबांनी 1912 च्या सुमारास स्थापन झालेल्या अमरावती सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. या संस्थेत घेतला अल्पमुदतीच्या कर्जाला दीर्घ मुदतीच्या कर्जात परिवर्तीत करून काही काळ शेतकर्‍यांना बँक जप्तीपासून अभय दिले. असे निर्णय येणार्‍या अधिकार्‍यांची, नेत्यांची आज गरज आहे.

शेतमालाचा उत्पादित मूल्य सिद्घांत : 

शेतकर्‍याच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा. अशी आग्रही भूमिका भाऊसाहेबांची होती. कारखानदार जसा आपल्या उत्पादनाची किंमत स्वत: ठरवितो. तोच न्याय शेतकर्‍यालाही असावा. संपत्ती करारावरील विधेयकावर भाषण करताना भाऊसाहेबांनी शेतकर्‍याच्या मालाला योग्यभाव मिळावा यासाठी केलेले अर्थशास्त्रीय विवेचन पुढीलप्रमाणे आहे - शेतकर्‍यांनी उत्पन्न केलेल्या वस्तूचे जास्त भाव दिले तर त्यामुळे पैशाची किंमत कमी होते म्हणून शेतकर्‍याच्या उत्पादनाच्या किंमती कमी करणे हाच चलनवाढ रोखण्याचा मार्ग आहे, असे बेजबाबदार विधान काही जबाबदार व्यक्ती करताना आढळतात. पण ते योग्य नाही. वास्तविक भारतीय शेतकरी पूर्वी कधीही नव्हता इतका आज दरिद्री झाला आहे. त्याच्या हाती जो काही पैसा येतो तो सर्व अत्यावश्यक जीवन उपयोगी वस्तू खरेदी करण्यावर खर्च होऊन जातो. पुष्कळदा तर त्याला आपल्या कुटुंबाच्या सर्वसाधारण गरजा देखील भागविता येत नाही. उलट ज्यांची संख्या संपूर्ण देशात दोन हजारापेक्षाही कमी आहे अशा नवकोट नारायणाच्या हातात देशातील शेकडा 75 टक्क्यापेक्षाही अधिक संपत्ती आहे. खरे पाहता त्यांच्यामुळे देशात चलनवाढ निर्माण झाली आहे. ही अफाट संपत्ती या मुठभर लोकांच्या हातात जनतेची अधिक पिळवणूक करण्याकरिता राहू न देता जर देशाच्या औद्योगिक विकासाचे उपयोगात आणली तरी देशाची अधिक प्रगती साधून लोककल्याण होऊ शकेल. अत्यंत अभ्यासपूर्ण अर्थशास्त्राच्या अंगाने भाऊसाहेबांनी शेतकर्‍यांच्या विकासाचा मूलमंत्र मांडला आहे. यातून भाऊसाहेबांचा शेती विकासाचा ध्यास दिसून येतो. आज अशा लोकनेत्याची वानवा आहे. शेतकर्‍याची सेवा करणे सोपे आहे. पण त्यासाठी सोपे कायदे, साधे शिष्टाचार व सरळ माणसे हवी आहेत. हे तीनही गुण अंगिकारलेला डॉ. पंजाबराव देशमुख हा कदाचित भारतात या युगातला एकमेव माणूस असावा. ज्याने पद, प्रतिष्ठा व पैसा यांना तुच्छ लेखून आपला जीवनयज्ञ चेतविला. महात्मा गांधीजींनी सार्थ शब्दात भाऊसाहेबांचा गुणगौरव केला आहे. भाऊसाहेब म्हणजे विचार आणि विवेक यांच्या समृद्घ व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांच्या जीवनकार्याचे कृषी, शिक्षण आणि सहकार हे तीन पैलू होते. या तीनही पैलूत ग्रामीण शेतकरी, कष्टकर्‍यांचा विकास दडलेला आहे. हे भाऊसाहेबांना ज्ञात होते. त्यासाठीच ते आजन्म चंदनासारखे झिजलेत...
केवळ आमच्यासाठी, फक्त आमच्यासाठी

संदर्भग्रंथ - 
1. लोकमहर्षी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई
2. डॉ. पंजाबराव देशमुख जीवन कार्य श्री शिवाजी शिक्षण संस्था, अम.
3. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विविध दर्शन (संपा.) श्री नागपुरे, श्री मोहोड, श्री कदम
________________________________________________
प्राचार्य डॉ. देवानंद अतकरे / प्रा. डॉ. पंजाब पुंडकर, महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरूड

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) 

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा