शिक्षण महर्षी,कृषिरत्न


डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

भाऊसाहेबांना आम्ही समजून घेतले पाहिजे - अ‍ॅड. अरूणभाऊ शेळके -मुलाखत__प्रा. कुमार बोबडे

संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताच उभा ठाकलेला वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेचा गंभीर प्रश्न. यशस्वीपणे त्याची सोडवणूक. इतकेच नव्हे तर नवीन अकरा वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता मिळणे. वैद्यकीय महाविद्यालयाचा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या दिशेने प्रवास सुरु होणे. संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासात्मक व गुणात्मक परिवर्तन घडून येणे. गेल्या चार वर्षात 95 कोटींची कामे करुन विविध शाळा-महाविद्यालयांचे स्वरूप बदलणे. अकोला येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्ता व संशोधन वाढून आर्थिक स्थिती मजबूत होणे. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुद्रा महाराष्ट्राची हा संदर्भग्रंथ प्रसिद्घ करून एक बौद्घिक संपदा सर्व महाराष्ट्राला उपलब्ध करून देणे. सिंहावलोकन परिषदेचे आयोजन करून विदर्भ व अमरावती विभागाच्या शिक्षण, कृषी, आरोग्य, सिंचन अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणणे. संस्थेला एक गुणात्मक व विकासात्मक चेहरा प्राप्त करुन दिल्याबद्दल इंडियन लिडरशिप अवॉर्ड फॉर एक्सलन्स या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवांकित होणे. संस्थेचा या कार्यासाठी महाराष्ट्र निर्माता पुरस्काराने सन्मान होणे, या सार्‍या पार्श्वभूमिवर भाऊसाहेब, संस्था आणि विकास या मुद्यांवर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुणभाऊ शेळके यांचेशी ही मनमोकळी बातचित.
भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या महामानवाने हिमालयासारखे उत्तुंग कार्य करून ठेवले. तो एक विशिष्ट ध्येय घेऊन पेटलेला माणूस होता. त्यांचं ज्ञान, उद्दिष्ट आणि त्यांची दूरदृष्टी ही थक्क करणारी आहे. ‘माझ्या नंतरच्या सातपिढ्या मॅट्रीक झाल्या तरी माझं काम झालं.’ असं ते म्हणायचे. त्यांच्या पुण्याईने या संस्थेतल्या दुसर्‍या तिसर्‍या पिढ्याच उच्चशिक्षित झाल्या. आज आपल्याजवळ गुणवंतांची कमी नाही पण भाऊसाहेबांची त्याग, समर्पणाची भावना अंगी बाळगण्यासाठी आम्ही भाऊसाहेबांना समजून घेतलं पाहिजे असे विचार श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुणभाऊ शेळके यांनी व्यक्त केले.
अ‍ॅड. अरुणभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनात ‘शिवसंस्था’ हे संस्थेचे त्रैमासिक सुरु होत असून त्यानिमित्त त्यांनी एका अनौपचारिक गप्पात आपले मन मोकळे केले.

प्रश्न : आपण भाऊसाहेबांना प्रथम कधी पाहिले?

उत्तर : आठव्या वर्गात असताना त्यावेळी मी रामतीर्थला शिकत होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा वाढता जोर. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला वेगळाच रंग आलेला. बाबासाहेब सांगळूदकर संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते. आणि केरळचे माजी राज्यपाल मा. रा. सु. गवई हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यामुळे दर्यापूर तालुक्यात वेगळीच धुम होती. अशातच लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले भाऊसाहेब रामतिर्थला प्रचारा आले. माझे वडील बाबासाहेब सांगळूदकरांच्या गटाचे. त्यामुळे तेही गवईच्या प्रचारात. पण भाऊसाहेब गावात आले त्यावेळी राजकारण आणि मैत्री यातला फरक माझ्या लक्षात आला. बाबासाहेब सांगळूदकर आणि माझे वडील निवणुकीत भाऊसाहेबांच्या विरोधात होते पण त्यांचे प्रेम मात्र भाऊसाहेबांसोबत होते. आजचे राजकारण आणि तेव्हाचे राजकारण यात प्रचंड फरक झाला असून राजकारणात प्रेमाची भावनाच संपली आहे.

प्रश्न : भाऊसाहेबांच्या मोठेपणाची जाणीव केव्हा झाली?

