भव्य दिव्य अन् खरे विदर्भी भाउ तुम्ही जन्मले
म्हणून तुमचे आज पाहिजे गीत इथे गाइले.
कृषीवलांच्या घामामधले बिंदु बिंदु वेचुनी
माळ घातली गळ्यांत त्यांच्या तोषविले ते मनी
पूजा बांधुनी श्रमिक जनांची त्यांच्यास्तव रंगले
म्हणून तुमचे आज पाहिजे गीत इथे गाइले.
उघडि नागडी शेतकऱ्यांची पोरे केली सुखी
मायेहुनि माय होउनी घास भरविले मुखी
वत्सलतेचा सागर होउन प्रेम इथे वाटले
म्हणून तुमचे आज पाहिजे गीत इथे गाइले
अन्यायाचा आसुड उठता कितेक पडले बळी
करकमलांनी भरून घेतल्या अश्रूंच्या ऒंजळी
पाठीवरती हात फिरवुनी गोड दिलासे दिले
म्हणून तुमचे आज पाहिजे गीत इथे गाइले.
पिचले दबले गळून गेले कष्टकरी भूतळी
आत्मबलाने दिले तयांना संजीवन या स्थळी
निस्पृहतेच्या वाटेवरूनी अहर्निश चालले
म्हणून तुमचे आज पाहिजे गीत इथे गाइले.
काळ्या माती मधी शोधले माणिक रत्ने हिरे
सन्मानाचे जीवन त्यांना समर्पिले साजिरे
विशाल दर्शन मानवतेचे तुम्हामधे गवसले
म्हणून तुमचे आज पाहिजे गीत इथे गाइले
धवल कांचना विदर्भ सरिता निर्मल शिववाहिनी
भगीरथाची पुन्हा प्रचीति दिली इथे आणुनी
ज्ञानतीर्थ हे अमरपुरीचे सर्वांसाठी खुले
म्हणून तुमचे आज पाहिजे गीत इथे गाइले.
शेतकऱ्यांचे सुपूत्र तुम्ही कृषकांचे राहिले
गरिबा पोटी जन्म घेउनी गरिबांना पाहिले
ज्ञान देउनी पांग फेडण्या त्यांना जागविले
म्हणून तुमचे आज पाहिजे गीत इथे गाइले.
-बजरंग सरोदे
No comments:
Post a Comment