तू ज्ञानाचे गाणे भाऊ, तू सूर्याची भाषा;
तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा.
बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने;
घरे मोडकी उभी राहिली तुझ्याच आधाराने;
दिले मृतांना संजीवन तू, केल्या दूर निराशा.
शेतीच्या दारात आणली तू ज्ञानाची गंगा;
माती मधुनी तूच फुलविल्या शास्त्राच्या फुलबागा;
तूच पेरल्या मनात अमुच्या नव्या सुगंधी आशा.
सात सागरापल्याड केले मंथन वेदांताचे;
तूच काढिले शोधून मोती धर्माच्या उगमाचे;
तुझी लेखणी वेद पोचवी दूरदूरच्या देशा.
सातपुड्याचा उंच कडा तू, तू पूर्णा माई;
तू मजुरांचा महादेव गा, तू दलितांची आई;
छत्रपतीच्या ज्ञानपोईचा केला तूच गणेशा..
-डॉ. श्रीकृष्ण राऊत
No comments:
Post a Comment