उत्तर : भाऊसाहेबांच्या शाळेत नोकरीला लागलो तेव्हा विज्ञान शाखेत पदवी संपादन केल्यानंतर गणिताचा शिक्षक म्हणून मी 1969 मध्ये श्री शिवाजी हायस्कूल स्टेशन ब्रँचला रुजू झालो. भाऊसाहेबांनी झोपडपट्टीसारख्या वस्तीत उभारलेली ही तटट्यांची शाळा हळूहळू पक्क्या इमारतीत रूपांतरीत होत होती आणि हे सारे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून घडत होते. यातूनच भाऊसाहेबांचे मोठेपण कळले. मग मीही जीव ओतून कामाला लागलो.

प्रश्न : भाऊसाहेबां व्यतिरिक्त आणखी कोणाच्या व्यक्तित्वाचा प्रभाव आपल्यावर पडला?

उत्तर : अर्थातच गाडगेबाबांचा. गाडगेबाबांचं मला खूप आकर्षण होतं. पगार न घेता ते गोरगरिबांच्या वस्तीत जाऊन लोकांना समाजशिक्षण देतात, मग आपण का नाही. नियमित शाळेत शिकविण्या व्यतिरिक्त मी नापास विद्यार्थ्यांची एक विशेष बॅच तयार केली आणि त्यांना गणित शिकवू लागलो. जे विद्यार्थी आधी नापास झाले होते. ते डिस्टींक्शन घेऊन उत्तीर्ण झाले. गाडगेबाबा म्हणायचे, घ्घ्भाऊसाहेबांनी बॅरिस्टरी न करता तटटयाची शाळा काढून स्वत:ला समाजाच्या शिक्षणासाठी वाहून घेतले, तुम्हीही काही करा.’ खरे तर गाडगेबाबांमुळेच भाऊसाहेब आपल्याला अधिक कळले.

प्रश्न : म्हणजे भाऊसाहेब आणि गाडगेबाबा खर्‍या अर्थाने मूल्यशिक्षण देत होते, पण ते आजच्या शिक्षणात आहे काय?

उत्तर : भाऊसाहेब व गाडगेबाबा जे मूल्यशिक्षण देत होते, ते आजच्या शिक्षणात अजिबात नाही. आज पुस्तकातून मूल्यशिक्षणाचे धडे देण्यात येतात, पण कृतीतून नाही. त्यामुळे ते मूल्यहीन ठरते. गाडगे महाराजांना शिक्षणाचे महत्त्व कळले होते. मूल्यशिक्षणाची एक दशसूत्रीच त्यांनी समाजाल दिली. विदेशातून बॅरिस्टरची पदवी घेऊन आलेले भाऊसाहेब खोर्‍याने पैसा कमवू शकले असते पण वकिली न करता ते बहूजन शेतकरी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत फिरू लागले. शाळा उभारण्यासाठी झोळी हातात घेतली. सामाजिक मूल्यांची प्रत्यक्ष कृतीतून रूजवणूक केली. समाजाला असे शिक्षण देण्यासाठी पुन्हा गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भाऊसाहेबांपर्यंत जायला पाहिजे. आपण केवळ त्यांचे नाव विद्यापीठाला देतो. विचार मात्र देत नाही.

प्रश्न : संस्थेने आज बरीच प्रगती केली आहे.

पण संस्थेचा अपेक्षित विकास झाला, असे वाटते काय?
उत्तर : विकास झाला नाही असे नाही विकास झाला शेवटी अधिकाधिक विकास व्हावा असे प्रत्येकालाच वाटत असते. मी 1992 मध्ये संस्थेत पदाधिकारी हो तो. त्यावेळी सर्व जिल्ह्यात अभियांत्रीकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मी दिला होता. तो मंजूर झाला असता तर संस्था कुठल्या कुठे गेली असती. मेडिकलचा पैसा मेडिकलमध्येच लावता असता तर वीस वर्षात हे महाविद्यालय खूप पुढे गेले असते आणि यातून संस्थेचा अधिक विकास झाला असता. आजही विकासाला व विस्ताराला खूप मोठा वाव आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रश्न : भाऊसाहेबांच्या स्वप्नपूर्तीबद्दल काय ?

उत्तर : खेर तर हा खूप गंभीर प्रश्न आहे. भाऊसाहेबांच्या स्वप्नांची पूर्ती झाली नाही असे नाही. कारण भाऊसाहेबांनी संस्थेची उभारणीच त्यादृष्टीने केली होती. कास्तकार शिकला पाहिजे, असे भाऊसाहेबांचे स्वप्न होते. आज शेतकर्‍यांची मुले मोठ्या प्रमाणावर शिक्षित झाली आहेत आणि होत आहेत. शिक्षण खेड्यापर्यंत पोहोचले. आज जिल्ह्याची जी मोठी साक्षरता आहे त्याची मुळे भाऊसाहेबांच्या कृतीत आहे. शेतकरी व्यापारात फार मोठी मजल मारू शकला नसला तरी तो लहान-मोठ्या व्यापारात आला आहे. गावाच्या आर्थिक विकासात तो सहभागी झाला आहे. कृषी विद्यापीठाचे व कृषी महाविद्यालयाचे संशोधन गावोगावी पोहचत आहे. सिंचनाची फारशी उपलब्धता नसली तरी अधिक उत्पादनासाठी शेतकरी नव नवीन बियाण्यांचा व तंत्रज्ञानाचा उपयोग घेतो आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा सुरू झाल्या आहेत. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाची सवो ही ग्रामीण भागात पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रश्न : गेल्या चार वर्षात संस्थेत बराच विकास झाला आहे. तेव्हा या विकासाबद्दल आपण समाधानी आहात काय?

उत्तर : म्हणजे विकास झाला आहे हे आपण मान्य करता. निश्चित विकास झाला आहेच पण त्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतो आहोत त्या प्रयत्नांचा रिझल्ट मात्र आपल्या अपेक्षे इतका मिळत नाही. अर्थात हे होतच असते जे मिळते त्यापेक्षा आपण अधिक अपेक्षा करीत असतो. प्रेम, सहानुभूती आणि नि:स्वार्थ भावनेने संस्था चालली पाहिजे असा आपला प्रयत्न असतो. धाक, दपटशा या मार्गांपेक्षा हा मार्ग चांगला आहे. संस्थेचं अध्यक्षपद हे विक्रमादित्याचं सिंहासन आहे. भाऊसाहेब, ओशो, गाडगेबाबा आणि सत्येदवबाबा यांच्या विचारातून ते सांभाळण्याचं बळ आपल्याला मिळालं आहे. त्यामुळे संकटांची आणि आव्हानांची भीती वाटत नाही.

प्रश्न : संस्थेच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी आपल्या काही योजना?

उत्तर : भरपूर योजना आहेत. काळ बदलला आहे. येणार्‍या काळाच्या बदलाची पावले आजच दिसू लागली आहेत. अशावेळी भाऊसाहेबांच्या समर्पित भावनेविषयी नितांत आदर ठेवत आपल्याला पुढे जावे लागणार आहे. यासाठी अनेक उपक्रम सुरु करावे लागतील. नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि व्यवसाय प्रबंधन महाविद्यालय सुरु करणे, आय. ए. एस. ऍकेडमीची स्थापना करणे, पोलीस आणि मिल्ट्री ट्रेनिंग सेंटर सुरू करणे, आदि प्रस्ताव आहेत. विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्याने अनेक उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आपल्या कार्यपद्घतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

प्रश्न : संस्थेचे कार्य समाजापर्यंत पोहाचावे, शिक्षण विषयक जनजागृती व्हावी म्हणून भाऊसाहेबांनी 'शिवाजी' पत्रिका सुरू केली होती. आता 'शिवसंस्था' या नावाने आपण त्रैमासिक सुरू करता आहात. या त्रैमासिकाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत?

उत्तर : हे त्रैमासिक खर्‍या अर्थाने भाऊसाहेबांच्या विचारांची मुखपत्रिका ठरावी. समाजाला वैचारिक व कृतिशील विचार यातून मिळावे. शिक्षण कृषी क्षेत्रातील नवनव्या संशोधनाची व प्रयोगाची ओळख व्हावी. विशेष म्हणजे भाऊसाहेबांच्या विचारांना ती पूर्णपणे वाहिलेली असावी. हे विचार घरोघरी पोहचविण्याचे कार्य 'शिवसंस्था' या त्रैमासिकाने केले तर हा उपक्रम सार्थ ठरेल.
__________________________________________________
- प्रा. कुमार बोबडे, विभागप्रमुख, जनसंवाद विभाग, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती.

(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) 

No comments:

आदरांजली :

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली...




लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा